मुंबई- कोरोनाचा संसर्ग झाल्याने लिलावती रुग्णालयात उपचार घेत आलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा कौर यांना आयसीयूतून सामान्य कक्षात हलवण्यात आले आहे. प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्यामुळे मला आयसीयूतून सामान्य कक्षात हलवल्याचे नवनीत राणा यांनी स्वतःच फेसबुकवर पोस्ट करून सांगितले आहे.
खा. नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना अमरावतीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर सहा दिवस उपचार सुरु होते. मात्र त्यांची अचानक तब्येत बिघडल्याने नागपुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतरही त्यांची तब्येत आणखी खालावल्याने त्यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. नवनीत राणा यांच्यावर सध्या लिलावती रुग्णालयात उपचार सुरु असून प्रकृती स्थिर असल्याने त्यांना आयसीयूतून सामान्य कक्षात हलवण्यात आले आहे.याबाबत स्वतः नवनीत राणा यांनी फेसबुक वरून माहिती दिली. आज मला आयसीयूतून सामान्य कक्षात स्थलांतरित करण्यात आले आहे. आता माझी प्रकृती थोडी स्थिर आहे. आपल्या सर्वांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे, मी लवकर बरी होऊन जनसेवेस पुन्हा सज्ज होणार आहे, असे नवनीत राणा यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.