नाणार रद्द! नाणारवासियांनी अखेर सरकारला झुकवले – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

नाणार रद्द! नाणारवासियांनी अखेर सरकारला झुकवले

मुंबई – अखेर नाणार प्रकल्प आज रद्द झाला. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याच्या अधिसुचनेवर सही केली. त्यानंतर उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्प रद्द झाल्याची घोषणा केली. कोकणातील राजापूर आणि देवगड तालुक्यातील गरिब शेतकर्‍यांनी दीर्घकाळ चालविलेल्या संघर्षाचा आज विजय झाला. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती करायची असेल तर आधी नाणार प्रकल्प रद्द करा अशी अट शिवसेनेने ठेवली होती. या अटीपुढे हतबल झालेली भाजपा नमली. शिवसेनेने सरकारच्या नाकीनऊ आणल्याने आणि नाणार प्रकल्पवासियांनी एकजूट कायम ठेवल्यामुळे आजचा ऐतिहासिक विजय मिळाला.

आता नाणार प्रकल्पासाठी घेतलेल्या राजापूर आणि देवगड तालुक्यातील 16 गावांमधील शेतकर्‍यांच्या जमिनी त्यांना परत केल्या जाणार आहेत. तसेच शेतकर्‍यांच्या 7/12 वर बसलेला एमआयडीसीचा शिक्काही काढून घेतला जाणार आहे. शेतकर्‍यांच्या मनाप्रमाणे निर्णय झाला आहे. गरिब आणि छोटे भुधारक शेतकर्‍यांना एकत्र आणून त्यांची ‘कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समिती’ बनवून निकराचा लढा देणारे त्यांचे नेते अशोक वालम यांचाही या विजयात मोठा वाटा आहे. प्रकल्पविरोधी आणि सरकारविरोधी आंदोलन करतानाच शिवसेनेसारख्या शेतकर्‍यांना बळ देणार्‍या पक्षांचा पाठिंबा मिळविण्याचे काम अशोक वालम यांनी केले. ‘गाव करी ते राव काय करी’ या म्हणीचा प्रत्यय या गरिब शेतकर्‍यांच्या आंदोलनाने जगाला आणून दिला.

आज मंत्रालयात मंत्रिमंडळ उपसमितीची महत्वपूर्ण बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना आशवासन दिल्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द केला व तशी अधिसूचनाही काढली.  त्यानंतर सुभाष देसाई यांनी पत्रकारांना सांगितले की, बहुचर्चित नाणार रिफायनरीच्या भूसंपादनाची अधिसूचना 18 मे 2017 रोजी काढण्यात आली. या प्रस्तावित प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला. गेली दोन-पावणेदोन वर्षे प्रकल्पग्रस्त आंदोलन करीत होते. विधिमंडळातही यावर चर्चा होऊन विविध आयुधे वापरून नाणारला विरोध झाला होता. वाढत्या विरोधामुळे नाणार प्रकल्प रद्द करावा लागला. उद्योग खात्यामार्फत नाणारची अधिसूचना रद्द व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठविला होता. त्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी आज सही केली. हा निर्णय गॅझेटमध्ये लवकरच प्रसिद्ध होईल अशी माहिती देसाई यांनी दिली. तसेच निवडणुकीनंतर पुन्हा या प्रकल्पाची अधिसूचना काढणार का? असा सवाल त्यांना विचारला असता, ते शक्य नाही असे देसाई यांनी स्पष्ट केले. जेथे विरोध नसेल तिथे हा प्रकल्प होऊ शकतो, पण नाणार येथे होणार नाही, असे देसाई यांनी स्पष्ट केले.

नाणार रिफायनरी म्हणजेच तेल शुध्दीकरण प्रकल्प हा तीन लाख कोटी रुपये खर्च करून उभारला जाणार होता. हा प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील 14 गावांमधील व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील दोन गावांमधील एकूण 13 हजार एकर जमिन घेऊन त्यावर उभारला जाणार होता. या प्रकल्पासाठी 3 हजार लोकांचे पुनर्वसन करावे लागणार होते. भारत सरकारची हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑईल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांनी सौदी अरेबियाच्या ‘आरामको’ कंपनीशी करार करून हा प्रकल्प उभारण्याचे ठरविले होते. त्यासाठी ‘रत्नागिरी रिफायनरी पेट्रोकेमिकल लिमिटेड’ या कंपनीचीही स्थापना करण्यात आली होती.

मात्र या प्रकल्पामुळे आंब्याच्या उत्पादनावरती विपरित परिणाम होणार होता. राजापूर आणि देवगड येथील हापूस आंबा हा जगप्रसिध्द आहे. या जगप्रसिध्द हापूस आंब्याला हा प्रकल्प करपवून टाकणार होता. तसेच छोट्या-छोट्या भुधारक शेतकर्‍यांच्या जमिनी गेल्यामुळे त्यांचे आयुष्यच उध्वस्त झाले होते. तसेच या गावकर्‍यांचे पुनर्वसन त्यांच्या गावाशी असलेली नाळ तोडून इतरत्र केले जाणार होते. त्यामुळे आपली वाड-वडिलांपासून जपलेली संस्कृती व जीवन उध्वस्त होणार यामुळे या 16 गावांतील गावकरी सतत 3 वर्षे प्रखर संघर्ष करीत आहेत. या संघर्षात महिला सर्वात आघाडीवर होत्या. या सर्वांच्याच संघर्षाचे आज चीज झाले आणि नाणार हद्दपार झाला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

शिमल्यात सफरचंदाहून महाग झाला कांदा

देहरादून – हिमालयवासीयांना देखील कांद्याने यावर्षी रडविले आहे. हिलस्टेशन शिमल्यामध्ये कांदा सफरचंदाहून महाग झाला आहे. पंधरा दिवसांपासून कांद्याच्या भावात लाक्षणीय वाढ झाली आहे. 40...
Read More
post-image
News महाराष्ट्र

एमआयएमचे दरवाजे बंद आहेत! पुण्यात प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य

पुणे – विधानसभा निवडणुकीकरिता युती करण्यासाठी एमआयएमकडून दरवाजे बंद आहेत. मात्र, वंचित आघाडी एकत्र येण्यास तयार आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर...
Read More
post-image
News मुंबई

हार्दिक पंड्याने पहिल्यांदाच दिली प्रेमाची कबुली

मुंबई- हार्दिक पंड्याच्या आयुष्यात पुन्हा एका नव्या प्रेमाची एन्ट्री झाली आहे. आपल्या हेलिकॉप्टर शॉटने भल्याभल्या गोलंदाजांना भोवळ आणणारा हार्दिक अभिनेत्री, डान्सर नताशा स्टेन्कोविकच्या प्रेमात...
Read More
post-image
News देश

आसाराम बापूला दणका! हायकोर्टाने याचिका फेटाळली

जयपूर – अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी आध्यात्मिक गुरु आसाराम बापुला राजस्थान हायकोर्टाने जोरदार दणका दिला. याप्रकरणी झालेली जन्मठेपेची शिक्षा रद्द व्हावी, यासाठी आसाराम बापुने दाखल...
Read More
post-image
News देश

जादवपूर विद्यापीठाबाहेर अभाविपच्या कार्यकर्त्यांची पोलिसांवर दगडफेक

कोलकाता – कोलकातामधील जादवपूर विद्यापीठाबाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियोंना झालेल्या धक्काबुकीच्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी जमा झाले आहेत....
Read More