गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांचे निधन – eNavakal
News

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांचे निधन

पणजी- सुसंस्कृत, उमदा नेता म्हणून ओळख असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे आज वयाच्या 64 व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून पर्रिकरांची स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी झुंज सुरु होती. ही झुंज अखेर आज थांबली. डॉक्टरांनी पर्रिकर यांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र पर्रिकरांची प्राणज्योत मालवली. पर्रिकरांच्या निधनानंतर गोव्यात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पर्रिकरांच्या निधनाने संपुर्ण देश शोकाकुल झाला असताना भाजपा मात्र गोव्यातील सत्ता राखण्यासाठी मश्गुल होती. भाजपाने माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार दिगंबर कामत यांना काँग्रेसमधून फोडून गोव्याच्या मुख्यमंत्री पदाचे ‘गाजर’ दाखवून कालच दिल्लीला बोलावून घेतले. आज कामत यांनी भाजपाच्या प्रस्तावानुसार गोवा मुख्यमंत्री पदासाठी होकार दिल्यानंतर भाजपाने पर्रिकरांच्या निधनाची घोषणा केल्याची चर्चा आहे.

काल मनोहर पर्रिकर यांची तब्येत फारच खालावली. त्यांना बोलताही येत नव्हते. त्यामुळे पर्रिकरांच्या जिवाचे काही बरे वाईट झाले तर केंद्रातील मोदी सरकार गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करेल, या भीतीने काँग्रेसने काल राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्याकडे सत्ता स्थापन करण्याचा दावा पेश केला. त्यानंतर भाजपा आमदारांची अत्यंत महत्त्वाची बैठक झाली. गोवा विधानसभा सभापती हे अध्यक्षस्थानी होते. त्यांनी दिगंबर कामत यांना भाजपात घेऊन मुख्यमंत्री बनविण्याबाबत आमदारांशी चर्चा केली. केंद्रातील भाजपा श्रेष्ठींनाही याबाबत कळविण्यात आले. गोवा विधानसभा सभापतींनीच ही माहिती दिली. त्यानंतर आज काँग्रेस नेते दिगंबर कामत हे भाजपा नेत्यांना भेटण्यासाठी घाईघाईने दिल्लीला गेले. त्यानंतर आज लोकसभेसाठी उमेदवार निवडण्याच्या नावाखाली सकाळी भाजपा आमदारांची बैठक झाली.

