पाकचा गळेकापू गळाभेटीचा सापळा – eNavakal
संपादकीय

पाकचा गळेकापू गळाभेटीचा सापळा

शेजारच्या पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या घडामोडींवर भारत बारीक लक्ष ठेवून आहे. येत्या 15 ऑगस्टपर्यंत त्या ठिकाणी इम्रान खान यांच्याकडे देशाची सूत्रे येण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इम्रान खान यांचे अभिनंदन केले. नरेंद्र मोदी यांनी आपल्या पंतप्रधान पदाची शपथ घेताना शेजारच्या बर्‍याच राष्ट्राध्यक्षांना बोलवलं होतं, त्यावेळी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी नवाज शरीफ होते. स्वाभाविकपणे त्यांनी देखील मोदींचे निमंत्रण स्वीकारून हजेरी लावली होती. ते करताना शेजारच्या राष्ट्राबरोबरचे संबंध अधिक सलोख्याचे असावे असा एक सुप्त हेतू तर होताच, शिवाय आपण ज्या पदाची शपथ घेत आहोत, त्या पदाकडून लोकांचीदेखील तेवढीच मोठी अपेक्षा आहे, याचीदेखील ती एक जाणीव होती. दुर्दैवाने मोदींचा हा प्रयोग पाकिस्तानबाबत फारसा काही यशस्वी झाला नाही. उलट गेल्या चार वर्षांत पाकिस्तानकडून भारतविरोधी अशा काही कारवाया झाल्या की, जवळपास दोनशेपेक्षा जास्त सुरक्षा रक्षकांना आपले प्राण गमवावे लागले. प्रामुख्याने काश्मीरमध्ये सतत दहशत निर्माण करण्याचे काम पाकिस्तानकडून होत राहिले. अजूनही ते सुरूच आहे. आतादेखील नव्याने पंतप्रधान म्हणून होऊ घातलेल्या इम्रान खान यांनीदेखील काश्मीरबाबत जुनेच तुणतुणे वाजवले आहे. काश्मीरमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याची बांग इम्रानखानने दिली आहे. तरीदेखील इम्रान खान आपल्या शपथविधीच्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हा जरी परराष्ट्र व्यवहाराचा किवा एकूणच राजकीय शिष्टाचाराचा भाग असला तरी देशवासीयांच्या भावना आणि देशाची सुरक्षितता यासंदर्भातला अभिमानही तेवढाच महत्त्वाचा ठरतो. एकमेकांच्या शपथविधीला जाऊन जर दोन्ही देशांमधले संबंधच सुधारणार नसतील, तर त्या नुसत्या विधीचा काय उपयोग? म्हणूनच पाकिस्तानचे निमंत्रण आल्यानंतर भारताने त्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. आलेले निमंत्रण धुडकावून कसे द्यायचे किंवा आपल्या न जाण्याने संबंध आणखी बिघडू शकतात, अशी समजूत करून घेण्याचे कारण नाही. भारताबरोबरचे संबंध सुधरवण्याची पाकिस्तानची किती प्रामाणिक इच्छा आहे, हे अजूनही सिध्द झालेले नाही.

इम्रान खानची तीच तबकडी
परराष्ट्र व्यवहार तर सोडाच, परंतु साधे माणुसकीचे व्यवहारसुध्दा पाकिस्तानला माहीत नाहीत. स्वत:च्या देशातसुध्दा वाटेल तसा नरसंहार करायला हे लोक मागेपुढे पाहात नाहीत. ज्या काश्मीरचा वारंवार उल्लेख होत असतो, तिथे दहशतीचे क्रूर थैमान घालून लाखो काश्मिरी पंडितांचे भविष्य उद्ध्वस्त केले गेले. त्यावेळी इम्रान खान यांना मानवी हक्क दिसले नाहीत किंवा आजही त्यांच्याच जातीतल्या किंवा धर्मातल्या केवळ भारतीय लष्करात किंवा पोलिसात आहेत म्हणून त्यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्याचे कृतघ्न प्रकार घडत असतात. निवडून आल्या आल्या इम्रान खान यांनी काश्मीरचा विषय काढून एकाअर्थी भारताच्या वर्मावऱच बोट ठेवले आहे आणि हीच जर त्यांची पुढच्या राज्यकारभारातली धोरणे राहाणार असतील तर असे शत्रूत्व मनात ठेवणार्‍या इम्रान यांच्या शपथविधीला भारताने किंवा मोदींनी जाण्याचे काहीच कारण नाही. केवळ एक उपचारच पाळायचा असेल तर मोदींनी आपला प्रतिनिधी तिथे पाठवावा. पण स्वत: जाऊन समस्त भारतीयांचा स्वाभिमान दुखवू नये. अर्थात अजून या शपथविधीचे अधिकृत निमंत्रण आलेले नाही. परंतु जी काही चर्चा सुरू आहे, ती लक्षात घेता शपथविधीचे निमित्त पुढे करून पाकिस्तानविषयीचे बेगडी प्रेम उफाळून येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात जनभावना खूप तीव्र आहेत. कारण गेल्या सहा महिन्यांत म्हणजे जानेवारी ते जून याकाऴात काश्मीरमध्ये 39 सुरक्षा रक्षकांचे प्राण गेले आहेत. म्हणजे महिन्याला बारा जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले ही गोष्ट अतिशय संतापजनक ठरते. या सगळ्या गोष्टींबाबतची भारताची भूमिका ही किती तीव्र स्वरूपाची आहे, हे वेळोवेळी भारताकडूनच व्यक्त झाले पाहिजे. कदाचित तुमचे व्यापार आणि उदीम व्यवहार चालूही राहातील. परंतु या देशाचा जवान आणि त्याची होणारी हत्या सहन करता कामा नये आणि त्याबद्दलचा स्वाभिमान कायम राहिला पाहिजे.

