इसिसच्या वाढत्या कारवायांना कसे रोखणार ?  – eNavakal
गुरुवार विशेष

इसिसच्या वाढत्या कारवायांना कसे रोखणार ? 

प्रतिज्ञा पवार-शेटे
इसिस या दहशतवादी संघटनेने इराकमधील मोसूल येथून १५ जून २०१४रोजी ४० भारतीय बांधकाम कामगारांचे अपहरण केले होते. त्‍यापैकी हरजित मसीह नावाचा एक भारतीय इसिसच्‍या तावडीतून जीव वाचवून पळून येण्‍यास यशस्‍वी झाला होता.मात्र इतर ३९ जणांची अद्याप काहीही माहिती मिळाली नव्हती. कुर्दिश प्रादेशिक सरकारच्‍या एका वरिष्‍ठ अधिकाऱ्याने ईमेलने सांगितले होते की, दहशतवाद्यांनी अपहरण केल्‍याच्‍या काहीच दिवसानंतर बदोश (मोसूलजवळ) येथे त्‍यांची गोळी मारून हत्‍या करण्‍यात आली. त्‍या नंतर त्‍यांना साहाजीच्‍या जवळ सामूहिकरीत्‍या दफन करण्‍यात आले. इराकी अधिकाऱ्याने ही इराकी गुप्‍तचर संस्‍थेने केलेला तपास आणि राबवलेली शोध मोहीम या आधारे माहिती दिली होती.

मात्र आता इसीस या दहशतवादी संघटनेने इराकमधील मोसूल शहरातून अपहरण केलेल्या ३९ भारतीयांना ठार केले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिली. तीन वर्षांपूर्वी या भारतीयांचे अपहरण झाले होते असे त्यांनी सांगितले. यापैकी बहुतांश जण पंजाबमधले आहेत. सर्व ३९ जणांचे डीएनए नमुने त्यांच्या नातेवाईकांच्या डीएनएशी जुळले आहेत. या भारतीयांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात येतील, असेही त्या म्हणाल्या.

या भारतीय नागरिकांपैकी बहुतांश मजूर होते. स्वराज म्हणाल्या, ‘मी गेल्या वर्षी संसदेत सांगितले  होते की जोपर्यंत सबळ पुरावा मिळत नाही, तोपर्यंत या ३९ जणांना मृत घोषित करणार नाही. काल आम्हाला इराक सरकारकडून माहिती मिळाली की ३८ लोकांचे डीएनए १०० टक्के जुळले आणि एका व्यक्तीचा डीएनए ७० टक्के जुळला आहे. जनरल व्ही. के. सिंह त्यांचे पार्थिव घेऊन येतील. विमान अमृतसरला उतरेल. ३१ जण हिमाचल आणि पंजाबचे आहेत. त्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना दिले जाती. उर्वरित लोक बिहार आणि बंगालचे आहेत. नातेवाईकांना मृतदेह सुपूर्द करू तेव्हा क्लोजर रिपोर्टही सुपूर्द करू.’ अशी माहिती स्वराज यांनी दिली.

‘अपहरण झालेल्या ४० लोकांपैकी एक हरजीत याने मला फोन करून वाचवण्याची विनंती केली होती. त्यानेच अशीही माहिती दिली की ३९ जणांना डोक्यात गोळी मारली आणि त्याच्या पायावर गोळी मारली. तो अली बनून ट्रकमध्ये लपून पळाला. तो ज्या कंपनीत काम करत होता, त्या कंपनीकडून परराष्ट्र मंत्रालयाने या माहितीची खातरजमा केली आहे असे सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत सांगितले.

या घटनेने सामान्य नागरिकांना आपल्या अस्तित्वाबद्दल प्रश्न निर्माण झाला नाही तर नवल ! कारण जगभरात इसिसने जो धुमाकूळ घातला आहे त्यास पायबंद घालण्यास सर्वच देशांना अपयश येत आहे. भारतच नव्हे तर अमेरिका,फ्रांस अशा देशांनादेखील इसिसच्या दहशतवादी कारवायांची झळ लागली आहे.

