परामर्ष – सेवाभाव श्रुंखलेचे संवर्धन व्हावे – eNavakal
लेख

परामर्ष – सेवाभाव श्रुंखलेचे संवर्धन व्हावे

देशाच्या अनेक कानाकोपऱ्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची सकारात्मक किंवा विधायक स्वरूपाची कामे सुरू असतात.त्या त्या परिसरामध्ये अशा चांगल्या सामाजिक सदहेतूने सूरु केलेल्या कामांना लोकमान्यताही मिळते. अनेक गरजूंना या सामाजिक प्रकल्पांमधून लाभ होतो. काही ठिकाणी तर अनेक गावांचे, खेड्यांचे किंवा त्या त्या नागरी वस्त्यांचे प्रश्न कायमचे सुटतात. ज्या समस्यांसाठी कितीतरी वर्षे सरकारवर अवलंबून राहावे लागले त्यासाठी सातत्याने ग्रामस्थांनी किंवा त्या त्या परिसरातील लोकांनी सरकारी यंत्रणांकडे पाठपुरावाही केलेला असतो तरीदेखील ही कामे होत नाहीत. परंतु काही सेवाव्रती लोक यासाठी पुढाकार घेतात. त्यांचा त्यात कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नसतो. समाजाचा लाभ व्हावा, वर्षानुवर्षांच्या समस्या सुटाव्यात, गाव स्वयंपूर्ण व्हावे, सरकारवर तिथल्या राजकारण्यांवर अवलंबून ना राहाता अशा काही प्रकल्पांमधून लोकांना किंवा गावाला रोजगार उपलब्ध करून द्यावा एवढाच त्यांचा हेतू असतो.अगदी आपल्या महाराष्ट्रात बरीच उदाहरणे पाहायला मिळतात. एक पन्नास वर्षापूर्वी विदर्भातल्या दुर्गम आदिवासी भागात बाबासाहेब आमटे यांनी सुरू केलेला कुष्ठ रोग निवारणाचा प्रयत्न जो आज आनंदवन या नावाने सर्वत्र ओळखला जातो. पश्चिम महाराष्ट्रात पाण्याची समस्या लक्षात घेऊन मधुकरराव देवल या व्यक्तीने म्हैसाळ गावी प्रकल्प सुरू केला. आणि तो यशस्वी करून दाखवला. राळेगणसिध्दी इथला अण्णा हजारे यांचा प्रकल्प सर्वांच्याच परिचयाचा आहे. हिवरे बाजार या गावाचाही गेल्या दहा वर्षात लोकांना नव्याने परिचय झाला. धुळे जिल्हय़ात साक्री तालुक्यातील बारीपाडा येथे चैत्राम पवार या तरूणाने गावाच्या स्वयंपूर्णतेचा ध्यास घेतला आणि कोणत्याही सरकारी मदतीशिवाय शेतीचा यशस्वी प्रयोग करून दाखवला. अगदी अशिक्षित लोकांनादेखील मोठा रोजगार उपलब्ध झाला या प्रकल्पाला जपान सरकारचा पुरस्कारही प्राप्त झाला. नंदूरबार येथे 25 वर्षापूर्वी असेच डॉ. हेडगेवार कृषी सेवाकेंद्र सुरू झाले. मुंबईत दादरला संत गाडगेबाबांच्या नावाने रुग्णसेवा केंद्र चालवले जाते जिथे देशभरातून मुंबईत आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना निवासाची आणि भोजनाची सेवा उपलब्ध करून दिली जाते. परळ इथले नाना पालकर रुग्णसेवा सदन हेसुध्दा रुग्णांच्या निवासाची आणि योग्य ते मार्गदर्शन देण्याची नि:शुल्क व्यवस्था करते. मुलुंड पश्चिमेला एका गुजराती संस्थेमार्फत अंध व्यक्तींना महिन्याच्या एका रविवारी मोफत महिनाभराचा सर्व प्रकारचा किराणा आणि अन्य उपयोगी वस्तू मोफत दिल्या जातात.

अशा या असंख्य संस्था काम करीत राहातात. परंतु तशा स्वरूपाची अन्य कामे इतर ठिकाणीही सुरू झाली आहेत असे मात्र पाहायला मिळत नाही. मुळातच सेवाकार्य हा प्रकार घरावर तुळशीपत्र ठेवून करायचा प्रकार असल्याने याकरीता लोक सहसा पुढाकार घेत नाहीत. परंतु अशा प्रकारच्या एकाअर्थी सामाजिक परिवर्तन घडवून आणणाऱ्या संस्थांची किंवा त्यामागे उभ्या असलेल्या व्यक्तींची फार मोठी मदत घेता येऊ शकते. प्रत्येकाला आपापल्या कार्याचा एक स्वतंत्र अभिमानही असतो काहींच्या ठिकाणी तो अहंकारही दिसून येतो. आपल्या कार्याची स्वतंत्र ओळख शिल्लक राहावी किंवा तशा स्वरुपाचे दुसरे कार्य उभे राहू नये अशीही अनेकांची इच्छा असते. परंतु प्रत्येकाचा हा व्यक्तीगत अहंकार आणि अभिमान बाजुला ठेवला आणि प्रत्येकाने आपल्यासारखेच कार्य इतरत्र उभे करण्याचा प्रयत्न केला तर कितीतरी मोठी सामाजिक क्रांती घडून येऊ शकते. यासाठी सेवाकार्याची एक अखंड साखळी निर्माण करणारी व्यवस्था गरजेची वाटू लागते. जर का अण्णा हजारे, हिवरे बाजारचे पोपटराव पवार आनंदवनचे प्रकाश आमटे किंवा इतर सामाजिक कार्यातील व्यक्तींनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला आणि असे कार्य करू इच्छिणाऱ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा निश्चितच सकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतो. कदाचित सरकारलासुध्दा जर या सेवाकार्याचे महत्व लक्षात येत असेल तर त्यातूनसुध्दा या सेवाभावी संस्थांसाठी एक तितकेच सेवाभावी व्यासपीठ निर्माण करता येईल. कोणत्याही सरकारी हस्तक्षेपाशिवाय आणि राजकीय सहभागाशिवाय हे सेवाभावी संस्थांचे व्यासपीठ कार्यरत ठेवता येऊ शकते. सुदैवाने महाराष्ट्राला प्रबोधनाची फार मोठी परंपरा लाभलेली आहे.