गोव्यामध्ये काँग्रेसकडे 17 आमदार आहेत. तर भाजपाचे फक्त 13 आमदार आहेत. तरीही 3 अपक्ष, 3 महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीचे आमदार व 3 गोवा फॉरवॅर्ड पार्टीचे आमदार आणि 1 राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार यांच्या पाठिंब्याने भाजपाने गोव्यामध्ये सत्ता स्थापन केली होती. हे सरकार टीकविण्याचे काम फक्त पर्रिकरच करू शकत होते. आता दिगंबर कामत यांना भाजपात घेऊन त्यांना मुख्यमंत्री बनविण्यात येण्याचे नियोजन केले आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यावर पर्रिकर यांच्या मृत्यूचे वृत्त दिले, असा भाजपावर आरोप होत आहे. दिगंबर कामत हे मुळचे भाजपाचेच होते. 2005 साली भाजपा सोडून ते काँग्रेसमध्ये गेले व मुख्यमंत्री झाले. आता ते पुन्हा स्वगृही येणार आहेत.
साधे राहणीमान असलेले मनोहर पर्रिकर यांनी स्वच्छ प्रतिमेमुळे गोव्याच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण केला होता. वर्षानुवर्षे राजकीय अस्थिरता पाचवीला पुजलेल्या छोट्याशा गोव्यात पर्रिकरांनी आपल्या कुशल नेतृत्वाने ही अस्थिरता संपुष्टात आणली. मुख्यमंत्री म्हणून पर्रिकरांनी गोव्याला यशस्वी नेतृत्व दिले. सलग तीन वेळा गोव्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळण्याचा बहुमान मनोहर पर्रिकर यांना मिळाला आहे. 2000 ते 2005, 2012 ते 2014 आणि 14 मार्च 2017 पासून निधनापर्यंत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून गोवा राज्याची धुरा सांभाळली. विशेष म्हणजे 2013 मध्ये गोव्यात झालेल्या भाजपाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव मनोहर पर्रिकर यांनीच मांडला होता. त्यानंतर 2014 मध्ये देशाच्या संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी पर्रिकर यांच्याकडे सोपविण्यात आली होती. 2014 ते 2017 दरम्यान त्यांनी संरक्षण मंत्रीपद सांभाळले.
पर्रिकर यांनी 1978 रोजी मुंबईतील आयआयटीतून मेटलर्जीमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले होते. 1994 मध्ये पर्रिकर पहिल्यांदा गोवा विधानसभेवर निवडून गेले होते. मनोहर पर्रिकर यांना गोव्यातील जनता ‘भाई’ या नावाने
संबोधित असे.
गेल्या काही दिवसांपासून त्यांना स्वादुपिंडाच्या कर्करोगाने ग्रासले होते. कर्करोगाचे निदान स्पष्ट झाल्यानंतर पर्रिकर यांनी अमेरिकेत जाऊन उपचार सुरु केले होते. उपचारानंतर पर्रिकर काही दिवसांनंतर पुन्हा भारतात परतले. या काळात त्यांच्या तब्येतीत उतार-चढाव सुरुच होता. या काळातही त्यांनी आपले काम सुरुच ठेवले होते. अखेर काल रात्री पुन्हा एकदा पर्रिकर यांची तब्येत खालावली. त्यांना गोव्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पर्रिकर यांची प्रकृती स्थिर असल्याचे सुरुवातीला सांगण्यात आले. मात्र सायंकाळी मुख्यमंत्री कार्यालयातून एक ट्विट करण्यात आले की, पर्रिकरांची तब्येत अचानक खालावली असून डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. अखेर आज सायंकाळी 8 वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मनोहर पर्रिकर यांचे निधन झाले असल्याचे ट्विट केले.
मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पर्रिकरांच्या निधनाने दुःख झाल्याचे ट्विट केले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही सुसंस्कृृत नेता हरपल्याचे सांगत दुःख व्यक्त केले. खा. सुप्रिया सुळे, भाजपा नेते नितिन गडकरी, पियुष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, माधव भंडारी यांनीही दुःख व्यक्त करत श्रध्दांजली वाहिली.
दरम्यान, राफेल कराराच्या महत्त्वपूर्ण फाईल्स वरूनही मनोहर पर्रिकर यांच्यावर काँग्रेसकडून आरोप करण्यात आले होते. राफेलची सर्व रहस्य पर्रिकरांना माहिती असल्यानेच मोदी त्यांना घाबरत असल्याचा दावाही त्यावेळी काँग्रेसने केला होता.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

#Bond25 लशाना साकारणार ‘AGENT 007’

किंग्स्टन – जगप्रसिद्ध बॉन्ड सिरीजचा २५ वा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ‘सीक्रेट एजंट ००७’ ही अतिशय गाजलेली भूमिका यावेळी कोणी अभिनेता नाही तर एक...
Read More
post-image
देश मुंबई

कर्नाटकच्या बंडखोर आमदारावर मुंबईत उपचार

मुंबई – कर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेस सुरुवात झाली आहे. मात्र बंडखोर आमदार यावेळी उपस्थित नसल्याने कुमारस्वामी सरकारवरील संकट कायम आहे. त्यातच मुंबईत असलेले कॉंग्रेसचे बंडखोर...
Read More
post-image
महाराष्ट्र

आंबेनळी घाट बस दुर्घटनेचा तपास थांबण्याची पोलिसांची मागणी

रत्नागिरी – पोलादपूरजवळच्या आंबेनळी घाटात बस कोसळली होती. या दुर्घटनेच्या वर्षभरानंतरही पोलिसांच्या हाती ठोस काहीच लागलेले नाही. त्यामुळे रायगड पोलिसांनी न्यायालयात याप्रकरणाचा तपास थांबविण्याची परवानगी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार

मुंबई – जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली होती. मात्र सध्या आठवडाभरापासून कोकण वगळता इतर भागांत पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. परंतु आजपासून राज्यात पाऊस...
Read More
post-image
मनोरंजन

‘राधिका आपटेचा बोल्ड सीन’ अशीच चर्चा का?

मुंबई – आपल्या बोल्ड अदांनी चाहत्यांना भुरळ घालणारी मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे लवकरच स्लमडॉग मिलिनिअर फेम देव पटेल याच्यासह ‘द वेडिंग गेस्ट’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला...
Read More