मुंबई – कर्नाटकचे विद्यमान राज्यपाल आजही संघ स्वयंसेवक म्हणून इमानेइतबारे कर्तव्य बजावत आहेत, अशी टीका आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. काँग्रेसतर्फे आज देशभरात ‘लोकशाही वाचवा दिवस’ राबवण्यात आला. त्यानिमित्त एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी चव्हाण बोलत होते. भाजपच्या या असंविधानिक कृतीचा निषेध करण्यासाठी मुंबई काँग्रेसतर्फे अमर जवान ज्योतीजवळ हे आंदोलन करण्यात आले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपाच्या बेदरकार राजकारणावर कठोर शब्दांत टीका केली. भाजपाने भारताची लोकशाही धोक्यात आणली असून सगळ्या राज्यांचे राज्यपाल देश चालवत आहेत असे चित्र सध्या देशात आहे. गोवा, मणिपूर, मेघालय आणि आता कर्नाटकात राज्यपालांनी भाजपा पक्षश्रेष्ठींच्या दबावाखाली निर्णय घेतले आहेत. राजभवन हे सत्ताधार्यांचा अड्डा बनलेला आहे. सर्व सूत्र राजभवन वरुन हलत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह ही जोडगोळी दबावतंत्र वापरून राज्यपालांना निर्णय घ्यायला भाग पाडते आहे. कर्नाटकचे राज्यपाल हे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर स्वयंसेवक होते आणि आजही आहेत, असा टोला यावेळी बोलताना चव्हाण यांनी मारला. आज ते महत्त्वाच्या घटनात्मक पदावर असल्याने स्वयंसेवकासारखे वागू शकत नाहीत. पण दुर्दैवाने ते तसे वागतायत, असे चव्हाण म्हणाले. नरेंद्र मोदिच्या गुजरात मंत्रिमंडळात ते होते. त्यांचे निकटवर्तीय म्हणून वाला यांची ख्याती आहे. त्यामुळेच बहुमत नसतानाही त्यांनी भाजपाच्या बाजूने निकाल दिला. निवडणूक झाली की आमदार पळवायचे, पैसे वाटायचे, फोडाफोडीचे राजकारण करायचे, पोलिसांचा दबाव आणायचा असले घाणेरडे राजकारण भाजपा पहिल्यापासून करत आली आहे. काँग्रेसने असे कधीही केलेले नाही, आम्ही नेहमी लोकांचा कौल ऐकला, लोकांच्या निर्णयाचे स्वागत केले, काँग्रेस नेहमी लोकांच्या बाजूने उभे राहिली. काँग्रेसने लोकशाहीचा नेहमी आदर केलेला आहे. कर्नाटकात उद्या काँग्रेस-निजद आघाडी बहुमत सिद्ध करेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे, असे शेवटी चव्हाण म्हणाले.
या धरणे आंदोलनावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, माजी मंत्री सुरेश शेट्टी, माजी खासदार एकनाथ गायकवाड, माजी आमदार चरण सिंग सप्रा, आमदार भाई जगताप, उपस्थित होते.