मुंबई – जुहू येथून उड्डाण केलेले ओएनजीसीचे पवनहंस हेलिकॉप्टर सकाळी डहाणूजवळील समुद्रात कोसळले. या हेलिकॉप्टरमधून ओएनजीसीचे 5 कर्मचारी आणि 2 पायलट प्रवास करीत होते. यांपैकी 4 जणांचा मृत्यू झाला असून इतर तीन जणांचा शोध सुरु आहे. मृतांमध्ये व्ही. के. बाबू, जोस अँटोनी, पंकज गर्ग आणि पी. श्रीनिवासन यांना समावेश आहे.
हेलिकॉप्टर ओएनजीसीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. कंपनीने करार केल्याने पवनहंस हेलिकॉप्टर पाच ते सहा वर्षांपासून ओएनजीसीसोबत काम करत होते. जुहू येथून ओएनजीसीच्या ऑफशोर डेव्हलपमेंट एरियाकडे (ओडीए) निघालेल्या डाऊफिन एएस 365 एन3 या हेलिकॉप्टरचा सकाळी एअर ट्राफिक कन्ट्रोलशी संपर्क तुटल्याने ते समुद्रात कोसळल्याची भीती व्यक्त केली जात होती. काही काळाने हे हेलिकॉप्टर डहाणूच्या समुद्रात कोसळल्याचे समजले. त्यानंतर नौदल आणि तटरक्षकदलाकडून समुद्रात बचावकार्य सुरु केले.
ओेएनजीसीच्या 5 अधिकार्यांना घेऊन निघालेल्या या हेलिकॉप्टरने जुहू येथून सकाळी 10.20 वाजता उड्डाण केले. हे हेलिकॉप्टर मुंबईनजीक अरबी समुद्रातील ओएनजीसीच्या तळावर 10.58 वाजता पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, ते अद्याप येथे पोहोचलेले नाही. मुंबईपासून समुद्रात 30 नॉटिकल माइल्स इतक्या अंतरावर गेल्यानंतर 10.30 वाजल्यापासून या हेलिकॉप्टरचा एअर ट्राफिक कन्ट्रोलशी संपर्क होऊ शकला नव्हता. मात्र, हे हेलिकॉप्टर डहाणूजवळ समुद्रात कोसळल्याचे समजले. या हेलिकॉप्टरचे अवशेष नौदलाला या ठिकाणी आढळून आले.
याप्रकरणी प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री धर्मेंद प्रधान म्हणाले, ‘नौदल आणि तटरक्षक दल आपले काम करीत असून त्यांच्या समन्वयासाठी मी मुंबईकडे निघालो आहे. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण यांच्यासोबत याप्रकरणी चर्चा झाली आहे. त्यांनी यात सहकार्याची भुमिका दाखवली असून नौदल आणि तटरक्षकदलाला यामध्ये पूर्णपणे सहकार्याचे आदेश दिले आहेत.’