अमेरिका आणि इतर देशांवर इसिसने केलेले हल्ले 

स्पेनमधील बार्सिलोना शहरातील रामब्लास या गजबजलेल्या भागात दहशतवाद्यांनी ‘व्हॅन’ घुसवून अनेक नागरिकांना चिरडले. त्यात तेरा जण जागीच ठार झाले तर १०० जण जखमी झाले. स्पेनमधीलच कॅम्ब्रिल्स या दुसऱया शहरातही अशाच प्रकारचा ‘व्हॅन ऍटॅक’ करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांचा होता, पण पोलिसांनी वेळीच हालचाल केली आणि पाचही दहशतवाद्यांना ठार केले. त्यामुळे कॅम्ब्रिल्सचे नागरिक सुदैवी ठरले. बार्सिलोनावासी मात्र दुर्दैवी ठरले. तेथील हल्ल्यात शंभरावर नागरिक जखमी झाले असल्याने मृतांची संख्या आणखी वाढू शकते. अपेक्षेनुसार ‘इसिस’ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. गेल्या दोन-चार वर्षांपासून इसिसच्या रडारवर युरोपीय देश आहेत. ब्रिटनसह फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, इटली, बल्गेरिया, बेल्जियम, डेन्मार्क आदी युरोपीय देशांमध्ये इसिसच्या दहशतवाद्यांनी आतापर्यंत शेकडो निरपराध्यांच्या रक्ताचे सडे सांडले आहेत.त्यातही इसिसचा रोख लंडनसारख्या शांत व रम्य आणि पॅरिससारख्या सुंदर शहरावर जास्त आहे. २०१५ सालच्या नोव्हेंबरमध्ये आयसिसने पॅरिस महानगरामध्ये घडवून आणलेल्या हल्ल्यांमध्ये १२९ लोक मृत्युमुखी पडले.

Barcelona : Injured people are treated in Barcelona, Spain, Thursday, Aug. 17, 2017 after a white van jumped the sidewalk in the historic Las Ramblas district, crashing into a summer crowd of residents and tourists and injuring several people, police said.AP/ PTI(AP8_17_2017_000193A)

त्यामुळे गेल्या दोन वर्षांत एकटय़ा लंडनला चार-पाच दहशतवादी हल्ल्यांना तोंड द्यावे लागले. ग्रीनफेल टॉवरमध्ये जे भीषण अग्नितांडव गेल्या वर्षी झाले त्यात शंभरावर रहिवाशांचा मृत्यू झाला होता. हे अग्नितांडव म्हणजे घातपातच असावा अशी शंका त्यावेळी उघडपणे घेतली गेली होती.  लंडनमधील एका मशिदीबाहेर लोकांच्या अंगावर व्हॅन घालून हल्ला करण्यात आला होता. फ्रान्समधील नीस शहरातदेखील सणानिमित्त आतषबाजीचा आनंद लुटणाऱ्या गर्दीत ट्रक घुसवून शंभरावर लोकांना चिरडून ठार मारण्यात आले होते. पॅरिसमध्ये तीन वर्षांपूर्वी झालेले सात साखळी बॉम्बस्फोट हा तर २००४ नंतर युरोपमध्ये झालेला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. या नरसंहारात सुमारे दीडशे लोकांचा बळी गेला होता. बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्सदेखील दोन वर्षांपूर्वी तिहेरी धमाक्यांनी हादरली होती. इसिस आणि इतर दहशतवादी संघटनांनी या पद्धतीने इंग्लंड, फ्रान्ससह त्या परिघातील युरोपीय देशांमध्ये दहशतवादी हल्ल्यांचे धमाके सुरूच ठेवले आहेत.

मुस्लिम धर्मांधतेबाबत तेथील राज्यकर्त्यांची कणखर भूमिका आणि इराक, सीरिया वगैरे देशांतील इसिसच्या अड्डय़ांवर अमेरिका-रशियासह युरोपीय राष्ट्रांनी केलेले हल्ले याचा हा सूड आहे हे उघड आहे. त्यातही नेहमीच्या हल्ल्यांपेक्षा गर्दीत ट्रक किंवा व्हॅन भरधाव घुसवून लोकांना चिरडण्याचा, ठार मारण्याचा निर्घृण आणि अमानुष मार्ग इसिसने युरोपातील दहशतवादी हल्ल्यांसाठी निवडला आहे. सुरक्षा यंत्रणा आणि लोकांनाही असे हल्ले रोखता येणे तसे अवघडच असते. त्यामुळे ‘संधी’ मिळेल तेव्हा आणि तेथे ट्रक किंवा व्हॅन टेररिझमचा उत्पात घडवणे इसिसला शक्य होत आहे. खरे म्हणजे या देशांची जमीन दहशतवाद्यांसाठी भुसभुशीत नाही. तरीही इसिसने गेल्या दोन वर्षांत या देशांमध्ये अनेक दहशतवादी हल्ले घडवले हे लक्षात घेतले पाहिजे. इराकमध्ये इसिस मागे हटले, सीरियामध्येही अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आदी युरोपीय देशांनी इसिसचे कंबरडे मोडले. इसिसचा म्होरक्या अबू बगदादी मारला गेला. त्यामुळे त्याच्या पिलावळीची भागम्भाग सुरू आहे वगैरे बातम्या अधूनमधून प्रसिद्ध होत असतात. त्यात काही खऱया असतात तर काही अंदाजपंचे असतात. इसिसचा प्रभाव अलीकडे कमी झाला आहे हे खरे, पण स्पेनमधील व्हॅन ऍटॅकने युरोपीय देशांवरील इसिसचे संकट आजही तेवढेच गंभीर आणि कायम असल्याचे दाखवून दिले आहे.

