तिरूअनंतपूरम – केरळची पूर परिस्थिती हळूहळू पुर्वपदावर येत आहे. एक आठवडाभर झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे केरळचे जनजीवन विस्कळीत झाले होेते. अनेक जिल्ह्यांना या पूराचा तडाखा बसला आहे. या महापूरात आतापर्यंत 104 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. तर 36 जण बेपत्ता आहेत. आता पावसाचा जोरदेखील कमी झाला आहे. आज सूर्यदर्शन झाल्याने लोकांना बरे वाटले. सूर्य दर्शनामुळे शोधकार्याला वेग आला. श्वानपथके आणि अर्थमूव्हर्सच्या सहाय्याने शोधकार्य सुरू आहे. कवलप्पारा येथे ड्रोनच्या मदतीने बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात आहे. मलप्पूरम जिल्ह्यातील कवलप्पारा आणि वायनाड जिल्ह्यातील पुथुमला येथे गेल्या आठवड्यात दरड कोसळली. त्यामध्ये दोन गावे अक्षरशः गाडली गेली. संततधार पावसामुळे साधारण दहा दिवसांपासून ऊन पडले नाही त्यामुळे वातावरणात रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.
