कोकण विकासाचे भाकड भाकित – eNavakal
रविवार विशेष लेख

कोकण विकासाचे भाकड भाकित

लक्ष्मीकांत जोशी – जगातील महासत्ता होऊ इच्छिणार्‍या भारताने आपल्या विकासाची व्याख्या नव्याने करण्याची गरज आहे. प्रचंड औद्योगिक विकास म्हणजे महासत्ता,प्रचंड शस्रसामर्थ्य म्हणजे महासत्ता अशी एकांगी व्याख्या करून जगातल्या अमेरिका, रशिया, चीन या देशांनी आपण महासत्ता असल्याचे दाखवले आहे. परंतु भारतासारख्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशात आणि त्याहीपेक्षा सर्वप्रकारची विविधता असलेल्या देशाचे महासत्ता होण्याचे धोरण हे पूर्णपणे वेगळेच राहू शकते. आपल्या येथे दर बारा मैलावर भाषा बदलते. वेगवेगळ्या स्थानिक रूढी, परंपरा, जाती, संप्रदाय यांचे वेगवेगळे दर्शन घडत असते. शिवाय धर्मनिरपेक्षतेचे तत्व अंगिकारल्यामुळे सर्व धर्मांचा आदर केला जातो.

एकीकडे संस्कृती किंवा चालीरीतींमधला हा फरक पदोपदी दिसत असताना दुसरीकडे भौगोलिक विविधताही आपल्या देशात खूप आहे. वर्षातील सहा महिने काश्मिर, हिमाचल, उ्त्तराखंड या सारख्या भागात अतिशय गारवा असतो. हीच काहीशी परिस्थिती सिक्कीम, त्रिपूरा, नागालँड, मेघालय या भागात दिसून येते. तर दक्षिणेतल्या राज्यांमध्ये उष्णता अधिक असते. देशाच्या पश्चिम भागात वातावरण दर चार महिन्यांनी बदलत असते. देशाच्या तीनही सीमा समुद्राने वेढलेल्या आहेत. निसर्गाने बहाल केलेल्या या विस्तीर्ण समुद्रकिनार्‍यामुळे भारताला सागरी संपत्तीची प्रचंड मोठी दैवी देणगीच लाभली आहे. समुद्राचे हे वैशिष्ट्य लक्षात घेऊनच त्याला रत्नाकर म्हटले गेले आहे. अशी विविधता असल्याने भारताचे महासत्ता होणे हे अनेक वेगळ्या पैलूंवर अवलंबून आहे. उलट निसर्गाने बहाल केलेल्या या सगळ्या संपत्तीचा योग्य उपयोग करून भारताला महासत्ता होता येऊ शकते. परंतु आपल्या भौगोलिक आणि पर्यायाने नैसर्गिक साधनसंपत्तीचा विचार न करता औद्योगिक विकासाची धोरण राबवली जातात आणि त्यातून अनेक ठिकाणी विकासाऐवजी विनाशाचाच अनुभव येतो.

महाराष्ट्राला लाभलेल्या अतिशय नयनरम्य कोकण किनारपट्टीचा विनाश करण्याची विपरित बुध्दी सरकारला झाली आहे.  कोकणात येऊ घातलेला नाणार प्रकल्प हा कोकणाच्या विनाशाची नांदी ठरू शकतो. जगातील सर्वात मोठा तेलशुध्दी प्रकल्प महाराष्ट्रात होत असल्याने त्याचा फायदा महाराष्ट्राला होईल. कोकणामध्ये मोठे रोजगार निर्माण होतील. आणि अशा मोठ्या प्रकल्पांमध्ये पायाभूत सुविधांमध्येही वाढ होईल. अशा प्रकारचे भाकड भाकित केले जात आहे. नाणारवासियांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध केला आहे. गेल्या वर्षभरापासून तिथे असंतोष धुमसतो आहे. नाणार ्आणि परिसरातील स्थानिकांनी हा प्रकल्प होऊ नये म्हणून सर्वप्रकारचे विधायक मार्ग अवलंबले.

सर्व पक्षांचे समर्थन मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु गेल्याच आठवड्यात सौदी अरेबियाच्या एका कंपनीबरोबर केंद्र सरकारने नाणार प्रकल्पाविषयी सामंजस्याचा करार केला. महाराष्ट्र सरकार एकीकडे या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असेल तर तो आम्ही होऊ देणार नाही. अशा प्रकारचे आश्वासन देत असताना दुसरीकडे केंद्र सरकार परस्पर सामंजस्य करार करून कोकणवासियांच्या पाठीत खंजिर खुपसण्याचे काम करीत आहे. विकासाचे महत्व फक्त आपल्यालाच समजते. किंवा देशहिताचा व्यापक विचार सरकारला सर्वप्रकारचा विरोध डावलून करावा लागतो. अशी या प्रकल्प समर्थकांची भूमिका दिसते. परंतु प्रामुख्याने कोकणासारख्या नितांत सुंदर परिसराचा विकास कोणत्या माध्यमातून करायचा याचा सारासार विचार राज्य सरकारला करता येत नसेल तर त्यांच्या विकासाचे धोरण हे समाजद्रोही आहे असे म्हणावे लागेल. हा सामंजस्य करार झाल्यानंतर केंद्रीय तेल नैसर्गिक वायू मंत्री धमेंद्र पाल यांनी जे विधान केले आहे. ते सरकारी अहंकाराचे निदर्शक ठरते. या प्रकल्पाचे महत्व लक्षात आल्यानंतर किंवा त्याचे फायदे दिसू लागल्यानंतर प्रत्येकजण त्याचे समर्थन करेल, असे धर्मेंद्र पाल यांनी म्हटले आहे. परंतु त्यांना केवळ आपले निर्णय दडपून न्यायचे आहेत. त्यांच्या तोंडीच ही भाषा शोभू शकते. ते मुळचे कोकणातील रहिवासी नाहीत. शिवाय त्यांचे विकासाचे धोरण हे निसर्गानुकुल नाही अशा परिस्थितीत ते यापेक्षा त्यांच्याकडून वेगळ्या विधानाची अपेक्षाही नाही. परंतु कोकणाची ही निसर्ग संपदा अपार संपत्ती देणारी सागरी संपदा याविषयी महाराष्ट्र सरकारने आग्रही भूमिका घेणे गरजेचे होते.

