नागपूर – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे जन्मगाव असलेले धापेवाडा आणि त्यांनी दत्तक घेतलेले पाचगाव या दोन्ही गावांतील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला पराभव पत्करावा लागला आहे. तसेच गडकरींपाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावातही भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
धापेवाडा या ठिकाणी काँग्रेसप्रणीत पॅनेलचे सुरेश डांगरे सरपंचपदी निवडून आले आहेत. तसेच या ग्रामपंचायत निवडणुकीत 17 जागांपैकी काँग्रेस समर्थित पॅनेलला 16 तर भाजपा समर्थित पॅनेलला केवळ 1 जागा मिळाली आहे. नागपूर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाला चांगले यश मिळाले आहे. तर काटोल आणि नरखेड तालुक्यात राष्ट्रवादी प्रणीत पॅनेलच्या उमेदवारानी बहुतांश ग्रामपंचायतींवर विजय संपादन केला आहे. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी खासदार दत्तक ग्रामयोजनेंतर्गत दत्तक घेतलेल्या उमरेड तालुक्यातील पाचगाव येथे काँग्रेस प्रणीत पॅनेलच्या उषा ठाकरे या विजयी झाल्या आहेत.