ज्ञानशक्तीचे शारदीय नवरात्र – eNavakal
आघाडीच्या बातम्या संपादकीय

ज्ञानशक्तीचे शारदीय नवरात्र

सर्वरुपमयि देवी सर्वं देवीमयंजगत् अतो हं विश्वरूपां तां नमामि परमेश्वरीम् । संपूर्ण जगत देवीमय आहे. देवी सर्वरुपमयी आहे आणि म्हणून अशा विश्वरूपा परमेश्वरीला नमस्कार असो. आजपासून सुरू झालेले नवरात्र विश्वरूप चैतन्यमय शक्तीच्या आराधनेचे पर्व ठरते. वेगवेगळ्या रूपामध्ये किंवा स्वरुपामध्ये शक्तीपीठांमध्ये अथवा वेगवेगळ्या प्रतिक रूपांच्या माध्यमातून त्याच चैतन्याची आराधना करण्याची ही प्राचीन परंपरा आहे. देवीची उपासना करणारी ही पध्दत हजारो वर्षांपूर्वी सुरू झाली. या शक्तीरूपा पूजेचे महत्त्व वेगवेगळ्या पध्दतीने सांगितले गेले आहे. दूर्गा, चामुंडा, महिषासूर मर्दिनी, महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी अशा एक ना अनेक नावांनी आणि रूपांनी पूजा केली जाते. देवी भागवत, सप्तशतीची पोथी, दूर्गाभक्तीतरंगिणी, कालिका पुराण, देवीपुराण, बृहतनंदी पुराण, अथवा स्कंध पुराणांमधून देवीचे प्राकट्य तिचा उद्देश, आणि हेतू हे त्याचे सविस्तर वर्णन वाचायला मिळते. प्रामुख्याने असूरांचा विनाश करणारी आणि शरण आलेल्या आणि शरण आलेल्यांना साहाय्यभूत होणारी म्हणून तिचे वर्णन केले गेलेले आढळून येते. प्रामुख्याने अश्विन महिन्यातल्या या नवरात्राला शारदीय नवरात्र म्हटले गेले आहे आणि देवीच्या रूपांमध्ये महासरस्वती, महालक्ष्मी असा उल्लेख वारंवार येतो. किंबहुना या क्रमानेच त्यांचा उल्लेखही अनेकवेळेला होतो. आजचे नवरात्राचे स्वरूप दोन प्रकारातून स्पष्ट होते. एक म्हणजे परंपरागत घटस्थापना, सप्तशती ग्रंथाचे पठण, सप्तमी, अष्टमी, नवमी या तिथींना होणारे नवचंडी, शतचंडी, सहस्रचंडी यागाचे आयोजन अनेक घरांमधून घटाभोवती नऊ धान्य पेरायची पध्दत आहे. घटांवर रोज नवीन फुलांची माळ अर्पण करण्याचा प्रकारही पाहायला मिळतो.

चैतन्यशक्तीचा अनुभव

आपल्या कुलस्वामिनीच्या प्रसन्नतेसाठी विशेष आराधना या काळात अनेक घरांमधून केली जाते. नऊ दिवस उपवास करण्याचीही पध्दत पाहायला मिळते. मोठ्या प्रमाणावर कर्मकांडाच्या रूपाने ही आराधना जरी होत असली तरी त्यामध्ये शरणागतता आणि समर्पणशीलतेचा भाव महत्त्वाचा मानला गेला आहे. तर दुसर्‍या प्रकारामध्ये केवळ या विश्वरूप चैतन्याची शक्तीरूप साधना करून या नऊ दिवसात अधिक प्रमाणात जपजाप्य करण्याचाही प्रकार पाहायला मिळतो. स्वत:मधल्या आत्मरूपाचा आणि या विश्वातील चैतन्यरूपाचा एकत्रित अनुभव घेण्याचा प्रयत्न अनेक साधक तत्वरूपाने करीत असतात. म्हणूनच शंकराचार्यांनी त्याचे वर्णन करताना असे म्हटले आहे की,

न जानामि दानं न च ध्यान योगं,
न जानामि तंत्रं नच स्तोत्र मंत्रम्
ना जनामि पूजां नच न्यास योगं ,
गतीस्त्वं गतीस्त्वं त्वमे का भवानी।

