चंद्रपूर – ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प सद्या पर्यटकांनी फुलून गेला आहे. तसेच उन्हाळ्यात झाडे झुडपे कमी झाल्यामुळे वन्य प्राण्याचे छायाचित्र घेण्यासाठी वन्यजीव छायाचित्रकारांनी देखील हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. सोमवारी ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव छायाचित्रकार अरूण रस्तोगी यांच्या हातातील कॅमेरा अचानक जिप्सीच्या खाली पडला. त्यावेळी ते तारा वाघिणीचे बछड्यांबरोबरचे छायाचित्र कॅमेर्यात कैद करत होते. परंतु कॅमेरा उचलण्यापूर्वी छोटी तारा वाघीण आपल्या बछड्यांसह तेथे पोहोचली. तिने दहा मिटर अंतरावरून कॅमेर्यावर झडप घातली. त्यामुळे कॅमेर्याची लेन्स तुटली. त्यानंतर तिच्या दोन बछड्यांनी देखील कॅमेरा न्याहाळला आणि तोंडात उचलून नेला. त्यानंतर ते तिघेजण कॅमेर्याबरोबर खेळत बसले, संपूर्ण कॅमेर्याचे भाग त्यांनी अलग केले. त्यामुळे रस्तोगी यांची मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. छायाचित्रकार अरूण रस्तोगी हे आठ दिवसांपासून ताडोबात मुक्कामाला असून त्यांनी आतापर्यंत आठ वाघ पाहिले. त्यांचे छायाचित्र कॅमेर्यात कैद केले आहेत.
