एकाकीपणाला सामाजिकतेचे कवच हवे – eNavakal
रविवार विशेष

एकाकीपणाला सामाजिकतेचे कवच हवे

लक्ष्मीकांत जोशी  – एकाकीपणाला सामाजिकतेचे कवच हवे  नुकताच म्हणजेच 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन म्हणून पाळला गेला. प्रामुख्याने भारताचे समाजचित्र समोर उभे केले. तर एकेकाळी सुखी समाधानी असलेल्या भारतीय समाजामध्ये आज असमाधान अनारोग्य याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या भारतासारख्या मोठ्या देशातील जनसामान्यांच्या आरोग्याची काळजी किती विविध पध्दतीने घेण्याची गरज आहे हे जागतिक आरोग्यदिनाच्या निमित्ताने तपासण्याची गरज होती. जागतिक आरोग्य संघटनेच्या अलिकडच्याच अहवालामध्ये संपूर्ण जगात आरोग्याचा एक महत्वाचा पैलू विचारात घेतला गेला. तो म्हणजे मनुष्य समाधानी आणि आनंदी राहाण्यासाठी काय करता येईल. त्यासाठी सरकारी पातळीवरून प्रयत्न करण्याची गरजही वाटू लागली आहे. ज्याला त्यांनी हॅपीनेस असा शब्द वापरला आहे. लोकांनी आनंदी राहाण्यासाठी कोणकोणत्या पैलूंची गरज आहे याचाही विचार विविध स्तरातून सुरु झाला आहे. अर्थातच परदेशातले हे प्रयोग पाहून भारतातही हे खुळ येण्याची शक्यता आहे. परंतु परदेशातली समस्या आणि भारतीयांची समस्या यात मूलभूत फरक पडतो. अमेरिका किंवा युरोपीय राष्ट्रांमध्ये असेली सुबत्ता तिथल्या सुशिक्षितांचे प्रमाण छोटे कुटुंब , सतत कार्यमग्न राहाण्याची सवय आणि वयाच्या विशिष्ट कालावधीत येणारा एकाकीपणा असा तो क्रम लागतो. आणि या एकाकीपणामुळे परदेशांमधले अनेक लोक नैराश्याने आणि दुःखाने ग्रासले असल्याचे आढळून येते. पैसा आहे शिक्षण आहे. परंतु समाजातल्या विशिष्ट रचनेमुळे त्यांना एकाकीपणाचा सामना करावा लागतो. त्यांनी आनंदी राहावे म्हणूनच त्यांचा हा एकाकीपणा घालवायची व्यवस्था आता सरकारीपातळीवरून केली जाणार आहे. ही समस्या भारतातही येईल असे अनेकांचे म्हणणे आहे. परंतु त्याची गंभीरता परदेशाइतकी नसेल. कारण मुळातच भारत हा समाजप्रिय देश आहे. आज शहरांमध्ये काही प्रमाणात आणि त्यातही प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांमध्ये या एकाकीपणाची समस्या पाहायला मिळते. अनेकांची मुले परदेशात गेलेली असतात. आणि आई वडिल इकडे एकटेच राहात असतात. शिवाय आर्थिक परिस्थितीमुळे आणि कुटुंबातील विसंवादामुळे अनेक मुलं आपल्या आईवडिलांना वृध्दाश्रमात ठेवतात. वृध्दाश्रमात या मंडळींना भावनिक एकाकीपणाला सामोरे जावे लागते त्यांची काळजी घेणारे आणि विचारपूस करणारे तिथे जरी असले तरी मनामध्ये आपण वृध्दाश्रमात आहोत आणि एकटे आहोत ही भावना त्यांना अस्वस्थ करीत असते.  आधुनिक काळातील जीवनशैलीचा विचार केला तर या अनारोग्याचा महत्वाचा भाग ठरणार्‍या एकाकीपणाविषयी निश्चितच विचार करावा लागेल. सुदैवाने भारताचा सत्तर टक्के भाग ग्रामीण स्वरुपाचा आहे. आणि अजूनही ग्रामीण भागामध्ये सामाजिक एकसंधता किंवा सामाजिक सदभाव बर्‍यापैकी दिसून येतो. भारताची कुटुंब व्यवस्था अजूनही नातेसंबंधांनी बर्‍यापैकी समृध्द दिसते. पाश्चात्यांमध्ये अंटी आणि अंकल याच्यापलिकडे नाती आठवत नाही. भारतीय कुटुंब व्यवस्थेत मात्र मामा, मावशी, काका, आत्या, अशी नातेवाईकांची साखळी सहजपणे तयार होते. विविध कौटुंबिक समारंभांच्या निमित्ताने एकत्र येणारे नातेवाईक हाच एकाकीपणा घालवण्याचा प्रयत्न करीत असतात. किंबहुना एकमेकांशी ठेवले जाणारे नातेसंबंध सामाजिक आणि मानसिक आरोग्याचा कितीतरी मोठा आधार असतो. भारतीय संस्कृतीत किंवा सामाजिक रचनेमध्ये कुटुंब व्यवस्था आणि नातेसंबंधांचा केला गेलेला विचार आजच्या आधुनिक युगात महत्वाचा वाटू लागतो. अनेक तत्ववेत्यांनी मॅन इज अ सोशल अ‍ॅनिमल अशा प्रकारे त्याचे वर्णन केले आहे. म्हणजेच माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे आणि ही गोष्ट तितकीच खरी ठरते. भारतीय माणूस शक्यतो एकटा राहात नाही. सतत कुठल्या ना कुठल्या कार्यामध्ये स्वतःला तो गुंतवून घेत असतो. अगदी कुटुंबाची सर्व जबाबदारी स्वीकारण्यापासून ते विविध सामाजिक कार्यात तो रस घेताना दिसतो. मग अगदी सार्वजनिक गणेशोत्सवांपासून ते त्या त्या जातीच्या विविध मेळावे किंवा उपक्रमांमध्ये तो सहभागी होत राहातो. त्याचा हा सामाजिक गुण सर्वप्रकारच्या एकाकीपणावर मात करणारा ठरतो. आणि म्हणूनच जगामध्ये उदभवू पाहाणार्‍या एकाकीपणाच्या समस्येला भारतात थारा द्यायचा नसेल तर शक्यतो प्रत्येकाने विविध सामाजिक उपक्रमांशी स्वतःला जोडून घेतले पाहिजे. अशा या सामाजिक कार्यव्यस्ततेमुळे मनाचा ताजेपणा टिकून राहातो. आणि आपलेपणाचा भाव इतरांमध्येसुध्दा वृध्दिंगत करता येतो.  मुंबईसारख्या गर्दीच्या महानगरात एकाकीपणा किंवा लोन्लीनेस आणि त्यातून निराशा किंवा दुःख येत असेल तर तोही एक मोठा विरोधाभास ठरतो. माणसांची आजुबाजूला एवढी गर्दी असूनही अशा प्रकारचा एकाकीपणा म्हणजेच एक मोठे सामाजिक दुर्दैव म्हणावे लागेल. एक गोष्ट खरी आहे की मोठ्या शहरांमध्ये आपल्या शेजारी कोण राहातो याचीसुध्दा अनेकवेळेला कल्पना नसते. किंवा कामाच्या निमित्ताने दिवसभर बाहेर असलेले लोक आपला शेजारधर्मही नीट पाळू शकत नाहीत. अर्थातच या परिस्थितीत बदल झाला पाहिजे तो काही प्रमाणात होताना दिसतोही आहे. लोकांनीच पुढाकार घेऊन सुरु केलेले विविध उपक्रम हे याच सामाजिक आरोग्याचे मोठे लक्षण म्हणावे लागेल. आजकाल मोठ्या प्रमाणावर दिसून येणारे हास्यक्लब विविध बगिचांमध्ये एकत्र येणारा महिला वर्ग सकाळी फिरायला जाणार्‍यांचा येणारा एकमेकांशी संबंध अनेक गृहनिर्माण संस्थांमध्ये जाणीवपूर्वक राबविले जाणारे सदस्यांच्या एकत्रीकरणाचे प्रयोग आणि याही पलिकडे आपली मनशांती मिळवण्याकरीता भक्तीमार्ग किंवा अध्यात्मामध्ये स्वतःला सामावून घेणारे लोकही पाहायला मिळतात. फक्त विशेषत्वाने दखल घेणारा घटक म्हणजे प्रत्येक कुटुंबातला तरूण वर्ग हा काही प्रमाणात स्वतःला वेगळे पाडून घेण्याचा प्रयत्न करताना दिसतो. फेसबुक , मोबाईल , व्हॉटसअप या माध्यमातून अनेक मित्र त्यांचे असतात. परंतु कुटुंबामधला त्यांचा सहभाग किंवा संवाद तितकासा समाधानकारक वाटत नाही. तरुण वर्गाच्या या आधुनिक जीवनशैलीमध्ये त्यांच्यातला हा विचित्र एकाकीपणा घालवला गेला पाहिजे. कुटुंबातच त्यांच्याशी संवाद सुरु झाला पाहिजे. आरोग्याचा विचार करीत असताना त्या एकाकीपणाला सामाजिकतेचे कवच निश्चितच सहाय्यभूत ठरू शकते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