कारण इतका व्यापक परिणाम साधणाऱ्या या सेवाभावी संस्थांची कामे किंवा त्या सेवाव्रतींचा प्रभाव हा जर त्या त्या भागापुरताच मर्यादित राहात असेल तर ती एका अर्थी ती सेवाकार्याची आत्मवंचना ठरते. आपल्यासारखेच सेवाकार्य इतरत्रसुरू व्हावे इतराना त्यातून प्रेरणा मिळावी असाच विचार झाला पाहिजे. अगदी बाबा आमटेंच्या प्रकल्पासारखी कामे देशभरात बोटावर मोजण्याइतकीच आहेत. किंवा राळेगणसिध्दी बारीपाडा या ग्रामविकासाचे माडेल सांगणाऱ्या प्रकल्पांचा महाराष्ट्राच्या अन्य भागात प्रसार होऊ शकलेला नाही. आज अनेक लोक आनंदवनला जाऊन तिथल्या कामाची पाहाणी करून येतात देणग्या देऊन येतात. किंवा राळेगणसिध्दीचे कौतुकही आपण अनेकांच्या तोंडून ऐकत असतो. पण त्यातून प्रेरणा घेतली आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात किमान पाच तरी ग्रामीण विकासाची सेवाकार्ये सुरू झालेली आहेत असे दिसत नाही. दुर्दैवाचा भाग असा की सरकारसुध्दा या प्रकल्पांची दखल घेत नाही. आनंदवन, बारीपाडा, हिवरेबाजारसारखा एखादातरी प्रकल्प प्रत्येक जिल्ह्यात आकाराला यावा असा सरकारी प्रयत्नही दिसत नाही.म्हणजे समाजासाठी आवश्यक असलेला परिवर्तनाचा हा प्रयोग आपणही प्रामाणिकपणे राबवला पाहिजे अशी राज्यकर्त्यांनासुध्दा इच्छा होत नाही किंवा अशी स्वयंस्फूर्त सेवाकार्य करणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण संस्थांचे व्यक्तींचे दरवर्षी एखादे संमेलन भरवावे. त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळवावे, आणि समाजाला सहभागी करून घेणाऱ्या सेवाभावी संस्थांचे कार्य अधिक वाढावे असा प्रयत्न सहजपणे राज्यसरकारला करता येऊ शकतो. परंतु घोषणांचा दणदणाट केला जातो. उद्घाटनांचे घंटानाद केले जातात. आणि आम्हीच काय ते राज्यातील जनतेचे किंवा विकासाचे तारक आहोत असे चित्र निर्माण केले जाते. निदान महाराष्ट्राचा सेवाकार्यातला पुढाकार आणि प्रभाव लक्षात घेऊन आणि परिवर्तनाचे प्रभावी माध्यम म्हणून ही सेवाभावाची श्रुंखला संवर्धित झाली पाहिजे.

लक्ष्मीकांत जोशी

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

वाकोल्यातील गुजराल इमारतीला आग

मुंबई – वाकोल्यातील गुजराल इमारतीला आग लागली आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आगीची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

गोविंदाच्या ‘रंगीला राजा’चा ट्रेलर पाहिलात?

मुंबई – अभिनेता गोविंदाचा ‘रंगीला राजा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘रंगीला राजा ही दोन भावांची गोष्ट...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश हवामान

उत्तराखंडमध्ये गारांसह बर्फवृष्टी

देहरादून – उत्तराखंडमध्ये मागील अनेक दिवसांपासून हवामान सतत बदलत आहे. आजही सकाळपासून हिमालयाच्या उंच पर्वत रांगेवर जोरदार पाऊस कोसळत आहे. बदरीनाथमध्ये बर्फवृष्टी होत आहे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा विदेश

मॅच फिक्सिंगप्रकरणी ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरची कबुली

लाहोर – पाकिस्तानी डावखुरा गोलंदाज दानिश कनेरियाने मॅच फिक्सिंगचे आरोप स्विकारले आहेत. मॅच फिक्सिंग प्रकरणात त्याचा सहखेळाडू मर्वेन वेस्टफील्डला तुरुंगवास भोगाावा लागला. कनेरियाने तब्बल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

तब्बल ५० कोटी मोबाईल नंबर बंद होणार?

नवी दिल्ली – देशातील जवळपास ५० कोटी मोबाईलधारकांचे सिम ‘डिस्कनेक्ट’ होण्याची शक्यता आहे. खासगी कंपन्या मोबाइल सिम कार्ड पडताळणीसाठी आधारचा वापर करू शकत नाहीत, असा निर्णय...
Read More