तु का आलासे नाशकास… – eNavakal
लेख संपादकीय

तु का आलासे नाशकास…

मोडूनिया वाटा, सूक्ष्म दूस्तर।
केला राज्यभार चाले ऐसा।
तुका म्हणे महापातकी पतित।
ऐसियांचे हित हेळामात्रे॥
तुकाराम महाराजांचा हा अभंग आणि आमच्या तुकाराम मुंढेंचा कारभार बर्‍यापैकी जुळणारा म्हणावा लागेल. राज्य कारभाराची नेहमीची वाट मोडून त्यांनी दूस्तर मार्ग स्वीकारलेला दिसतो आणि म्हणूनच त्यांच्या शहर विकासाच्या खर्‍या मार्गामध्ये अनेक अडचणी पण निर्माण होत असतात. नाशिक महानगरासाठी त्यांनी करवाढीचा प्रस्ताव ठेवला, परंतु त्याला सर्वपक्षीय नगरसेवकांनी कडाडून विरोध केला. नगरसेवकांनी मंजूर केलेला हा प्रस्ताव त्यांनी मान्य केलेला नाही. अर्थात महापालिकेने जर आयुक्तांचा प्रस्ताव फेटाळून लावला तर शक्यतो त्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही. म्हणून यातल्या कायदेशीर किंवा वैधानिक बाबी तपासल्या पाहिजेत, परंतु ज्यावेळी सर्वपक्षीय नगरसेवक आयुक्तांविरुध्द उभे राहतात, त्या वेळेला त्या सगळ्यांच्याच शेपटावर आयुक्तांनी पाय दिलेला असतो. आतापर्यंत म्हणजे गेल्या दहा-पंधरा वर्षांत अकरा वेळा बदली झालेल्या तुकाराम मुंढेंच्या बाबतीत असे प्रकार जेव्हा घडतात, त्यावेळी राजकारण्यांच्या हितसंबंधांना त्यांनी जबरदस्त तडाखाच दिला हे आपोआप सिध्द होते.

आयुक्त म्हणजे या नगरसेवकांचे नोकर नसतात. ते फक्त जनतेचे चाकर असतात आणि जनहितासाठी आणलेल्या प्रस्तावांना जेव्हा हे राजकारणी विरोध करतात, तेव्हा त्याचे खरे रूपही लोकांसमोर येत असते. कारण राजकारण्यांना कोणाचाही अंकुश नको असतो. मनमानी आणि मनमौजीची सवय झालेली असल्याने मुंढेंसारखे आयुक्त त्यांना डोईजड वाटू लागतात. पारदर्शी कारभाराचे तुणतुणे वाजवणार्‍या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मुंढेंच्या शिस्तप्रिय कारभाराला विरोध करावा यातून भाजपाचा आणखी एक चेहरा समोर येतो. मुंढेंची कार्यशैली नगरसेवकांच्या तोंडाला आणि खिशालाही चाप लावणारी असल्याने या सर्वांचा तिळपापड झालेला आहे आणि मग त्यातूनच आता मुंढेंविरुध्द अविश्वास ठराव आणण्याची नेहमीची पध्दत वापरली जाईल. अशा प्रकारांची मुंढे यांना सवय असल्याने त्यांच्यावर त्याचा काही परिणाम होणार नाही, परंतु दोन वर्षांपूर्वीच त्यांना नवी मुंबईतून हलवले गेले. त्याआधी नव्यानेच अस्तित्वात आलेल्या पनवेल महानगरपालिकेतही भाजपा नगरसेवकांनी तिथल्या आयुक्तांना अशाच पध्दतीने घालवण्याचे काम केले आणि आता जर नाशिकमध्ये मुंढेंविरुध्द अविश्वास ठराव आणला जात असेल तर तो त्यांच्या शिस्तीचा केलेला दुस्वास ठरेल.

नाशिककरांचा तोटा
नाशिककरांनी मोठ्या विश्वासाने भारतीय जनता पार्टीच्या हातात एकहाती सत्ता सोपवली. यामध्ये निवडून येण्यासाठी ज्या काही राजकीय कुलंगड्या कराव्या लागतात, त्या तिथेही झाल्या असतीलच. परंतु सर्वसामान्यपणे नाशिकचा खर्‍या अर्थाने चेहरामोहरा बदलावा, भ्रष्टाचार आणि बेजबाबदार प्रशासनाचा पर्दाफाश व्हावा, शहराचा विकास होत असतानाच सामान्यांना आवश्यक असलेल्या सेवासुविधा उपलब्ध व्हाव्यात. नाशिक हे तीर्थक्षेत्र आहे. तिथल्या विकासाचे खरेतर एक स्वंतत्र मॉडेल तयार केले पाहिजे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने काही लाख लोक नाशकात येत असतात आणि याच निमित्ताने कोट्यवधी रुपयाचे अनुदानही महापालिकेला मिळत असते. असा रग्गड पैसा मिळूनही विकासकामांच्या बाबतीत अतिशय निकृष्ट दर्जाची परिस्थिती आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने रस्त्यांची बांधकामे होऊन जातात. गोदावरीचा परिसर तेवढ्यापुरता स्वच्छ होतो, परंतु एक स्वच्छ आणि सर्व सुविधांनी युक्त तीर्थक्षेत्र म्हणूनही त्याचा कायमस्वरूपी विकास होऊ शकलेला नाही. कुंभमेळ्याच्या अनुदानावर डोळा ठेवून नाशिक महानगराचे प्रश्न सुटणार नाहीत. याकरिता काही प्रमाणात करवाढ करणे अपेक्षितच आहे. ही करवाढ लोक स्वीकारीत असताना लोकप्रतिनिधींनी त्याचा विरोध करावा हा तर आणखीनच मोठा विरोधाभास ठरतो.

