गरज एका सशक्त पर्यटन विद्यापीठाची  – eNavakal
रविवार विशेष लेख

गरज एका सशक्त पर्यटन विद्यापीठाची 

लक्ष्मीकांत जोशी  – गरज एका सशक्त पर्यटन विद्यापीठाची   विकास हा केवळ योजनांमधूनच साधला जातो असे नाही. तर विविधरुपी संकल्पनांमधूनही विकासाच्या शेकडो संधी प्राप्त करता येतात. अनेक प्रगत राष्ट्रांमध्ये ही गोष्ट सिध्द झालेली आहे. तिथले शासन, प्रशासन एवढेच नव्हे तर शैक्षणिक संस्था, विविध विद्यापीठे यादेखील सतत नवीन संकल्पनांचा शोध घेत असतात त्यांचा हा नवनिर्मितीचा ध्यास त्यांच्यामध्ये विकासाची किती आस आहे हे दर्शवणारा ठरतो. भारत हा जगातील सर्वात मोठ्या लोकसंख्येचा द्वितीय क्रमांकाचा देश आहे. आपण ज्यांना प्रगत राष्ट्र म्हणतो त्यांच्याकडची लोकसंख्या आपल्यापेक्षा कमी आहे. परंतु तिथे विकास किंवा प्रगतीच्या संकल्पनांची संख्या प्रचंड दिसते. बर्‍याचवेळेला मग त्याठिकाणी काही गोष्टी अस्तित्वात येतात. काही नवीन शोध होतात. आणि मग त्या गोष्टी आपल्याकडे झिरपतात. परंतु भारताकडे आज लोकसंख्या त्याच्याबरोबरीने येणारी गुणवत्ता आणि बुध्दीमत्ता याची एक प्रचंड सुप्त शक्ती अस्तित्वात आहे. तिला संधी मिळत नसल्यामुळे तिचा वापर अमेरिका किंवा अन्य युरोपियन राष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. एवढेच नव्हे तर भारताकडे इतकी प्रचंड स्वरुपातील नैसर्गिक विविधता आणि साधने आहेत की ज्याचा उपयोग सर्वात मोठ्या रोजगार निर्मितीसाठी होऊ शकतो.

भारताला लाभलेला आठ हजार किलोमीटरचा विस्तीर्ण समुद्रकिनारा काश्मिरपासून केरळपर्यंत किंवा कच्छ पासून नागालँडच्या कोहिमापर्यंत भूभागाची विविधता पाहिली तर सांस्कृतिक, सामाजिक विविधता तर दिसून येतेच. त्या त्या ठिकाणची ऐतिहासिक स्थळे, स्थापत्य, कला पूरातत्वदृष्ट्या महत्वाची अशी ठिकाणे एवढेच नव्हे तर भारतातील नद्या, पर्वत, अभयारण्ये अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या पर्यटनाचा आनंद निर्माण करून देतात. दुर्दैवाने भारताकडे असलेली ही पर्यटन संपदा अक्षम्य दूर्लक्षित झालेली आहे. अलिकडेच वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टूरिझम कौन्सिलचा जागतिक अहवाल प्रसिध्द झाले. त्यामध्ये इतक्या स्पष्टपणे नमुद केले गेले आहे की 2028 पर्यंत भारत हा जगातील तिसर्‍या क्रमांकाचा पर्यटनाची शक्ती असलेला देश म्हणून पुढे येईल आणि त्यातून थोडेथोडके नव्हे तर एक कोटी लोकांना रोजगार उपलब्ध होतील. अहवालामध्ये हेही स्पष्टपणे सांगितले गेले की प्रवास आणि पर्यटनाच्या माध्यमातून नव्याने रोजगार निर्मिती होऊ शकते. सध्या असलेली 42.9 मिलियन रोजगार क्षमता 2028 पर्यंत 52.3 मिलियनपर्यंत जाऊ शकते. असा आशावादही या अहवालामध्ये व्यक्त झालेला आहे. आज जागतिक पातळीवर चीन हा पर्यटनाच्या क्षेत्रातही आघाडीवर आहे. 2028 पर्यंत भारताची पर्यटन क्षमता ही 240.6 बिलियन डॉलरपर्यंत वाढेल.

भारताच्या पूर्व आणि पश्चिम भागात असलेल्या देशांमध्ये भारतापेक्षाही जागतिक स्तरावरच्या चांगल्या पर्यटनासाठीच्या मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध आहेत. त्यामध्ये एअरपोर्ट, सी पोर्टस, हायस्पिड रेल आणि रोड या गोष्टी जर भारतातही निर्माण झाल्या तर भारत हा जगातील तिसर्‍या क्रमांकाचा पर्यटन आर्थिक शक्ती असलेला देश म्हणून नावारुपाला येऊ शकतो. भारत जगातील तिसरी पर्यटन शक्ती  याचा अर्थ जागतिक स्तरावर भारताकडे पर्यटनाच्या काय संधी आहेत याबद्दल अपेक्षा व्यक्त होतात. पण भारतात या संधींचे सोने करण्याची संकल्पनाच राबवली जात नाही. भारताकडे जर इतकी प्रचंड पर्यटनाची ताकद असेल तर या विषयीचा स्वतंत्र अभ्यास करणारे पर्यटन विद्यापीठ स्थापन झाले पाहिजे. आज सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या देशात रोजगाराची प्रचंड गरज असताना आणि पर्यटनातून ते मिळण्याची शक्यता असताना पर्यटनाचा अद्ययावत अभ्यास शिकवणारे विद्यापीठच नसावे हे आश्चर्यकारक ठरते.

