परामर्ष : …वेदनेची ठसठस अजूनही कायम – eNavakal
आघाडीच्या बातम्या लेख

परामर्ष : …वेदनेची ठसठस अजूनही कायम

बरोबर एक वर्षापूर्वी एलफिन्स्टन रोड रेल्वे स्टेशनवर चेंगरा चेंगरीची घटना घडली होती आणि जवळपास एकवीस जणांना अक्षरश: हकनाक आपले प्राण गमवावे लागले. आज वर्षभरानंतर या गोष्टीचा परामर्ष घेताना दसऱ्याच्या आदल्या दिवशी घडलेला हा प्रकार आजही अंगावर काटे उभे करतो. दसऱ्याला लागणाऱी फुलांची खरेदी करण्याकरीता आणि आपल्या आई वडिलांच्या व्यवसायात मदत करणाऱ्या दोन लहान मुलांचा चेंगराचेंगरीत
झालेला दुर्दैवी मृत्यू केवळ नियतीचा घाला म्हणून सोडून देता येत नाही तर सरकारी कारभारातल्या निर्लज्ज कारभारामुळे या चिमुरड्यांना आपला जीव गमवावा लागला ही वस्तुस्थिती डोळ्या आड करता येत नाही.

आज वर्षभरानंतर या आठवणी जागवत असतानाच मुंबईतली गर्दी आणि तिथल्या सामान्य माणसाला आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधादेखील अधिक दुर्मिळ होत असल्याचे दिसून येते. त्याच्या दैनंदिन जीवनावर दिवसेंदिवस किती गंभीर स्वरुपाचे परिणाम होत आहेत हेदेखील तितकेच स्पष्टपणे पाहायला मिळते. यावर्षभरामध्ये खूप काही परिस्थिती बदलली असे म्हणण्याचे कारण नाही. 21 जणांचा बळी गेल्यावर सरकारला जाग येत असेल आणि काही सुधारणा केल्या जात असतील. तर ती काही विशेष गोष्ट ठरत नाही. शासन आणि प्रशासनाच्या पातळीवर सामान्य जनतेच्या सोयीसुविधांचा प्रश्न आजही तसाच दुर्लक्षित असल्याचेच म्हणावे लागते. प्रामुख्याने मुंबईची जीवनवाहिनी म्हणून गणल्या जाणाऱ्या मुंबईच्या उपनगरीय गाड्यांचा प्रवास दिलासा देण्याच्या स्थितीत नाही. उलट गेल्या वर्षात याच तीनही उपनगरीय रेल्वे मार्गांवर वेगवेगळ्या कारणांनी तितकेच बळी गेल्याचे पाहायला मिळते. एकाच दिवशी तब्बल सतरा प्रवाशांचे बळी घेण्याचा विक्रम या उपनगरीय प्रवासाने केला आहे. खरे तर ही घटना घडल्यानंतर युध्द पातळीवर मुंबईच्या उपनगरीय रेल्वेस्थानकाच्या गर्दीचे नियंत्रण राहायला हवे होते. गाड्यांची संख्या वाढवून हा प्रश्न जसा काही प्रमाणात सोडवता येऊ शकतो त्याबरोबरीने उपगनरीय रेल्वे स्थानकांचा परिसर म्हणजेच प्लॅटफॉर्म, पादचारी पूल, वाहनांच्या पार्किंगची सोय , तिकीट खिडक्यांवर होणारी गर्दी या सगळ्यांचाच साकल्याने विचार होणे अपेक्षित होते. वर्षभरात केवळ एलफिन्स्ट्न रोड स्टेशनवरचा पूल विस्तारला गेला नवा पूल आकाराला आला. त्याच्या बरोबरीने अगदीच मोडकळीला आलेल्या अन्य दोन रेल्वे स्थानकांवरचे पूलही दुरुस्त झाले. परंतु स्थानकांमध्ये रोज होणाऱ्या लाखो प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन कसे करावे याची कोणतीही शिस्तबध्द व्यवस्था तयार झालेली नाही. ही गोष्ट तितकीच खरी आहे की सरकारच्या अक्षम्य नाकर्तेपणामुळे मुंबईच्या उपनगरीय सेवेचा कधीच गांभिर्याने विचार झालेला नाही.

