सिनेसृष्टीत सर्वाधिक मानाचा समजला जाणारा ९२वा ऑस्कर पुरस्कार सोहळा आज हॉलिवूडच्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडला. यंदा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर दक्षिण कोरिअन सिनेमा पॅरासाईटला मिळाला आहे. ऑस्करच्या इतिहासात पहिल्यांदाच परदेशी भाषेतील चित्रपटाला हा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कारही याच चित्रपटाला मिळाला. तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पटकथा, आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट असे एकूण चार पुरस्कार पॅरासाईटला मिळाले आहेत. तर सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला जोकर चित्रपटाचा नायक हॉकिन फीनिक्स आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली ज्युडी साकारणारी रेनी झेल्विगार.
हॉलिवूडमध्ये यावर्षी रेनी झेल्विगारचाच बोलबाला राहिला आहे. बाफ्टा, गोल्डन ग्लोब, क्रिटिक चॉईस असे वर्षभरातील जवळजवळ सर्वच पुरस्कार तिने पटकावले. आता सिनेसृष्टीत सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्काराने तिला गौरविण्यात आले. ५० वर्षीय रेनीचा ऑस्करपर्यंतचा प्रवास अजिबातच सोपा नव्हता. विशेष म्हणजे हा तिच्या आयुष्यातला पहिला ऑस्कर नव्हता. २००३ साली Cold Mountain या चित्रपटातील सहाय्यक भूमिकेसाठी तिला ऑस्कर मिळाला होता.
‘ज्युडी गारलँड’ या अमेरिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भूमिका ‘ज्युडी’ चित्रपटामध्ये रेनीने साकारली आहे. एक उत्तम अभिनेत्री, नर्तिका आणि गायिका म्हणून ज्युडी गारलँड यांनी अमेरिकेतील हॉलिवूड इंडस्ट्रीची तब्बल चार दशकं गाजवली. १९६१ मध्ये ‘Judy at Carnegie Hall’ या लाईव्ह रेकॉर्डिंग अल्बमसाठी त्यांना ग्रामी पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या. याच ‘ज्युडी’ यांची भूमिका ‘रेनी’ने मोठ्या पडद्यावर साकारली आहे. याच भुमिकेसाठी तिला ऑस्करने गौरविण्यात आले.
रेनीचा जन्म २५ एप्रिल १९६९ साली एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. तिच्या वडिलांचा रिफायनरी कंपनीचा व्यापार होता. रेनी महाविद्यालयात शिकत असताना काही कारणामुळे त्यांची नोकरी गेली. त्यामुळे तिला स्वत: नोकरी करून आपलं शिक्षण पूर्ण करावं लागलं. याकाळात तिने एका क्लबमध्ये वेट्रेस म्हणून काम करणं सुरू केलं. तिला या कामातून जे पैसे मिळायचे त्यातून ती आपली फी भरायची. रेनीला तेव्हा अभिनयाची प्रचंड आवड होती. कामासोबत तिने आपली ही आवडही जोपासली. नोकरीसोबत तिने काही नाटकांमध्येही काम केले. त्यानंतर तिला एका जाहिरातीत काम करण्याची संधी मिळाली. ही जाहिरात केल्यानंतर तिला ‘स्क्रीन अॅक्ट्रेस गिल्ड कार्ड’ मिळालं.
१९९२ नंतर तिने लहान-मोठ्या चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. १९९४ साली तिचा एक हॉरर चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट विशेष प्रसिद्ध झाला नाही. मात्र या चित्रपटात काम करणाऱ्या ‘रेनी’ची प्रेक्षकांवर विशेष छाप पडली. प्रसारमाध्यमांमध्ये तिची चर्चा रंगली आणि तिचा प्रचंड चाहतावर्ग निर्माण झाला. १९९६ साली रेनीने Jerry Maguire या चित्रपटात ‘सिंगल मदर’ची भूमिका साकारली होती. या चित्रपटात तिने टॉम क्रूजसोबत काम केले. विशेष म्हणजे या भुमिकेसाठी टॉम क्रूजनेच तिचे नाव सुचवले होते. त्यामुळे ती अधिकच लोकप्रिय झाली.
यशाच्या शिखरावर असताना २०१० साली रेनीने मनोरंजन सृष्टीपासून मोठा ब्रेक घेतला होता. तिच्या या ब्रेकमुळे तिचे चाहते प्रचंड नाराज झाले होते. मात्र २०१६ साली तिने पुन्हा दमदार कमबॅक केलं आणि पुन्हा चाहत्यांचे मन जिंकले.