विकासाचे धोरण एका निर्णायक टप्प्यावर येऊन पोहचले असताना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्मार्ट सिटी योजनेत नाशिकचाही अंतर्भाव असताना तिथल्या भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी विकासोन्मुख आयुक्तांच्या कामाला खीळ घालावी हाही विपरीत प्रकार ठरतो. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत असाच काटेकोर कारभार करणारे त्यावेळचे तिथले आयुक्त श्रीकर परदेशी यांच्या पारदर्शी कारभारामुळेच त्यांना थेट पंतप्रधान कार्यालयात बोलावून घेतले गेले आणि त्यांच्या या कार्यक्षमतेचा केंद्र सरकारला उपयोगही होत आहे. त्याच पध्दतीने काम करणारे तुकाराम मुंढे मात्र भाजपाला नकोसे वाटण्याचे कारणच काय, असा प्रश्न निर्माण होतो. त्यांच्या कार्यकाळात नाशिकच्या विकासाचा कळस गाठला जाईल याबद्दल आमच्या मनात शंका नाही. तसे झाले तर ‘तुका झालासे कळस’ या अभंगाप्रमाणे याच मुंढेंचे कौतुकही होईल आणि त्यावेळी ‘तुका झालासे विकास’ असे कौतुकोद्गारही काढले जातील, परंतु आज मात्र त्यांच्या या कामाबद्दल नाराजी व्यक्त करून तिथले लोकप्रतिनिधी मुंढेंनाच ‘तु का आलासे नाशकास’ असा प्रश्न विचारताना दिसून येतात.

ऐशा या नरा…
बर्‍याच वेळेला मुख्यमंत्र्यांच्या नावाने पारदर्शी कारभाराची पावती फाडली जाते. मुख्यमंत्री अशा कर्तव्यदक्ष अधिकार्‍यांच्या पाठीशी असतात, असेही अनेक वेळा सांगितले जाते, परंतु प्रत्यक्षात स्वपक्षीय नगरसेवकांच्या किंवा लोकप्रतिनिधींच्या दबावाला तेही बळी पडताना दिसतात, अन्यथा पनवेल महानगरपालिकेतल्या आयुक्तांविरुध्द तिथल्या भाजपा नगरसेवकांनी अविश्वास ठराव आणल्यानंतर त्या आयुक्तांना हलवण्याचे काही कारण नव्हते. तुकाराम मुंढेंचा कारभार हा स्पष्ट आणि रोखठोक स्वरूपाचा आहे. ते जर जनतेला बांधिल असतील आणि सरकारी नियमाच्या चौकटीत काम करीत असतील तर ते अशा तथाकथित अविश्वास ठरावाची अजिबात तमा बाळगणार नाहीत. आयुक्तांनी आपल्या मर्जीप्रमाणे वागावे ही जी काही काँग्रेसी परंपरा आहे तिला धक्का देण्याचे काम सर्वप्रथम सदाशिव तिनईकर यांनी केले होते आणि याच परंपरेने जर प्रशासनाचा गाढा हाकला गेला तरच तो योग्य मुक्कामी पोहचू शकेल. शेवटी दांभिकपणे वागणार्‍या अभक्तांना कडक शब्दांत सुनावताना तुकाराम महाराजांनी एका अभंगात म्हटलेच होते, ‘ऐशा या नरा मोजून माराव्या पैजारा। सूज्ञास अधिक सांगणे न लगे।’

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

राज्याला पंधराव्या वित्त आयोगातील १ हजार ४५६ कोटी रुपये प्राप्त

मुंबई – राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातील 1 हजार 456 कोटी 75 लाख रुपयांचा बंधीत निधी काल प्राप्त झाला...
Read More
post-image
महाराष्ट्र

कुपोषणमुक्तीसाठी सकस आहार पुरवठ्याला गती देणार – मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती – कोरोना संकटकाळात निर्माण झालेल्या विविध अडचणींचा सामना करत शासन- प्रशासनाने विविध सुविधा व योजनांना चालना दिली. प्रभावी उपचारयंत्रणेसाठी प्रयोगशाळा, प्लाझ्मा सुविधा, कोविड...
Read More
post-image
देश

चीनचा डोळा आता हिंद महासागरावर,पाकिस्तानच्या बंदरात खलबतं सुरू

मुंबई -चीन भारतविरोधी सतत कारवाया करत असून आता चीनचा हिंद महासागरावरही डोळा आहे. दक्षिण चीन समुद्रात चीनची नाकाबंदी सुरु झाल्यामुळे चीननं ही नवी चाल...
Read More
post-image
Uncategoriz देश शिक्षण

स्कूल फ्रॉम होममुळे ७२.८% विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रक्रियेवर परिणाम, सर्वेक्षण

मुंबई – लॉकडाऊनच्या काळात स्कूल फ्रॉम होम सुरू झाले आहे. मात्र या नव्या पद्धतीचं शिक्षण घेताना विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना कसरत करावी लागत...
Read More
post-image
देश

‘या’ आयटी कंपनीत ५०० कर्मचारी कपात, भारतीय परदेशातून परतणार

नवी दिल्ली -भारतातील अनेक तंत्रकुशल नागरिक इंग्लड, अमेरिकेसारख्या देशात नोकरीसाठी वात्सव्यास आहेत. मात्र कोरोनाच्या काळात त्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे. कारण, का आघाडीच्या आयटी...
Read More