पंढरपुरात तुफान गर्दी ! उद्धवजींनी टीकेची धार वाढवली – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

पंढरपुरात तुफान गर्दी ! उद्धवजींनी टीकेची धार वाढवली

पंढरपूर – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पंढरपुरात लाखोंच्या गर्दीत शक्तिप्रदर्शन करीत भाजपावर टीकेचे आसूड ओढत विरोधाची धार वाढवली. उद्धवजी भाषणात म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी आम्ही खांद्याला खांदा लावून लढलो तसे धनगर, महादेव कोळी व इतर जातींच्या न्याय्य हक्कासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आम्ही जगज्जेते आहोत असा समज देशात पसरवला होता त्या समजाच्या ठिकर्‍या उडाल्या. 5 राज्याच्या निवडणुकांत भाजपाचा धुव्वा झाला. मिझोराम आणि तेलंगणात प्रादेशिक पक्ष खंबीर होते तिथे त्यांनी राष्ट्रीय पक्षांना धूळ चारली व ते विजयी झाले. छत्तीसगडच्या आदिवासींनी पर्याय काय आहे याचा विचार न करता घरात जी घाण आहे ती आधी बाहेर फेकली. या सर्वांचे मला कौतुक वाटते.

मी अयोध्येला गेलो होतो ते झोपलेल्या कुंभकर्णाला उठवायला गेलो होतो. महाराष्ट्रातही कुंभकर्ण असाच झोपला आहे. जर कुंभकर्ण उठला नाही तर पेटलेला हिंदू तुझी जागा दाखवेल. मी राममंदिराचा मुद्दा घेतो तेव्हा दुष्काळाचाही मुद्दा आहे. मी जानेवारीत पुन्हा दुष्काळी भागाचा दौरा करणार आहे. हल्ली पहारेकरी चोर्‍या करायला लागले आहेत. केंद्रीय पथक आलं आणि श्राद्ध उरकल्यासारखं करून गेले. पंतप्रधान जग फिरतात त्यांनी इथं येऊन महाराष्ट्राची माती मस्तकी लावली तर थोडं पुण्य मिळेल. शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारकडे योजना नाही त्यांच्या घोषणा म्हणजे सर्व जुमला होता. देशासाठी विमान खरेदीत घोटाळा झाला आहे. सैन्यासाठी विमान खरेदीत घोटाळा होतो आहे. कोर्टाने त्यांना दोषमुक्त कसे केले ते माहीत नाही. सैनिकांना पगारवाढ देत नाही आणि दुसरीकडे त्यांच्या शस्त्र खरेदीत घोटाळा करतात.
सरकारच्या चार कंपन्या असूनही इतर 12 खाजगी कंपन्यांना विम्याचे काम दिले. शिवरायांचा महाराष्ट्र हे खपवून घेणार नाही. ज्या कंपन्यांचा विम्याशी संबंध नाही त्यांना काम दिले. हजारो कोटी लुटून या कंपन्या गेल्या. तुमच्या क्लिन चिटशी मला काही घेणे-देणे नाही. माझ्या शेतकर्‍याचा सातबारा कोरा करा, असे मी विठोबाला साकडे घातले. ज्यांनी जनतेला लुबाडले त्यांचे जनतेने वाकडे करावे. युती करायची की नाही ते जनता ठरवेल. न्याय मागणं गुन्हा असेल, जर सरकारला धारेवर धरणे गुन्हा असेल तर मी तो गुन्हा करणार. हिंमत असेल तर मला शिक्षा करून दाखवा.

केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकर्‍यांना 32 हजार कोटींची कर्जमाफी दिल्याचे सांगते. परंतु एकाही शेतकर्‍याचे कर्ज माफ झालेले नाही किंवा एकाही शेतकर्‍याला विम्याची रक्कम मिळालेली नाही. एकीकडे जय जवान आणि जय किसान म्हणायचे, तर दुसरीकडे जवानांच्या शस्रखरेदीमध्ये घोटाळा करायचा आणि किसानांच्या विमा योजनेमध्ये घोटाळा करायचा. जे विम्याचे पैसे त्यांना दोन महिन्यात मिळायला पाहिजे होते, ते 9-9 महिने झाले तरी शेतकर्‍यांना विम्याचे पैसे मिळत नाहीत. हिंमत असेल तर सर्व शेतकर्‍यांची कर्ज माफ करा, शेतकर्‍यांच्या मुलांची फी माफ करा. मला राममंदिर बांधून पाहिजे. शिवसेना हे मधाचे पोळे आहे. मधाच्या पोळ्यावर दगड मारला तर ते मोहोळ उठल्याशिवाय राहणार नाही.

नितीशकुमार आणि पासवान यांनी भाजपाला झुकवले. ज्या नितीशकुमारनी संघ मुक्त भारत करण्याचा निर्णय घेतला होता त्यांच्या मांडीला मांडी लावून भाजपा बसते. राममंदिरबाबत नितीशकुमार आणि पासवान यांची भूमिका काय आहे. मी राममंदिराचा मुद्दा घेतला आहे. हो आणि निवडणुकीवेळी घेतला आहे. दरवेळी आम्ही हिंदुत्त्वासाठी यांना मते देतो. ते आता सांगतात की, हा मुद्दा कोर्टात आहे. पण बाबरी पाडली तेव्हा ही अक्कल नव्हती का? राममंदिराच्या मुद्यावरून गादी मिळवलीत आणि मग लोळत बसलात. राममंदिराचा मुद्दा कोर्टात जाईल, हे तुम्हाला त्यावेळी माहित नव्हते का? त्याचवेळी आम्हाला राममंदिर का बांधू दिले नाही? बाबरी पाडल्यानंतर अनेकांच्या अंगावर केसेस पडल्या. अद्यापही या केसेस सुरू आहेत. सोहराबुद्दी खटल्यातून सर्व आरोपी निर्दोष सुटतात मग या खटल्याच्या तारखांवर तारखा का पडतात? तुम्हाला हव्या त्या खटल्याचे निकाल तुम्ही हवे तसे लावून घेता मग बाबरी पाडल्याच्या खटल्याचा निकाल का लागत नाही. आता जाहिराती करा की, बाबरी पाडली. होय मी लाभार्थी! आता सर्वांच्या मोबाईल, संगणकात घुसणार आहेत. काही केलं की काँग्रेसने केले सांगतात. पण काँग्रेसनी केलं म्हणून त्यांना हाकलले. तर त्या काँग्रेसला मांडीवर का घेता? मला कर्जमाफी पाहिजे, मला विम्याचे हप्ते पाहिजेत, मला राममंदिर पाहिजे. सत्तेचे जागा वाटप गेले खड्ड्यात. सरकारला इशारा देतोय, कांदा प्रश्न किती दिवसात सोडवताय? कर्जमाफी मिळालेला शेतकरी कधी दाखवताय? विम्याचा हप्ता मिळालेला कधी दाखवताय? माझ्या शिवसेनेच्या शाखा आता आधार देतील. तो मल्ल्या किंवा मोदी नाही. ती औलाद तुमच्याकडे आहे. आता शिवसेनेचे राज्य आणण्याची वेळ आली आहे. या सरकारने गोवंश हत्याबंदी केली, पण हा गोवंश चारा, पाणीविना तडफडतोय. भाजपाला एवढेच सांगतोय, अच्छे दिन, 15 लाख हे जुमले होते. पण देवाच्या नावाने जुमला केला तर ठोकून काढू. यापुढे शिवसेनेची सत्ता येणारच आणि शिवसेनेची सत्ता आली की गोधनासाठी अर्थसहाय्य देणार.

पीक विमा योजनेत घोटाळा झाला आहे
32 हजार कोटींची कर्जमाफी केली म्हणून सांगतात, विम्याचे हप्ते मिळाले म्हणून सांगतात, पण हे लाभ मिळालेला एकही शेतकरी नाही. पिक विमा योजनेतही घोटाळा झालेला आहे. मग हिंदुत्त्वासाठी टाळ वाजवत फिरायचे का?

