मुंबई – आज संध्याकाळी वांद्रे म्हाडा भवनात म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत व मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मुंबईसाठी 1384 घरांची लॉटरी जाहीर केली. या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्जाच्या नोंदणीची तारीख 5 नोव्हेंबर 2018 अशी आहे. तर अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक 10 डिसेंबर 2018 आहे आणि 16 डिसेंबर रोजी म्हाडा भवनात लॉटरी काढण्यात येणार आहे, अशी लॉटरीची रूपरेषा जाहीर करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे लॉटरीतील सर्वाधिक किमतीची सदनिका कंषाला हिल, धवलगिरी ग्रँटरोड येथे 5 कोटी 80 लाख रुपये इतकी आहे. 965 स्क्वेअर फुटांच्या एकूण दोन सदनिका आहेत. यंदाच्या लॉटरीतील घरांच्या किमती 25 ते 30 टक्के दराने कमी असल्याचा दावा म्हाडाच्या अध्यक्षांनी केला आहे. असे असले तरी ग्रँटरोड येथील 5 कोटी 80 लाख रुपये किमतीची सदनिका महागडी असल्याची चर्चा मुंबईकरांमध्ये आहे. तर पवई चांदिवली येथे 14.15 हजार कमी किमतीच्या सदनिका आहेत.
मुंबईसाठी 1384 घरांसाठी निघणार्या लॉटरीत अत्यल्प उत्पन्न गटाच्या 63 सदनिका, अल्प उत्पन्न गटासाठी 923, मध्यम उत्पन्न गट 201, उच्च उत्पन्न गटासाठी 194 अशी संख्या आहे. यात बांधकाम चालू असलेल्या सदनिका 1112, विखुरलेल्या सदनिका 272 आहेत. 1384 लॉटरीतील घरांच्या विक्रीतून म्हाडाला 587 कोटी 11 लाख महसूल मिळणार आहे.