2015 साली केंद्रीय पर्यटन मंत्री महेश शर्मा यांनी एका खाजगी समारंभात दिल्ली येथील नॉएडा येथे पंचवीस एकर जागेवर पर्यटन विद्यापीठ उभारण्याची घोषणा केली पण आज तीन वर्षानंतर कोणतीही हालचाल झालेली नाही. देशभरात 552 ट्रॅव्हल अँड टूरिझम इन्स्टिट्यूट आहेत जवळपास महाविद्यालय स्तरावर टूरिझम आणि हॉस्पिटॅलिटीचा अभ्यासक्रम शिकवला जातो. परंतु तो अतिशय जुजबी स्वरुपाचा आणि खाजगी स्तरावरचा असतो. राजस्थान,मध्यप्रदेश, केरळ, तामिळनाडू, ओरिसा, महाराष्ट्र, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेश, काश्मिर काही प्रमाणात बिहार या राज्यांमधल्या पर्यटन स्थळांची जरी यादी तयार केली तरी ती प्रचंड मोठी होईल. शेजारचा मेक्सिको, थायलंड ही भारतापेक्षा छोटी राष्टे्रदेखील प्रचंड मोठा महसूल प्राप्त करतात. भारताकडची पर्यटन संपदा पाहिल्यावर जणुकाही ही पर्यटनाची सुवर्णभूमी आहे. असेच वाटू लागते.  महाराष्ट्राचीही उपेक्षा  काही दिवसापूर्वीच राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी एक मोठा लेख लिहून असे म्हटले होते की राजस्थान दरवर्षी चाळीस हजार कोटी रुपये पर्यटनातून प्राप्त करू शकतो. एवढी त्याची पर्यटन महसूल मिळवण्याची क्षमता आहे. एकटे राजस्थान राज्य तर इतका महसूल मिळवू शकत असेल तर महाराष्ट्रासारख्या राज्याला ते काहीच अशक्य नाही. सर्व राज्यांंमधील पर्यटनाला योग्य आकार दिला गेला तर देशभरातला रोजगार तर वाढेलच. शिवाय जागतिक दर्जाच्या पर्यटन संधी निर्माण करण्याचे श्रेयदेखील प्राप्त करता येईल.

महाराष्ट्राचा विचार केला तर आपण खूपच दळभद्री असल्याचे लक्षात येते. कोकण पट्टीसारखा विस्तीर्ण निसर्ग किनारा, मुंबईसारखी जागतिक स्तराची स्वप्ननगरी, चार ज्योतिलिर्ंगे, देवीची साडेतीन शक्तीपीठे, अजंठा वेरुळ यासारख्या सुप्रसिध्द लेण्या जिथे सर्वाधिक परदेशी पर्यटक भेट देतात. माथेरान, महाबळेश्वर, तोरणमाळ, गडकिल्ल्यांचा ऐतिहासिक खजिना, ताडोबा, मेळघाट अशा शेकडो पर्यटन स्थळांचे संचित महाराष्ट्राकडे आहे. परंतु राज्याला पर्यटन धोरणच नसल्यासारखी आज परिस्थिती आहे. खरे तर कोकणाच्या विकासाचा विचार करताना अन्य कुठलेही रासायनिक उद्योग आणण्यापेक्षा त्याठिकाणी गोव्यासारखा पर्यटन उद्योग विकसित करता येऊ शकतो. देशातील अद्ययावत जागतिक स्तरावरचे पर्यटन विद्यापीठ कोकणात स्थापन करता येऊ शकते. आज भारताला अशा पर्यटन विद्यापीठाची अत्यंत आवश्यकता आहे त्यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घेतला पाहिजे आणि अधिकाधिक अभ्यासक्रम शिकवणारे पहिले पर्यटन विद्यापीठ म्हणून मान मिळवला पाहिजे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

राज्य शासन नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी – महादेव जानकर

नांदेड – उत्पन्न वाढीसाठी शेतीसह जोड व्यवसाय केल्यास शेतकऱ्यांसह तरुणांना रोजगार मिळण्यास मदत होईल. यासाठी राज्य शासन नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी असेल, असे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन,...
Read More
post-image
महाराष्ट्र

दुष्काळाबाबत लवकरच जीआर काढणार – मुख्यमंत्री

मुंबई – ३१ ऑक्टोबरनंतर राज्यातील तब्बल 179 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करणार, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी जाहीर केले. त्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
क्रीडा

ही आहे धोनीची नवी स्टाईल

नवी दिल्ली – भारत विरुध्द वेस्टइंडीज यांच्यातील पहिला सामना रविवारी खेळण्यात आला, त्यादरम्यान टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी याने स्वत:चे काही फोटो सोशल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

फेरीवाला धोरणाची काटेकोर अमंलबजावणी करा – राज ठाकरे

मुंबई – मुंबईमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून  फेरीवाला धोरणाची आणि त्यातल्या नियमाची काटेकोर अमंलबजावणी करण्याची मागणी मनसेच्यावतीने करण्यात आली आहे. अन्यथा महाराष्ट्र...
Read More
post-image
लेख

अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

आज प्रसिद्ध नाट्य-सिने अभिनेत्री आणि नृत्यांगना अश्विनी एकबोटे यांची पुण्यतिथी. त्यांचा जन्म २२ मार्च १९७२ साली झाला. अश्विनी एकबोटे माहेरच्या अश्विनी काटकर, त्यांनी बालपणी नंदनवन...
Read More