मुख्यमंत्री, दानवेंच्या विरोधात घोषणाबाजी

उद्धव ठाकरे पंढरपुरात पोहोचण्यापूर्वीच शिवसैनिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात जोरदार घोषणा दिल्या. ‘रावसाहेब दानवेंचे करायचे काय, खाली डोके वर पाय’, ‘राम मंदिर झालेच पाहिजे’, ‘मुख्यमंत्री हाय हाय’, अशा घोषणा देण्यात आल्या.
उद्धव ठाकरेंच्या दौर्‍यासाठी

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची महासभा आणि चंद्रभागेच्या महाआरतीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातून पोलीस तुकड्या मागविण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स, क्विक रिस्पॉन्स फोर्स, डॉग स्क्वॉडसही मागविण्यात आले होते. या सर्वांचा पंढरपूरात ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त होता. उद्धव ठाकरे यांनी भेटी दिलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, चंद्रभागा मैदानातील व्यासपीठ, चंद्रभागा नदीवरील इस्कॉन घाट यांची डॉग स्कॉडद्वारे व मेटल डिटेक्टरद्वारे उद्धव ठाकरेंच्या भेटीपूर्वी पाच मिनिटांपूर्वी काटेकोर तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे पंढरपूरच्या नागरिकांनी कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये, असे आगाऊ आवाहन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले होते. यावेळी प्रथमच पोलिसांना ‘क्यूआर’ (क्वीक रिस्पॉन्स) कोडिंगची ओळखपत्रे देण्याचा प्रयोग जिल्हा पोलीस प्रशासनाकडून करण्यात आला होता. त्यामुळे बंदोबस्तात सुलभता आली. ‘क्यूआर’ कोडिंगची ओळखपत्रे दिल्याने पोलिसांची ड्युटीची ठिकाणे तत्काळ समजत होती. स्वेरी इंजिनीअरिंग कॉलेजच्या मदतीने या ‘क्यूआर’ कोडिंगच्या ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले होते.

विठोबाची नगरी झाली शिवसेनामय व भगवेमय
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पंढरपूर दौर्‍यावर येण्यापूर्वी दोन दिवसांपासूनच संपूर्ण पंढरपूर भगवेमय झाले होते. सर्वत्र भगवे झेंडे, भगव्या कमानी, रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या शेकडो मीटर लांबीच्या भगव्या कापडाची झालर, उद्धव ठाकरे यांचे ठिकठिकाणी लावलेले भव्य कटआऊटस, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासहित उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे कटआऊटस व ‘विठूनामाचा जयजयकार, पहले मंदिर-फिर सरकार’ लिहिलेले डझनावारी बॅनर यामुळे संपूर्ण पंढरपूर शिवसेनामय झाले होते.

विठुरायाच्या मंदिरापासून मठापर्यंत येण्याचा रस्ता नव्याने बनवून घेण्यात आला आहे. मठापर्यंत येणार्‍या रस्त्यावर तसेच मंदिरापासून चंद्रभागा नदीपर्यंत जाणार्‍या रस्त्यांवर शिवसेनेचे शेकडो झ्रेंडे व भगव्या कपड्यांच्या शेकडो फूट लांबीच्या पट्ट्या लावण्यात आल्या होत्या. पंढरपूरचा सर्व आसमंत भगवा झाला होता.
शिवसेनेचे भव्य व्यासपीठ धनुष्याच्या आकाराचे बनविण्यात आले होते. व्यासपीठाचे छत धनुष्याच्या आकाराचे व भगव्या रंगाचे होते. व्यासपीठावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य चित्र चितारलेले होते. उद्धव ठाकरे यांच्या ऐतिहासिक महासभेला सुमारे 3 ते साडेतीन लाख शिवसैनिक जमले होते. सर्वात लक्षणीय गोष्ट म्हणजे महाराष्ट्रभरातून आलेल्या शेकडो महिला कार्यकर्त्या भगव्या साड्या व भगव्या चोळ्या घालून  आल्या होत्या.

