उल्हासनगर- उल्हासनगर महापालिकेच्या महापौर पदावर पप्पु कलानी व राष्ट्रवादीच्या आमदार ज्योती कलानी यांच्या सून भाजपाच्या पंचम कलानी यांची निवड झाली असून शहरात अनेक समस्या असल्याने त्यांना या समस्या सोडवण्यासाठी तारेवरील कसरत करावी लागणार आहे. कारण त्यांच्या डोक्यावर समस्यांचा डोंगर उभा ठाकला आहे आणि त्यांना एक वर्षाचा कालावधी असल्याने त्या या समस्या सोडवितात किंवा नाही हे एका वर्षात समजणार आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या महापौर पदावर भाजपाच्या पंचम कलानी या विराजमान झालेल्या असून त्यांना अनेक समस्या सोडविण्याकरिता मन लावून काम करावे लागणार आहे. उल्हासनगर हे समस्यांचे शहर असून या शहरात आतापर्यंत एकही प्रकल्प पूर्णत्वास गेला नाही. खेमाणी नाल्याचा प्रकल्प, वालधुनीचे स्वच्छताकरण, के. बी. रोडचे काम, पाण्याचा प्रकल्प, मुस्लिमांचे कब्रस्तान, शहरातील घाणेरडे रस्ते, नाले गटारी, रुग्णालयाची समस्या अशा असंख्य समस्या शहरात आहेत. या समस्या सोडविण्यासाठी महापौर पंचम कलानी यांना फार परिश्रम करावे लागणार आहेत. तर त्यांना सुध्दा या समस्या सुटल्या पाहिजेत असे वाटते. त्यामुळे एका वर्षात महापौर यांना शहराचा विकास करून येणार्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीचे चीज करावे लागणार आहे. दरम्यान, उल्हासनगर हे समस्यांचे शहर म्हणून लोकप्रिय आहे. त्यामुळे या शहरातील समस्या या महापौरांच्या कारकिर्दीत सुटल्या तर शहराचा विकास झाल्याचे दिसून येईल.