डोंबिवली – कोरोनाच्या संसर्गामुळे गणेशोत्सव सध्या पद्धतीने करण्यात येणार आहे. या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरता कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने कंबर कसली आहे. विसर्जना दिवशी होणारी गर्दी रोखण्यासाठी पालिकेने विसर्जन तुमच्या दारी हा उपक्रम आणला आहे.
त्यासाठी महापालिकेच्या प्रशासकीय प्रभागात मोठ्या ट्रकमध्ये ३००० लिटर पाण्याची टाकी बसवून मुख्य चौकात घरगुती गणपती विसर्जनाकरीता फिरविण्यात येणार आहे. प्रत्येक प्रभाग क्षेत्रात चौकाचौकात सदर वाहन उभे ठेवण्याची वेळ निश्चित करुन याबाबत उद्घोषणा करण्यात येणार आहे.
कल्याण व डोंबिवली विभागातील गणपती विसर्जन स्थळी व गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील चौकांमध्ये सुरक्षेसाठी महापालिकेने २७ महत्वाच्या ठिकाणी १२५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची व्यवस्था केलेली असून, गणेशोत्सवा दरम्यान प्रकाश व्यवस्थेसाठी विहित क्षमतेचे ५२ जनरेटर बसविण्यात येणार आहेत. तसेच, २३९५ हॅलोजन व ५८ लाईटिंग टॉवर उभारण्यात येत आहेत. महापालिकेच्या कल्याण विभागात ३१ विसर्जन स्थळे असून, कल्याण पूर्व येथे गावदेवी मंदिराजवळ, तिसगाव येथे, कोळसेवाडी पोलीस स्टेशन जवळ, चक्की नाका वखारी जवळ, खडगोळवली त्याचप्रमाणे कल्याण प. येथे अनंत रिजन्सी, पारनाका तसेच विदयापिठ परिसरात कृत्रिम तलाव उभारण्यात येणार आहेत.
महापालिकेच्या डोंबिवली विभागात २२ विसर्जन स्थळे असून’ फ ‘प्रभागक्षेत्रांतर्गत ७ विसर्जन स्थळापैकी ५ ठिकाणी कृत्रिम तलाव(पंचायत बावडी विहीर, नेहरु मैदान, अयोध्या नगरी रोड, शिवम हॉस्पिटल, टिळक विद्या मंदिर शाळा),’ ग’प्रभाग क्षेत्रांतर्गत ४ विसर्जन स्थळापैंकी पैकी ३ ठिकाणी कृत्रिम तलाव(न्यू आयरे रोड, प्रगती कॉलेज, कस्तुरी प्लाझा), ह प्रभाग क्षेत्रांतर्गत ६ विसर्जन स्थळापैकी २ ठिकाणी कृत्रिम तलाव(आनंद नगर गार्डन, भागशाळा मैदान), ई प्रभाग क्षेत्रांतर्गत ५ विसर्जन स्थळांपैकी २ ठिकाणी कृत्रिम तलाव (मिलाप नगर, पी. अॅन्ड टी. कॉलनी) यामध्ये गणेश विसर्जनाची व्यवस्था महापालिकेमार्फत करण्यात आलेली आहे. मोठया गृह संकुलातील गणेश मुर्तींचे विसर्जन गृहसंकुलात छोटा हौद उभारुन तेथे करणेबाबत गृहनिर्माण संस्थेच्या निबंधकांना पत्राद्वारे आवाहन करण्यात आले आहे. तसेच गणेशोत्सव २०२० करीता महापालिकेकडून तयार केलेल्या मार्गदर्शक सुचना, परवानगी दिलेल्या सर्व गणेश मंडळांना वितरीत करण्यात आल्या आहेत.
आजपर्यंत महापालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत आणि अनधिकृत बांधकाम विभागामार्फत ९४ मंडळांना ना हरकत दाखले प्रदान करण्यात आले असून, प्रत्येक विसर्जन स्थळी अग्निशमन जीवरक्षक, लाईफबॉय, लाईफ जॅकेट इ. ची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच खाडी किनारी/तलावाजवळ अग्निशमन विभागाच्या ५ बोटी सज्ज ठेवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गणेशोत्सव दरम्यान सर्व दिवशी महापालिकेच्या नागरीकांच्या सोई करीता चारही अग्निशमन केंद्र कार्यरत राहतील. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्डे भरणे व तद्अनुषंगिक कामे तसेच साफसफाई व आरोग्यविषयक समस्यांच्या जलदगतीने निपटारा करणेबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकारी यांना निर्देश दिले आहेत.