एकेकाळी कोकणाचे हे सौंदर्य आणि तिथली प्रचंड पर्यटन क्षमता लक्षात घेऊन कोकणाचा कॅलिफोर्निया करू अशा वल्गना राजकारण्यांनी केल्या होत्या. परंतु गेल्या वीस पंचवीस वर्षातली राज्याची कोकणविषयक भूमिका बघितली तर कोकणाचा कॅलिफोर्निया करण्याऐवजी त्याचा कोळसा करण्याचाच विडा उचलल्याचे दिसून येेते. एन्रॉन प्रकल्पाच्या निमित्ताने ते सिध्द झाले होते. त्याचठिकाणी दाभोळ वीज कंपनी आली. परंतु त्या विभागाचा असा कोणता मोठा विकास झाला. उलट दाभोळ बंदराचे जे पर्यटन म्हणून विशेष आकर्षण होते ते कमी झाले. त्याच्याहीपूर्वी अलिबागजवळ थळ येथे मोठा खतप्रकल्प उभारला गेला. या प्रकल्पाच्या पन्नास मैल परिसरामध्ये प्रदूषित हवा असते आणि त्याचा परिणाम स्थानिक पीकपाण्यावर झाला आहे. नागोठणे येथे झालेल्या इंडियन पेट्रोकेमिकल्स लि. या कारखान्यामुळेसुध्दा त्या भागाचे निसर्ग सौंदर्य नाहीसे झाले. एक प्रदूषित परिसर म्हणूनच आज तो ओळखला जातो. हे सगळे अनुभव गाठीशी असताना जगातला सर्वात मोठा अणूप्रकल्प म्हणून जैतापूरची निवड केली गेली. त्याला होणारा विरोध सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर मोडून काढला गेला. आता त्याच पध्दतीने नाणार प्रकल्प आणला जात असून कोकणाच्या उरल्या सुरल्या निसर्गसौंदर्यावरही वरवंटा फिरवला जात आहे. खरे तर या निसर्गसुंदर परिसराचा विकास हा सागराशी संबंधित उद्योगातून त्यातही प्रदूषण विरहित पर्यटनाच्या माध्यमातून करता येऊ शकतो. कोकणाला असलेले हे स्वतंत्र निसर्गाने बहाल केलेले अस्तित्व नाहीसे करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे. मराठमोळ्या संस्कृतीने नटलेल्या परिसरावर विद्रूपतेचे ओरखडे ओढले जात आहेत. रोजगाराचे बुजगावणे उभे करून परप्रांतीयांची संख्या इथे प्रचंड वाढणार आहे. म्हणूनच कोकणाच्या सौंदर्याला गालबोट लागू द्यायचे नसेल तर अशा प्रकल्पांना विरोध झालाच पाहिजे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मराठीत बोलायला सांगितल्याने कुरियर बॉयचा तरुणींवर हल्ला

मुंबई – आज सकाळी 11.30 वाजता दादरच्या न.चिं. केळकर रोडवरील गुरुकृपा अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या पेडणेकर भगिनींच्या घरी कुरियरवाला आला. या भगिनींनी कुरियरद्वारे स्वामी समर्थांची पुस्तके मागविली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मध्य प्रदेशात पबजीवर बंदी आणण्याचा विचार

भोपाळ – अलिकडे स्मार्ट मोबाईल फोनवर पबजी खेळ खेळण्याचा जीवघेणा छंद वाढीस लागला आहे. हा खेळ खेळता खेळता अनेकांना त्याचे व्यसन लागत आहे. त्यामुळे तरुणाईला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

‘क्रोकोडाइल हंटर’ स्टीव्ह यांना गुगलची आदरांजली

नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध पशूप्रेमी स्टीव्ह इरविन यांची आज 57 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलने खास डुडल तयार करून त्यांना मानवंदना दिली आहे. स्टीव्ह इरविन यांना ‘क्रोकोडाइल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना उत्तर प्रदेशात अटक

सहारनपूर – सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद येथून जैश ए मोहम्मदच्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील दहशतवादविरोधी पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली. या संशयितांकडून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

प्रियांका-फरहानच्या ‘स्काय इज पिंक’ची तारीख ठरली

मुंबई – अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि अभिनेता फरहान अख्तर यांचा आगामी चित्रपट ‘स्काय इज पिंक’ कधी प्रदर्शित होणार याविषयी चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. पण आता...
Read More