आधी विठोबाचे दर्शन मग विश्रामगृहावर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पंढरपुरच्या हेलिपॅडवरून प्रथम विश्रामगृहावर जाणार होते. नंतर तेथून दुपारी 3.30 वाजता विठ्ठल -रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी जाणार होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी अचानक कार्यक्रमात बदल केला व ते दुपारी 2 वाजताच पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह तडक विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात गेले.
विठ्ठल-रु़िक्मणी मंदिरात उद्धव ठाकरे यांनी प्रवेश करताच ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेंब ठाकरे यांचा विजय असो’, ‘हर हिंदू की यही पुकार- पहले मंदिर- फिर सरकार’, ‘आवाज कुणाचा- शिवसेनेचा’ अशा घोषणांनी विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर दणाणून गेले. विठ्ठल -रुक्मिणी मंदिर समितीतर्फे उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांचा तुळशीच्या पानांचा जाडजूड हार घालून सत्कार करण्यात आला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्नीसह विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले व पूजा केली.

अयोध्येनंतर उद्धवजींनी पंढरपूरच का निवडले

अयोध्येमध्ये शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन केल्यावर उद्धव ठाकरे यांनी पंढरपूरचीच निवड का केली? हा प्रश्न भाजपासहित सर्वच राजकीय पक्षांना पडला आहे. परंतु शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे जसे धक्कादायक निर्णय घेण्यात निष्णात होते. त्याच मुशीत तयार झालेल्या उद्धव ठाकरे यांनी पंढरपूरची निवड केली. त्याचे प्रमुख कारण म्हणजे अयोध्येत राममंदिर बांधण्यासाठी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या सावळाराम (विठ्ठल) याला उद्धवजींना साकडे घालायचे होते. विठुमाऊली हे शेतकर्‍यांचे, कष्टकर्‍यांचे व सामान्यांचे दैवत आहे. महाराष्ट्रातील कष्टकरी व शेतकरी आज संकटात आहे. त्यामुळे प्रभू श्रीरामाचे जे कार्य शिवसेना पुढे घेऊन जात आहे. त्यामुळे अयोध्येनंतरचा पुढील टप्पा म्हणून उद्धवजींनी पंढरपूरची निवड केली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

येडीयुरप्पा अडचणीत! मंत्री, आमदार नाराज

बंगळुरू – काँग्रेस, जनता दल (सेक्युलर) व अपक्ष आमदारांना फोडून, कुमारस्वामी सरकार पाडून कर्नाटकात सत्तेवर आलेल्या भाजपाच्या येडीयुरप्पा सरकारलाच आता आमदारांच्या बंडखोरीचा सामना करावा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र वाहतूक

मंगला एक्स्प्रेसचं इंजिन बिघडलं! मध्य रेल्वेचा आजही खोळंबा

ठाणे – सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वे खोळंबली असून प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. टिटवाळा येथे मंगला एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने कसाऱ्याच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

…तर पुन्हा विमा कंपन्यांविरोधात आंदोलन! उद्धव ठाकरेंचा दोन्ही सरकारना इशारा

मुंबई – महाराष्ट्रातील पूरसमस्या ओसरल्यावर शिवसेनेने महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या पीक विमा प्रश्‍नावर पुन्हा लक्ष केंद्रीत केले आहे. शिवसेनेने जून महिन्यात शेतकर्‍यांच्या पीक विम्याचे पैसे न...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

संभाजी ब्रिगेडकडून विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

औरंगाबाद – राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. यंदा संभाजी ब्रिगेड संघटनाही स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी,...
Read More
post-image
देश

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या घरावर, कार्यालयांवर ईडीचे छापे

नवी दिल्ली – दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात असलेल्या जेट एअरवेजच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने छापेमारी केली आहे. तसेच जेट एअरवेजचे संस्थापक नरेश...
Read More