मेट्रो रेल्वेला आज मिळत असलेले प्राधान्य, त्यासाठी ओतला जात असलेला करोडो रुपयांचा निधी या सर्व गोष्टी मान्य करीत असताना विद्यमान उपनगरीय रेल्वे मार्गांवरच उन्नत रेल्वे मार्गाचे बांधकाम केले जाणे तितकेच गरजेचे होते. दुर्दैवाने मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येचा किंवा या महानगरात बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांचा कधीच गांभिर्याने विचार झाला नाही. स्वाभाविकपणे अस्तित्वात असलेल्या सेवासुविधांवर त्याचा प्रचंड ताण निर्माण होत गेला. मेट्रो जरी अस्तित्वात आली तरी मुंबईच्या उपनगरीय रेल्वेवरची गर्दी तशीच कायम राहाणार आहे. उपनगरीय रेल्वे स्थानकांमधला गर्दीचा ताणही तसाच राहाणार आहे. कारण मुंबईची भौगोलिक रचना अशा स्वरुपाची आहे की जवळच्या उपनगरात जण्याकरीता किंवा आपापल्या वसाहतीपर्यंत पोहचण्याकरीता मुंबईकर उपनगरीय रेल्वे आणि बेस्ट बसेसच वापर करतात. परिणामी मेट्रोचे प्रवासी पुन्हा आपल्या इच्छित स्थळी जाण्याकरीता काही प्रमाणात उपनगरीय रेल्वेचा वापर करण्याची शक्यता शिल्लक राहाते. शिवाय मेट्रोपेक्षा खूप स्वस्त असलेली ही उपनगरीय सेवा सामान्य माणसाला किंवा रोजंदारीने काम करणाऱ्याला तितकीच महत्वाची वाटत राहाणार आहे. म्हणूनच मेट्रो रेल्वेबरोबरच सध्याच्या उपनगरीय रेल्वे मार्गांवरच उन्नत रेल्वेचा पर्याय आज ना उद्या स्वीकारण्याशिवाय पर्याय राहाणार नाही. यामुळे त्या त्या उपनगरीय रेल्वे स्थानकातील गर्दी निश्चितपणे विभागली जाऊ शकते किंवा त्या गर्दीला नवा आऊटलेट मिळू शकतो. मर्यादित जागा असलेल्या या उपनगराला गर्दीचे वरदान आहे. परंतु हीच गर्दी आता ग्रहणासारखी भेडसावू लागलेली दिसते.

रोजच्या किंवा दैनंदिन जीवनातला उपनगरी प्रवास हा सर्वात जोखीम असलेलाच म्हणावा लागतो. लाखो लोकांच्या रोज होणाऱ्या हालअपेष्टा इतक्या मख्खपणे दुर्लक्षित केल्या जात असतील आणि आधुनिक आणि सुशिक्षित महानगरीतल्या लोकांना चेंगराचेंगरीत आपले प्राण गमवावे लागत असतील तर नियोजनाचे कसे धिंडवडे निघाले आहेत हे वेगळे सांगण्याची गरज उरत नाही. म्हणूनच आज वर्षभरानंतर परिस्थितीत काय बदल झाला या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळत नाही. कारण कोणत्याच प्रभावी उपाययोजनाच होऊ शकलेल्या नाहीत. आणि म्हणूनच त्या दुर्घटनेनंतरच्या वेदनांची ठसठस अजूनही तशीच कायम असल्याचे म्हणावे लागते. आश्चर्य वाटावे अशी परिस्थिती म्हणजे इतक्या या गंभीर प्रकाराची मुंबईच्या लोकप्रतिनिधींनी पाहिजे तशी नोंदच घेतलेली नाही. या विषयावरून संसदेत सरकारला जेरीस आणता आले असते. उपनगरीय सेवेच्या कालबध्द विकासाचे आश्वासन मिळवण्याची तळमळ एकाही लोकप्रतिनिधीने दाखवू नये. याच्या इतकी संवेदनहीनता दुसरी कोणतीच असू शकत नाही.

-लक्ष्मीकांत जोशी
9930680008

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

#MeToo एम.जे.अकबरांचा प्रिया रमाणी विरोधात खटला

दिल्ली – # MeToo परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी पत्रकार प्रिया रमाणी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे.  दिल्ली येथील पटीयाला हाऊस न्यायालयामध्ये त्यांनी...
Read More
post-image
महाराष्ट्र

दृष्काळाच्या मुद्दयावरून राष्ट्रवादी आक्रमक पालकमत्र्यांना दाखविले काळे झेंडे

नाशिक – दुष्काळाच्या प्रश्नावर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. पालकमंत्री गिरिष महाजन आज दुष्काळ पाहणीसाठी सटाणा दौऱ्यावर आले असता राष्ट्रवादीच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

पुढील वर्षीच्या गणेशोत्सवाची तयारी सुरू, लालबाग राजासाठी समिती स्थापन

मुंबई- मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागचा राजा गणेश मंडळावर आता सरकारची नजर राहणार आहे. धर्मादाय आयुक्तांनी लालबागच्या राजासाठी समिती स्थापन केली आहे. गणेशोत्सवाच्या आठ दिवस...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या व्हिडीओ

(व्हिडीओ)अव्नीचे ठसे सापडले; तिला मारून भुसा भरतील?

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (२२-०७-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (०९-०८-२०१८) जगातील महागड्या घरांबद्दल माहित आहे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

नाना पाटेकर यांच्याविरोधात पहिला जबाब नोंदविणार

मुंबई – अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यातील वाद चिघळला असताना या प्रकरणी मुंबई पोलिस सोमवारी प्रमुख साक्षीदार डेजी शाह हिचा...
Read More