दुष्काळाबाबत लवकरच जीआर काढणार – मुख्यमंत्री

मुंबई – ३१ ऑक्टोबरनंतर राज्यातील तब्बल 179 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करणार, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी जाहीर केले. त्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
क्रीडा

ही आहे धोनीची नवी स्टाईल

नवी दिल्ली – भारत विरुध्द वेस्टइंडीज यांच्यातील पहिला सामना रविवारी खेळण्यात आला, त्यादरम्यान टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी याने स्वत:चे काही फोटो सोशल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

फेरीवाला धोरणाची काटेकोर अमंलबजावणी करा – राज ठाकरे

मुंबई – मुंबईमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून  फेरीवाला धोरणाची आणि त्यातल्या नियमाची काटेकोर अमंलबजावणी करण्याची मागणी मनसेच्यावतीने करण्यात आली आहे. अन्यथा महाराष्ट्र...
Read More
post-image
लेख

अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

आज प्रसिद्ध नाट्य-सिने अभिनेत्री आणि नृत्यांगना अश्विनी एकबोटे यांची पुण्यतिथी. त्यांचा जन्म २२ मार्च १९७२ साली झाला. अश्विनी एकबोटे माहेरच्या अश्विनी काटकर, त्यांनी बालपणी नंदनवन...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा मुंबई

सचिन-विनोदची जोडी पुन्हा मैदानात

मुंबई – शालेय जीवनापासून ते भारतीय संघातील ‘जय-विरू’ म्हणजेच सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी ही जोडी पुन्हा एकदा मैदानांवर एकत्र दिसणार आहे. अलीकडच्या काही वर्षात दोघांच्या मैत्रीमध्ये...
Read More