रक्त सांडल्याशिवाय त्यांना लोकशाही कळत नाही
पालघर – भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांची काल दीड तास प्रदीर्घ भेट झाल्यावर आज तलासरीला उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष होते. उद्धवजींनी आज भाषणात पुन्हा भाजपा विरोधात तोफ डागली. आगामी लोकसभा निवडणुक जिंकणारच. श्रीनिवास वनगांना खासदार केल्याशिवाय गप्प बसायचे नाही, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. उध्दव ठाकरेंच्या या भुमिकेमुळे काल शहांसोबत झालेली बैठक फिस्कटली असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, पालघरची निवडणूक हा 2019 ची ट्रेलर आहे. साम, दाम, दंड, भेद वापरून जिंकत असाल तर हा तुमचा पराभव आहे. वनगा साहेबांनी मर मर करून काम केले. पण त्याची दखल घेतली नाही. त्यावेळी आम्हाला वेळ कमी मिळाला. आता 8 महिने आहेत, श्रीनिवास वनगा खासदार झालाच पाहिजे. एका निष्ठावान परिवाराची अवहेलना केली. ती निष्ठा आम्हाला जपायची आहे. सतत उपरे घेतले तर निष्ठावारांनी करायचे काय? केवळ पालखी वाहायची का?
इकडे रस्ता जाणार, बुलेट ट्रेन जाणार, वाढवण बंदर होणार आहे. त्याचे काय करणार ते विचारा. निवडणुकीच्या वेळी आश्वासनांचे बुडबुडे उठवतात. आता आश्वासने पूर्ण करा. नाणारची जनताही पेटली आहे. त्यांचे आयुष्य बरबाद करून विकास आम्ही होऊ देणार नाही. लोकांच्या मताला किंमत देत नाहीत, त्यांचे म्हणणे ऐकून घेत नाहीत. जगलात-मेलात पर्वा नाही, ते विकास करणार. त्यांना रक्त शिंपल्याशिवाय लोकशाही कळत नाही. त्यांच्या हातात दंडुका आहे म्हणून काहीही करतील हे आम्ही होऊ देणार नाही. शिवसेनेच्या भगव्या खाली सर्व आले तर पालघरवासीयांना हवा तोच विकास होईल. श्रीनिवास वनगा यांना पालघर लोकसभा मतदारसंघाचे संघटक बनवित आहोत, असे उध्दव ठाकरे यांनी जाहीर केले.
पालघर लोकसभा मतदारसंघात चिंतामण वनगा यांना साडेपाच लाख मते पडलेली. आता जे जिंकुन आलेत त्यांच्याविरोधात तेवढी मते पडली असल्याचेही ते म्हणाले.