पाकिस्तानातील दहशतवादी हल्ले
शेजाऱ्याच्याघरात आग लावण्याची स्वप्ने पाहावीत आणि शेजार पेटण्याच्या आधी स्वत:चेच घर रोज थोडे थोडे जळावे, अशी काही गत पाकिस्तानची झाली आहे. दहशतवाद्यांना पोसून भारताला कायम अस्थिर ठेवण्याचे मनसुबे बाळगणारा पाकिस्तान स्वत: मात्र अस्थिरतेतून बाहेर पडू शकलेला नाही. लाहोर शहराच्या पूर्व भागात असलेल्या गुलशन-ए-इक्बाल नावाच्या पार्कमध्ये   एप्रिल २०१६मध्ये गर्दीच्या दिवशीच दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला;या पार्कमध्ये घडविण्यात आलेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात तब्बल ७२ निष्पाप पाकिस्तानी नागरिकांचा बळी गेला आणि अडीचशेहून अधिक जण जखमी झाले. इसिस या संघटनेने हे दुष्कृत्य केले ते पाकिस्तानातच वाढलेल्या दहशतवादी संघटनेचे सदस्य होते.२०१६ मध्ये  तीन महिन्यांमध्ये पाकिस्तानात एकूण १३ दहशतवादी हल्ले झाले], त्यात जवळपास दीडशे लोकांचा बळी गेला आहे. भारताला कायम धुमसत ठेवण्यासाठी पाळलेले दहशतवाद्यांच्या रूपातील साप पाकिस्तानलाच डंख करू लागल्याचे स्पष्ट झाले आहे. सद्य:स्थितीत पाकिस्तानात एकूण ४८ दहशतवादी संघटना सक्रिय आहेत. त्यातल्या तब्बल १२ संघटना पाकिस्तानातच जन्माला आलेल्या आहेत. लाहोरमध्ये नुकताच झालेला हल्ला हा अशाच पाकिस्तानात जन्मलेल्या ‘जमात-उल-अहरार’ या दहशतवादी संघटनेची ‘कृपा’ ठरली आहे. ‘तहरि]क-ए-तालिबान पाकिस्तान’ या संघटनेपासून विभक्त झाल्यानंतर या संघटनेने अधिक क्रूरपणे हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. इस्लामिक स्टेट आॅफ इराक अ‍ॅण्ड सीरिया संघटनेसोबत अर्थात इसिससोबत ‘जमात-उल-अहरार’चा संबंध असल्याचेही बोलले जाते. इसिससोबत संबंध ठेवणाऱ्या संघटना जर पाकिस्तानात पोसल्या जाणार असतील तर इराक आणि सीरियामध्ये जी युद्धजन्य परिस्थिती आहे, तीच स्थिती पाकमध्येही उद्भवेल, यात तिळमात्र शंका नाही. इसिसने इराक-सीरियात घातलेला धुमाकूळ आणि इतर पश्चिमी देशांवर केलेले हल्ले नजरेसमोर आणले तर मुस्लीम राष्ट्र असणाऱ्या पाकिस्तानवर इसिसच्या रूपातील मोठे संकट येऊ घातले आहे हे निश्चित. दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी अमेरिकेकडून कोट्यवधी डॉलरचा निधी खिशात घालणाऱ्या पाकिस्तानने नेहमीच दुटप्पी भूमिका घेतली आहे.

इसिस आहे तरी काय ?

इस्लामिक स्टेट्स ऑफ इराक ॲन्ड लेव्हंट किंवा इस्लामिक स्टेट्स ऑफ इराक ॲन्ड सीरिया (ISIS,किंवा इसिस) ही एक आंतरराष्ट्रीय अतिरेकी संघटना व स्वयंघोषित खिलाफत आहे. इस्लाम धर्मातील सुन्नी पंथाच्या वहाबी/सलाफी विचारांच्या कट्टर अतिरेक्यांद्वारे चालवली जात असलेली ही संघटना प्रामुख्याने पश्चिम आशियातील इराक व सीरिया ह्या देशांमध्ये कार्यरत आहे.सध्या इराक व सीरिया देशांतील मोठ्या भूभागावर आयसिसचे नियंत्रण आहे. इसिसची स्थापना २००४ साली झाली व तिने अल कायदामध्ये प्रवेश केला. २०१४ साली आयसिस अल कायदामधून वेगळी झाली व अबू बक्र अल-बगदादी ह्या आयसिसच्या म्होरक्याने इस्लामिक खिलाफतीची घोषणा केली व स्वतःला खलिफा जाहीर केले. २०१४ साली आयसिसने इराकच्या वायव्य भागातील मोठा भूभाग काबीज केला व मोसुल हे इराकमधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर ताब्यात घेतले.

