तृणमूलचे आता ‘लाव रे तो व्हिडीओ’! भाजपाने दंगल घडविल्याचे 42 व्हिडीओ दाखवतो – eNavakal
News देश

तृणमूलचे आता ‘लाव रे तो व्हिडीओ’! भाजपाने दंगल घडविल्याचे 42 व्हिडीओ दाखवतो

कोलकाता – लोकसभा निवडणूक संपायला चार दिवस असतानाच पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी आव्हान देऊन कोलकात्यात मंगळवारी रोड शो केला आणि कोलकाता पेटले. आता या जाळपोळ, दगडफेक व तोडफोडीबद्दल भाजपाने तृणमूल काँग्रेसला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले. तर तृणमूल काँग्रेस भगवे कपडे घालून तोडफोड करणार्‍या भाजपा कार्यकर्त्यांचे 42 व्हिडीओच निवडणूक आयोगासमोर ठेवणार आहे. आता राज ठाकरे यांच्याप्रमाणे तृणमूलही ‘लाव रे तो व्हिडीओ’चा प्रयोग करणार आहे.

मंगळवारच्या तोडफोडीत पश्चिम बंगालचे थोर समाजसुधारक इश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा फोडला गेल्याने बंगालमध्ये तणाव आहे. आज या विद्यासागरांचा पुतळा फोडल्याचा निषेध करण्यासाठी विविध पक्षांनी भाजपाविरोधात मोर्चे काढले. ममता बॅनर्जी यांनी तर काल रात्रीच फोडलेल्या पुतळ्याच्या कपच्या मस्तकी लावून घरी नेल्या.
मंगळवारी अमित शहा यांनी तृणमूल काँग्रेसला आव्हान देत कोलकात्याच्या धर्मतल्ला भागातील शहीद मिनार मैदानातून आपला ‘रोड शो’ सुरू केला. हा रोड शो मेडिकल कॉलेजजवळ येताच तृणमूल काँग्रेसच्या छात्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे, निषेधाचे बॅनर व फ्लेक्स दाखविले. त्यामुळे चिथावलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी तोडफोड व जाळपोळ केली. तसेच या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. त्यात अनेकजण जखमी झाले.
तृणमूल काँग्रेसने या दंगलीचा व्हिडीओच तयार केला आहे. तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन व विद्यासागर कॉलेजचे प्राचार्य गौतम कुंडू यांनी आरोप केला की, भाजपाने दिल्ली, युपी, झारखंड व बिहारमधून आणलेल्या गुंडांनी विद्यासागर कॉलेजात घुसून तोडफोड केली व मोटारसायकली जाळल्या. दिल्लीचा गुंड तेजिंदर बग्गाला यावेळी अटक करण्यात आली. हा दिल्लीचा तेजिंदर बग्गा कोलकात्यात काय करत होता? असा सवाल तृणमूलने उपस्थित केला आहे.
तर विद्यासागर कॉलेजचे सर्व दरवाजे बंद होते. मग भाजपा कार्यकर्ते कॉलेजात घुसतीलच कसे? असा बचाव भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. त्यावर तृणमूल काँग्रेसने आज भाजप कार्यकर्ते कॉलेजचे रेलिंग तोडून व त्यावर चढून कॉलेजात घुसत असल्याचा व्हिडिओ व फोटो पत्रकारांना दाखविला. थोर समाजसुधारक व शिक्षणमहर्षी इश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा फोडण्यात आल्याने बंगाल क्षुब्ध आहे. हा पुतळा भाजपा कार्यकर्त्यांनीच फोडला असा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. मंगळवारी रात्री ममता बॅनर्जी यांनी या पुतळ्याला भेट दिली व तोडलेल्या पुतळ्याच्या कपच्या मस्तकाला लावून त्यांनी त्या घरी नेल्या.
आज सकाळी तृणमूल काँग्रेसच्या छात्र संघटनेने इश्वरचंद्र विद्यासागर यांचे फोटो व फलक घेऊन मोर्चा काढला. दिल्लीत सकाळपासून भाजपाने तृणमूलचा निषेध करण्यासाठी जंतरमंतरवर मूकधरणे धरले होते. तर संध्याकाळी पाच वाजता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अमित शहांच्या ‘रोड शो’च्या मार्गावरून भव्य ‘रोड शो’ केला.
त्यापूर्वी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्स लेनिन) यांनीही भाजपाचा निषेध करणारा मोर्चा काढला. काँग्रेस पक्षानेही मोर्चा काढून भाजपाचा निषेध केला. कधी नव्हे, ते इश्वरचंद्र विद्यासागर यांचे फोटो कोलकात्याच्या रस्त्यावर झळकले.
भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन कालच्या ‘रोड शो’मध्ये आपल्यावर तीन हल्ले झाल्याचा आरोप केला. केवळ सीआरपीएफ जवानांमुळे आपण वाचलो, असा दावा त्यांनी केला. निवडणूक आयोगाने बघ्याची भूमिका घेतल्याचा त्यांनी आरोप केला. मात्र सीआरपीएफसहीत सर्व निमलष्करी दले केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अधिकारात आहेत. निवडणुकीच्या काळात कोलकाता पोलिसांपेक्षा त्यांचाच सर्वत्र पहारा आहे. ही निमलष्करी दले भाजपाचेच हुकूम पाळतात, असा दावा तृणमूल काँग्रेसने केला आहे. आरोप-प्रतिआरोप, हल्ले-प्रतिहल्ले यामुळे कोलकाता हिंसाचारात होरपळत आहे.

