मुंबई- कुख्यात गुंड रवी पुजारीला आज कर्नाटकवरून मुंबईत आणण्यात आले. त्यानंतर त्याला कुलाब्यातील गजाली हॉटेल गोळीबार प्रकरणी मुंबईतील मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी रवी पुजारीला 9 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. रवी पुजारीवर मुंबईत 49 हून अधिक गुन्ह्यांची नोेंद आहे.
दोन वर्षापुर्वी कर्नाटक पोलिसांच्या प्रयत्नांमुळे रवी पुजारीच्या दक्षिण आफ्रिकेतील सेनेगल येथून मुसक्या आवळण्यात आल्या होत्या. मात्र खोटी ओळख आणि राष्ट्रीयत्वाचा मुद्दा पुढे करत पुजारीने भारतातील संभाव्य प्रत्यार्पण रोखून धरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मुंबई गुन्हे शाखा आणि कर्नाटक पोलिसांनी अथक प्रयत्न करुन तो रवी पुजारीच असल्याचे सिध्द केले आणि भारतात त्याच्याविरुध्द दाखल असलेल्या दीडशेहून अधिक गंभीर गुन्ह्यांची कुंडलीच त्यांच्यासमोर मांडली. त्यामुळे पुजारीचे भारतात प्रत्यार्पण झाले. तेव्हापासून तो कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात होता. पुजारीचा ताबा मिळवण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचे काही दिवसांपासून प्रयत्न सुरु होते. अखेर मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाला 2016 साली विलेपार्लेे येथील गझाली हॉटेलमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणी पुजारीचा ताबा मिळाला. सर्व कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करत आज सकाळी त्याला मुंबईत आणण्यात आले.