परामर्ष : ही नीतीमूल्य व्यवस्था अधिक महत्त्वाची – eNavakal
लेख

परामर्ष : ही नीतीमूल्य व्यवस्था अधिक महत्त्वाची

कोणतीही समाजव्यवस्था ही केवळ कायदा सुव्यवस्थेवर टिकून राहू शकत नाही. तिला स्वतःची अशी एक नैतिक मूल्यावस्था अधिक महत्त्वाची वाटत असते. कायदा सुव्यवस्था किंवा नियम या गोष्टी पूर्वापार चालत आलेल्या असल्या तरीसुध्दा ब्रिटीशांच्यानंतर भारतात त्याविषयी अधिक जाणीव निर्माण झाली. परंतु भारतीय समाजव्यवस्थेचा विचार केला तर तो कायदा सुव्यवस्थेपेक्षाही सामाजिक नीतीमूल्य व्यवस्थेवर अधिक विश्वास ठेवतो. जगातल्या अनेक संस्कृती लुप्त झाल्या पण भारतीय संस्कृती टिकून राहिली यामागचे एकमेव कारण म्हणजे इथल्या समाजाने स्वतःहून स्वीकारलेली सामाजिक मूल्यव्यवस्था महत्त्वाची ठरली. हे लक्षात घेतले पाहिजे आणि ती कायदा सुव्यवस्थेपेक्षा निश्चितच वैशिष्ट्यपूर्ण ठरते. सगळ्याच गोष्टी कायद्याने होत नाहीत. तर समाजाने स्वतःहून स्वीकारलेल्या अनुशासनामुळे घडून येत असतात आणि हे असे अनुशासन भारताला तिच्या संस्कृतीच्या माध्यमातून प्राप्त झालेले आहे. हजारो वर्षापासूनच्या अनेक परंपरा या इथली समाजव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त ठरत गेल्या ज्यामधून मानवी आणि सामाजिक अशी दोन्ही मूल्ये संवर्धित होत गेली. या संदर्भात एकाच उदाहरणाचा विचार केला तरी त्यातले मर्म लक्षात येते. ते म्हणजे या देशाला सत्संग किंवा तीर्थक्षेत्रांची एक विलक्षण परंपरा पाहायला मिळते. देशाच्या अनेक भागामध्ये एकाचवेळी लाखो लोक सत्संगाच्या विविध कार्यक्रमांमध्ये तीर्थयात्रांमध्ये सहभागी होताना दिसतात. तिथे जाणारी व्यक्ती ही धार्मिक आहे असा जरी त्याच्यावर शिक्का मारला जात असला तरी त्यानिमित्ताने त्या व्यक्तीमध्ये सत्प्रवृत्ती टिकून राहतात. ज्या गोष्टी कायद्याच्या माध्यमातून होऊ शकत नाहीत. त्या या सत्प्रवृत्ती निर्माण करणाऱ्या परंपरांमधून साधल्या जातात. भलेही त्यामागे धार्मिक स्वरुपाची पार्श्वभूमी असली तरी जर समाज यानिमित्ताने एकत्र राहू शकत असेल आणि काय चांगले काय वाईट याचे भान त्याला येत असेल तर अशा या व्यवस्थांना प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. प्रोत्साहन देताना चुकीच्या परंपरांना बाजूला ठेवले जाईल. पण प्रामुख्याने लोकांमधल्या सदविचारांचा प्रभाव वाढेल आणि नकळतपणे त्यांच्याकडून सामाजिक एकता किंवा समाजव्यवस्थेला बळकटी मिळेल असे प्रयत्न जाणीवपूर्वक होण्याची गरज आहे.