संबंध सुधारणार असतील तर
ज्या देशांबरोबर खरोखरच संबंध सुधारू शकतात त्यांच्याशी मैत्रीचा हात पुढे करायला काहीच हरकत नसते. किंबहुना पाकिस्तान वगळता भारताचे सर्वच देशांशी चांगले संबंध निर्माण झालेले आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्याच वर्षी त्यांनी बराक ओबामा यांना प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवले होते. त्यानंतर अमेरिकेबरोबरचे भारताचे संबंधही बर्‍यापैकी सुधारले. एवढेच नव्हे तर चीनसारख्या सतत आडमुठी भूमिका घेणार्‍या मोठ्या राष्ट्राबरोबरही भारताने अधिकाधिक चांगले संबंध टिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2019 च्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाला डोनाल्ड ट्रम्प यांना बोलवण्याचा मोदी यांचा विचार दिसतो. त्यांना बोलवून भारताचा काही लाभ होणार असेल तर असा परराष्ट्र व्यवहार पाळायला काहीच हरकत नाही. जगाच्या पाठीवर अनेक देशांमध्ये अनेक प्रकारचे विवाद असूनही त्याचा शक्य तितक्या सामोपचाराने निपटारा करण्याचा प्रयत्न दिसून येतो. अशा परिस्थितीत पाकिस्तानसारख्या देशाला कोणताच समंजसपणा दाखवता येत नसेल तर काही काळ या देशाला पश्चाताप करायला लावले पाहिजे. खरे तर सगळ्या जगातच पाकिस्तानची प्रतिमा फारशी सकारात्मक नाही. असे असूनही जर पाकिस्तान भारताला पाण्यात पाहाण्याचे उद्योग करीत राहिला म्हणजे हे अतिधारिष्टय म्हणावे लागते. म्हणूनच तिथे येऊ घातलेल्या नव्या राजवटीचे निमित्त साधून भारताने काही संदेश योग्य पध्दतीने पोहचवले पाहिजेत. पाकिस्तानच्या गळेकापू गळा भेटीच्या सापळ्यात भारताने अजिबात अडकू नये. उलट अतिशय सावधपणे आपल्या भूमिकांची मांडणी केली पाहिजे. किंबहुना त्याबाबत पाकिस्तानला जाणीव होईल, असे व्यवहार केले पाहिजेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News क्रीडा देश

कर्णधार विराटचे शतक! बंगळुरूच्या 213 धावा

कोलकाता-आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेत बंगळुरू – कोलकाता लढतीत बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने काढलेल्या दमदार शतकामुळे प्रथम फलंदाजी करणार्‍या बंगळुरूने 20 षटकांत 4 बाद 213...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : रजनीकांत यांचे धक्कातंत्र

राजकारणाची दक्षिण शैली ही सहसा कोणाच्या लक्षात येत नाही. इथले राजकारण हे इतक्या चित्रविचित्र पध्दतीने चालू असते. की त्याचा अंदाजही बांधता येत नाही. अण्णा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक

सिमांतिनी कोकाटे यांच्यावर हकालपट्टीची टागंती तलवार

नाशिक – बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढविणाऱ्या माणिकराव कोकाटे यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर आता सर्वाचेच लक्ष सिमांतिनी माणिकराव कोकाटे यांच्यावरील कारवाईकडे लागले आहे. सिमांतिनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश निवडणूक

सत्ता आणि पैशासाठी शिवसेना-भाजप एकत्र – राज ठाकरे

रायगड – लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी मोदी विरोधी भुमिका घेतली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातील शेवटची सभा आज रायगड...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

करकरेंबद्दल विधान, भाजपने केले हात वर

नवी दिल्ली –  प्रज्ञा सिंह यांनी हेमंत करकरेंबद्दल धक्कादायक वक्तव्य केले आहे. ‘हेमंत करकरें यांना दहशतवाद्यांनी मारून माझं सूतक संपवलं’ असे वादग्रस्त वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर...
Read More