यामधून केवळ अनन्यशरणागत भाव व्यक्त करताना त्या चैतन्यरूप शक्तीचा अनुभव प्राप्त करण्याचीच आर्तता दिसून येते. खरे तर नवरात्रासाठी वापरला गेलेला शारदीय शब्द फार महत्त्वाचा ठरतो. सरस्वतीची आराधना म्हणजेच ज्ञानाची साधना ही शक्तीची प्राप्ती करून देणारी असते. कोणतेही ज्ञान हे मनुष्याला ज्ञानसंपन्न करते एकाअर्थीच बलसंपन्न करीत असते आणि अशा बलसंपन्न माणसावर महालक्ष्मी प्रसन्न होत असते. या दोन्ही शक्तींच्या ज्याच्यावर कृपा आहेत ती व्यक्ती येणार्‍या प्रत्येक संकटाला महाकालीच्या साहाय्याने परतवून लावू शकते. सूत्ररूपाने विचार केला तर या शारदीय नवरात्रोत्सवात व्यक्ती किंवा समाजाने विद्यासंपन्न , ज्ञानसंपन्न होण्याचा संदेश दिला गेला आहे. यातून प्राप्त होणारी शक्तीसंपन्नता म्हणजेच त्या शक्तीरूप देवीचा आपल्यावरचा वरदहस्त ठरू शकतो. प्रतिकं, मूर्ती, संकल्पना यांच्या माध्यमातून व्यक्तीला समाजाला सर्वार्थाने बलसंपन्न करण्याचा कितीतरी मोठा उद्देश नवरात्रोत्सवातून साधला गेलेला आहे. म्हणून या काळात देवीची पूजाअर्चा करताना महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली अशा शक्तीरूप संकल्पना मांडल्या गेलेल्या आहेत त्यांच्याशी आपण जितके एकरूप होऊ तितका त्याचा प्रभाव जाणवत असतो. म्हणून अशा मूलभूत आणि वैशिष्टयपूर्ण सिध्दांतांकडे दुर्लक्ष न करता ही पूजा अर्चा करताना शक्तीसंपन्न होण्याची आकांक्षा मनामध्ये ठेवली गेली पाहिजे. ज्ञानप्राप्ती ही या मागची मूळ प्रेरणा ठरू शकते. भारतीय संस्कृतीने प्रारंभापासूनच भक्तीयुक्त ज्ञानप्राप्ती ही सर्वोत्तम कर्माची फलश्रुती मानली आहे. म्हणजेच भक्तीयुक्त अंत:करणाने केली जाणारी पूजाअर्चा ज्ञानाचे वैभव प्राप्त करून देते आणि या दोहोतून व्यक्ती आणि समाजाच्या हातून उत्तम आणि उदात्त कर्म घडू शकत.

नारीशक्तीचे जागरण

सण उत्सवांची ही सिध्दांतरूपी शिदोरी नेमकी दुर्लक्षित होते आणि केवळ उत्सवी स्वरूपात कर्मकांड पार पाडण्यावर भर दिला जातो. नवरात्र असेल गणेशोत्सव असेल या काळात स्वत:मधल्या भक्तीचा ताळेबंद तपासण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण भक्ती ही सातत्याने करण्याची गोष्ट आहे आणि जर एकाग्र मनाने शरणागततेने मन आणि बुध्दीला आकार देण्याचा प्रयत्न आपल्याकडून झाला तर त्याचे योग्य ते फळही प्राप्त होते. म्हणून फक्त याच उत्सवांच्या काळात मंदिरांमध्ये गर्दी केलीच पाहिजे असे नाही. ज्यांच्याकडून रोज नित्यनेमाने भक्तीचे जागरण होते. त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस हा नवरात्रासारखा ठरू शकतो. मनाचे पावित्र्य घर आणि परिसराची शुचिता शरीरातील अनिष्ट प्रवृत्तींचा विनाश अशा काही गोष्टींची उजळणी केली तर कोणताही उत्सव असो त्यामागचा सिदधांत लक्षात यायला वेळ लागणार नाही. आजकाल नवरात्राच्या निमित्ताने जिकडे तिकडे दिसणारा दांडिया किंवा गरबा प्रकार एक उत्साह म्हणून ठीक मानता येईल परंतु त्यानिमित्ताने जर मनातील वाईट प्रवृत्तींना प्रोत्साहन मिळणार असेल तर मात्र मूळ उद्देशालाच गालबोट लागल्यासारखे ठरते. स्रीरूपामध्ये होणारी शक्तीची आराधना स्वाभाविकपणे नारीशक्तीचाही सन्मान करणारी असली पाहिजे आणि असा सन्मान ठेवून घेण्याचा प्रयत्नही झाला पाहिजे. नवरात्र साजरे करीत असताना या विश्वातल्या शक्तीला पूर्ण शरणागत होणे आणि त्यातून स्वत: शक्तीसंपन्न होणे अपेक्षित आहे. प्रतिकरूपाने किंवा विविध देवींच्या मंदिरांमधून होणारी सर्व प्रकारची उपासना ही या एकाच उद्दीष्टाकडे घेऊन जाणारी आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

मंदिरांच्या परंपरांमध्ये हस्तक्षेप नको – रजनीकांत

चेन्नई – केरळच्या शबरीमला मंदिरात महिलांना अद्यापही प्रवेश मिळाला नाही. १७ ऑक्टोबरला मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले. मात्र महिलांच्या प्रवेशाला मज्जाव करण्यात आला....
Read More
post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२०-१०-२०१८)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२५-०५-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२६-०५-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

दहशतवाद्यांच्या गडामध्ये भाजपाचा मोठा विजय

श्रीनगर – दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा गड मानल्या जाणार्‍या शोपिया, कुलगाम, पुलवामा आणि अनंतनाग जिल्ह्यांमध्ये भाजपाने नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठा विजय मिळविला आहे. 20 पैकी 4...
Read More
post-image
महाराष्ट्र

पाणी टंचाईवरून सत्ताधारी नगरसेवकांचा महापालिकेवर मोर्चा

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. सत्ताधारी भाजप विरोधात विरोधक आक्रमक झाले असताना स्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिकेवर पाण्याच्या निषेधार्थ मोर्चा काढत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या न्यायालय

कर्नल पुरोहितांची ‘ती’ याचिका न्यायालयाने फेटाळली

मुंबई- मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी कर्नल पुरोहित यांनी दाखल केलेली याचिका आज विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात यूएपीए कायद्याअंतर्गत...
Read More