नागपूर – नागपुरात आज सकाळी सर्वांना धक्का देणारी भीषण दुर्दैवी घटना घडली आहे. नागपूरमधील डॉक्टर धीरज राणे त्यांची पत्नी सुषमा राणे, त्यांचा अकरा वर्षाचा मुलगा आणि सहा वर्षांची मुलगी हे त्यांच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळले. त्यापैकी त्यांची पत्नी घरातील दुसऱ्या खोलीमध्ये गळफास घेतलेल्या आणि लटकलेल्या अवस्थेत सापडली. या संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली आहे. तशी सुसाईड नोट धीरज राणे यांच्या घरात मिळाली आहे. मात्र पोलिसांनी ही सुसाईड नोट खळबळजनक असल्याने त्यातील मजकूर प्रसिद्धी माध्यमांसमोर उघड केलेला नाही.
धीरज राणे हे धंतोली येथील रुग्णालयात डॉक्टर आहेत. त्यांची पत्नी ही उच्चशिक्षित आहे. या कुटुंबियांसोबत धीरज राणे यांची आई आणि आत्यादेखील राहते. मात्र काल रात्री त्या दोघीही दुसऱ्या खोलीत झोपल्या होत्या.
सकाळी खूप वेळ झाला तरी डॉक्टर धीरज राणे आणि त्यांची पत्नी सुषमा राणे हे आपल्या खोलीतून बाहेर आले नाहीत, म्हणून या दोघींनी दरवाजा ठोठावला. मात्र कुठचाही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी घराशेजारच्या लोकांना गोळा केले व पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी दरवाजा तोडला असता धीरज राणे आणि त्यांचा अकरा वर्षांचा मुलगा व सहा वर्षांची मुलगी हे एकाच पलंगावर झोपलेल्या अवस्थेत आढळले. तर त्यांची पत्नी खोलीतील दुसऱ्या भागात गळफास घेतलेल्या व लटकलेल्या अवस्थेत सापडली. हे सर्वजण मृतावस्थेत होते. एवढ्या उच्चशिक्षित आणि श्रीमंत असलेल्या कुटुंबाने सहपरिवार आत्महत्या केल्याने संपूर्ण नागपूर शहरात एकच खळबळ माजली आहे.