पश्चिम बंगालमध्ये एक दिवस
आधीच प्रचार थंडावणार

पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान उसळलेल्या हिंसाचाराची गंभीर दखल घेत केेंद्रीय निवडणुक आयोगाने राज्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार मुदतीआधीच समाप्त करण्याचा अभुतपूर्व निर्णय घेतला आहे. उद्या गुरुवारी रात्री 10 वाजताच प्रचार थांबविण्याचे आदेश आयोगाने जारी केले आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला प्रचार करण्यास बंदी घातली आहे. हिंसाचारासंबंधी कोणताही व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्यासही बंदी घातली आहे. तसेच पश्चिम बंगालच्या गृह सचिवांनाही त्यांच्या पदावरून हटवत मुख्य सचिवांकडे या खात्याचा पदभार सोपवण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर ममता बॅनर्जी यांनी तोफ डागत म्हटले की, पंतप्रधान मोदींना त्यांच्या दोन सभा पूर्ण करण्यासाठी निवडणूक आयोगाने वेळ दिला आहे. आयोगाच्या निर्णयामुळे माझा प्रचार थांबणार आहे. असा निवडणूक आयोग मी माझ्या आयुष्यात पाहिला नाही.

मोदींना एकही मत देऊ नका
त्यांना हद्दपार करा – ममता बॅनर्जी

केेंद्रीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये प्रचारावर एक दिवसआधी बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चांगलीच आगपाखड के ली. प्रचार लवकर संपवण्याचा हा निर्णय आयोगाने मोदी-शहांच्या दबावाखाली घेतल्याचा आरोप त्यांनी केला. पश्चिम बंगालमध्ये उफाळलेल्या हिंसाचाराला अमित शहा हेच जबाबदार असल्याचेही त्यांनी सांगितले. बंगालमध्ये मोदी-शहांनी आणीबाणीसारखी परिस्थिती आणून ठेवली आहे.कोलकात्यात अमित शहांच्या रॅलीसाठी 15 ते 20 कोटींचा खर्च करण्यात आला. मोदी-शहांना निवडणुकीत केलेल्या खर्चाबाबत आयोग जाब का विचारत नाही असा खडा सवालही ममता बॅनर्जी यांनी केला. तसेच शेवटच्या टप्प्यासाठी रविवारी मतदान होणार आहे. तरुण, तरुणींनी, माता-भागिनींनी मोदींना मत देवू नये. त्यांनी बंगाल आणि बंगालींचा अपमान केला आहे. त्यांना हटवा, असे आवाहन पत्रकार परिषदेतून केले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

पुजार्‍यांना मंदिराच्या ट्रस्टी बनण्यापासून रोखता येणार नाही! हायकोर्टाचा निर्णय

मुंबई – राज्यातील मंदिरातील पुजारी तसेच अन्य काम करणार्‍या व्यक्तींची सेवा ही मंदिराच्या विरोधात नाही. त्यामुळे त्यांना मंदिराच्या विश्वस्त पदी नियुक्त करण्यापासून रोखता येणार...
Read More
post-image
News मुंबई

मुलाच्या शिक्षणाच्या झालेल्या भांडणातून पत्नीची हत्या! पती फरार

मुंबई – मुलाच्या शिक्षणावरुन झालेल्या भांडणातून एका 30 वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना गोरेगाव परिसरात घडली. हत्येनंतर पतीने पत्नीने आत्महत्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

पालिकेची वृक्षप्राधिकरण समिती स्थापन! ठाणे महापालिकेची न्यायालयात माहिती

मुंबई – ठाणे महापालिकेने वृक्ष प्राधिकरण समिती आणि त्या समितीवरील सदस्यांची नेमणूक ही नियमानुसार स्थापन करण्यात आल्याची माहिती ठाणे महा पालिकेने आज उच्च न्यायालयात...
Read More
post-image
News मुंबई

वांद्रे स्कायवॉक ऑडीटसाठी बंद! मुंबई महापालिकेची हायकोर्टात माहिती

मुंबई – लाखो प्रवाशांसाठी उभारण्यात आलेला वांद्रे स्थानकातील स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येणार आहे. त्यासाठी तो बंद ठेवण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

भारताचे माजी अर्थमंत्री चिदंबरम्ना ड्रामाबाजीनंतर अटक

नवी दिल्ली-आयएनएक्स मीडिया प्रकरणी अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर बेपत्ता असलेले भारताचे माजी अर्थमंत्री आणि कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर आज रात्री मोठ्या ड्रामेबाजीनंतर...
Read More