मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून पालिकेच्या महत्त्वाच्या केईएम रुग्णालयातील भ्रृण प्रकरणी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने प्राथमिक चौकशी केली असता सीसीटीव्हीच्या आधारावर केलेल्या तपासणीत जैविक कचरा टाकण्याच्या कक्षात मांजराच्या कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळून आलेल्या नाहीत, असे स्पष्ट केले. त्यामुळे प्रशासनाने आता खात्यांतर्गत चौकशीचे आदेश दिल्याने अधिकार्यांसह कर्मचार्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
पालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नोव्हेंबरमध्ये प्रिन्स राजभर या चार महिन्याच्या बालकाचा दुदैवी मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच आठवडाभरापूर्वी मांजराने भ्रृण खाल्ल्याची घटना समोर आली. केईएम रुग्णालयाचा कारभार या घटनेनंतर पुन्हा चव्हाट्यावर आला. विविध स्तरांवरुन केईएम रुग्णालयावर टीका झाली. पालिकेला बदनाम करण्यासाठी समाजकंटकाचे प्रयत्न आहेत, असा संशय केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी व्यक्त केला होता. कचरा वाहून नेणार्या कंत्राटदार दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा डॉ. देशमुख यांनी दिला. दरम्यान, आयुक्तांनी याप्रकरणाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमली होती. या समितीने जैविक कचरा टाकण्याचा कक्ष आणि परिसरातील सीसीटीव्ही तपासले. यात मांजराच्या किंवा कोणत्याही आक्षेपार्ह हालचाली सापडल्या नाही, असे प्राथमिक अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे कंत्राटदाराला क्लीन चिट दिली आहे.
