मुंबई- ग्रीहा या संस्थेच्या मदतीने पर्यावरण पूरक इमारती निर्माण करण्यावर शासन भर देणार आहे असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केला. ग्रीहाच्या वतीने मुंबईत आयोजित चर्चासत्राचे उदघाटन पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला TERI या संस्थेचे अध्यक्ष डॉ अजय माथूर, ग्रीहा चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठ, व्यासपीठावर उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व इमारती पर्यावरण पूरक, करण्यावर राज्य सरकारचा भर आहे. त्यासाठी शासनाने स्पर्श हा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला असून, या उपक्रमांतर्गत शासनाच्या सर्व इमारती हरित इमारती करण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत भारत सरकारच्या अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाशी संलग्न ग्रीहा या संस्थेशी हरित इमारतीचे मानांकन करून घेण्याचा करार मे 2018 मध्ये करण्यात आला. या करारामुळे शासनाच्या ज्या इमारती पर्यावरण पूरक झाल्या आहेत. त्यांचे ऑडिट करून त्यांना प्रमाणित करण्यात येणार आहे. भविष्यात खाजगी क्षेत्रातील इमारती सुद्धा पर्यावरण पूरक होतील असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.