जालना -भाजपला रामराम ठोकल्यानंतर एकनाथ खडसे याांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे. भाजपमध्ये अनेक नेत्यांवर अन्याय होतोय, त्यात पंकजा मुंडेही आहेत. त्यामुळे पंकजा यांनी शिवसेनेत येण्याची विनंती शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी केली आहे. आता या आवाहनाला पंकजा मुंडे कसा प्रतिसाद देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
यावर शिवसेना नेते अर्जुन खोतकर म्हणाले की, “भाजपने जे पेरले तेच आता उगवत आहे. मागच्या पाच वर्षात भाजपने मेगा भरती केली, आता भाजपला उतरती कळा लागली आहे. एकनाथ खडसेंसारखे मोठे नेते आज राष्ट्रवादी पक्षात जात आहेत. त्यांच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. आजही भारतीय जनता पक्षात अनेक प्रमुख नेते नाराज आहेत . त्यांनी त्यांच्या बुध्दीप्रमाणे निर्णय घ्यावा आणि पक्षांतर करावे. पंकजा मुंडे जर आमच्या पक्षात आल्या तर त्याचा आम्हाला आनंद आहे. त्यांच्यासाठी आमच्या पक्षाची दारे नेहमीच खुली आहेत. मी शिवसेनेचा सच्चा कार्यकर्ता म्हणून त्यांना विनंती करतो त्यांनी आता शिवसेनेत प्रवेश करावा. त्याच काय आणखी कोणी भाजप नेता जर आमच्या पक्षात आला तर त्याचा आम्हाला आनंदच आहे, आम्ही त्यांचे स्वागत करू.”