कदाचित प्राचीन काळी हाच पैलू समोर ठेवून समाजातल्या सत्प्रवृत्ती टिकवून ठेवल्या असाव्यात. विविध प्रकारच्या धार्मिक किंवा सत्संगांच्या अनुष्ठानातून लोकांना सतत काहीतरी चांगले करण्याची प्रेरणा दिली गेली. त्यामध्ये अगदी खरे बोलण्यापासून ते दान करण्याच्या प्रवृत्तीपर्यंत अनेक छोट्या छोट्या मुद्दांचा समावेश होतो. आपल्याला मिळालेला मनुष्यजन्म हा मानसिक समाधान आणि सुख देणारा असावा. व्यक्तीगत पातळीवरचे हे मानसिक समाधान कोणताही शासकीय कायदा किंवा नियम देऊ शकत नाहीत. त्यासाठी मनातल्या सत्प्रवृत्ती जाग्या करून एक मानसिक शांतता सहजपणे प्राप्त करता येते आणि त्याचा आनंद अधिक चिरकाळ उपभोगता येतो. कायदा सुव्यवस्था ही चोरांना शिक्षा करू शकते. पण सत्संग किंवा सत्प्रवृत्त समाजाची ही परंपरा समाजात चोरच निर्माण होणार नाहीत असा प्रयत्न करणारी असते. अशावेळी ज्या कायद्या सुव्यवस्थेचे आज स्तोम माजवले जाते. ती किती तकलादू आहे हेसुध्दा समजून घेतलेपाहिजे. यापेक्षा प्रत्येक व्यक्तीने सत्प्रवृत्तीच्या माध्यमातून स्वतःवर घालून घेतलेले बंधन अधिक आश्वासक असते.असे सत्संग मोठ्या प्रमाणावर होतील. तीर्थयात्रांसारखे उपक्रम समाजाला सहजपणे अनुभवता येतील अशी व्यवस्था शासनाने केली पाहिजे. यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रोत्साहनपर योजना राबवल्या पाहिजेत. दुर्दैवाने सरकारने या पैलूकडे दुर्लक्ष केलेले आहे. कोणत्याही परिश्रमाशिवाय समाज एकत्र राहतो. स्वतःसाठी अनुशासन निर्माण करून काही गोष्टी घडवून आणतो. त्यागोष्टींना शासनाने ओळखले पाहिजे आणि मदतीचा हात पुढे करायला हवा. म्हणजेच यासाठी पूरकव्यवस्था किंवासोयीसुविधा देण्याचे अभ्यासपूर्वक नियोजन करायला हवे. अगदी महाराष्ट्राचे जरी उदाहरण घेतले तरी पुढच्या महिन्यात पंढरपूरच्या वारीचा तो दिव्य सोहळा सुरु होईल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक पंढरीच्या दिशेने जाऊ लागतील. कोणत्याही शासकीय मदतीशिवाय हे वारकरी स्वतः निर्माण केलेल्या अनुशासनातून ही वारी निर्विघ्नपणे पार पाडतात.

वारीमधला हा अनुभव एका प्राचीन परंपरेचे जतन करणारा तर असतोच. त्यापेक्षा कोट्यवधी वारकऱ्यांचे कुटुंब निर्व्यसनी आणि सत्प्रवृत्त राहून समाजातली सभ्यता टिकवून ठेवण्यासाठी कितीतरी मोठा नकळतपणे हातभार लावतात. हे लक्षात घेतलेपाहिजे. याच अनुषंगाने विचार केला तर महाराष्ट्रातली ज्योतिर्लिंगे. अष्टविनायकाची मंदिरे, साडेतीन शक्तीपिठे, शेगाव, शिर्डी, मुंबई इथल्या मंदिरांमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारा भाविक अशी एक मोठी सत्प्रवृत्त समाज निर्माण करणारी ईश्वरी देणगी लाभलेली आहे. या तीर्थयात्रा किंवा मंदिरांच्या व्यवस्था अधिक सुविधायुक्त झाल्या किंवा तिथल्या भाविकांना अधिक प्रसन्न करणाऱ्या ठरल्या. तर कितीतरी मोठा हातभार लागू शकेल. कायदा सुव्यवस्थेपेक्षाही ही सामाजिक नीतीमूल्य व्यवस्था अधिक मोलाची मानली पाहिजे. कायदा सुव्यवस्थेवर होणाऱ्या खर्चाइतकाच खर्च मूल्यव्यवस्था टिकवणाऱ्या तीर्थक्षेत्रांवर किंवा धार्मिक स्थळांवर खर्च झाला पाहिजे. सहजासहजी लक्षात न येणारा हा मुद्दा प्राचीन काळापासून समाजाला एकत्र ठेवत आलेला आहे. अन्यथा या देशाची सामाजिक घडी खूप आधीच विस्कळीत झाली असती. आणि मग कायदा सुव्यवस्थेनेसुध्दा ती आवरता आली नसती. विचारांमधून जर योग्य संस्कार टिकवले गेले तर ते व्यवहारांमध्ये परावर्तित होत असतात हा भारतीय समाजव्यवस्थेचा प्राचीन अनुभव आहे. म्हणूनच आजच्या राज्यकर्त्यांनी त्याचे महत्व जाणून घेतले पाहिजे. आणि अधिक डोळसपणाने एक सामाजिक सिध्दांत म्हणून त्याचा अभ्यास केला पाहिजे.
-लक्ष्मीकांत जोशी
9930680008

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
दिनविशेष

दिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती

आज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली  झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ

मुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...
Read More
post-image
विदेश

हाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित

हाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...
Read More
post-image
देश

…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट

नवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...
Read More
post-image
देश

पश्चिम बंगालचे डॉक्टर ममता बॅनर्जींसोबत सशर्त चर्चेस तयार

कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मागणीनंतर संपावर असलेले शिकाऊ डॉक्टर चर्चेसाठी तयार झाले आहेत. मात्र ‘आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला तयार आहोत...
Read More