आयसिस हा एक अत्यंत हिंसक गट असून सुन्नी वगळता इतर मुस्लिम पंथांच्या लोकांचे शिरकाण, महिलांचे शोषण, अपहरण, बलात्कार, इत्यादी अनेक गुन्हे इसिसद्वारे करण्यात येत आहेत. इसिसचे अतिरेकी जगभर कार्यरत असून भारत, अमेरिका, रशिया, युरोपियन संघ इत्यादी प्रमुख देशांनी इसिसला अतिरेकी संघटना म्हणून घोषित केले आहे. इसिसचे अतिरेकी जगभर कार्यरत असून त्यांच्याद्वारे करण्यात येत असणारे हल्ले हा जगातील देशांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. मध्य पूर्वेसोबतच युरोप व उत्तर आफ्रिकेमध्ये देखील इसिसचे अतिरेकी कार्यरत आहेत. बोको हराम, तालिबान इत्यादी इतर मुस्लिम अतिरेकी संघटनांनी इसिसला पाठिंबा दर्शवला आहे.

इतिहास

अल कायदा इन इराक, द मुजाहुदीन शूरा कौन्सिल आणि द इस्लामिक स्टेट ऑफ इराक आदी अनेक सुन्‍नी संघटनांमधून इसिसचा जन्म झाला. या संघटनेच्या स्थापनेची घोषणा २०१३ सालच्या एप्रिलमध्ये झाली. सध्या जानेवारी २०१६मध्ये उत्तर इराक आणि पूर्व सीरियावर इसिसचे वर्चस्व आहे. २०१३सालच्या फेब्रुवारीपर्यंत अल कायदाचे इसिसशी जवळचे संबंध होते. मात्र इसिस अतिशय कडवी संघटना असल्याने अल कायदाने तिच्याशी संबंध तोडले.कट्टर सुन्‍नी असलेली इसिस ही संघटना शियांच्या निघृण हत्येसाठी ओळखली जाते. सरकारी आणि लष्करी संस्थांवर हल्ले करून या संस्थेच्या सदस्यांनी हजारो नागरिकाचे खून केले आहे्त.

काय आहे इसिसची योजना 

  • सुन्‍नी इस्लामिक राजवटीची स्थापना करणे.
  • सीरियातील सुन्‍नीबहुल भागांवर नियंत्रण मिळवणे.
  • इराकपासून उत्तर आफ्रिकेपर्यंत इस्लामिक राज्याची स्थापना करणे.

इसिसचे बळ

अमेरिकी गुप्तचर संस्था सीआयएच्या दाव्यानुसार इसिसकडे ३०,०००पेक्षा अधिक दहशतवादी सैनिक आहेत. इसिसच्या म्हणण्यानुसार ४०,०००हून अधिक सैन्य. त्यांतील बहुसंख इराक, सीरियातले असून शिवाय फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी, अमेरिका आदी देशांतील दहशतवाद्यांचा समावेशदेखील या दहशतवादी संघटनेत आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या मते जगभरातल्या ८० देशांतील १५,००० दहशतवादी इसिसमध्ये सक्रिय असल्याचे मानले जाते. आधुनिक तंत्रज्ञान व सोशल मीडियाच्या जोरावर इसिसमध्ये सैनिकांची भरती होते.

संस्थापक – अबू बकर अल बगदादी

अबू बकर अल बगदादी ऊर्फ अबू दुआ हा इसिसचा संस्थापक असून, इब्राहिम अवाद इब्राहिम अली अल बादरी किंवा डॉ. इब्राहिम या नावानेही तो ओळखला जातो.बगदादी ही इराकमधील सामरा शहरात १९७१मध्ये जन्मल्याचे सांगितले जाते. अमेरिकेच्या इराकमधील हल्ल्याच्या वेळी तो मौलवी  होता, असे सांगितले जाते.तो बगदाद विद्यापीठाकडून इस्लामी स्टडीजमध्ये पीएच.डी झाला आहे.
अमेरिकेकडून ४ ऑक्टोबर २०११ रोजी बगदादीचा जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समावेश करण्यात आला. अमेरिकेने अबू बकर अल बगदादीच्या शिरावर एक कोटी डॉलरचे बक्षीस ठेवले होते. या बगदादीमुळेच अलकायदाचे सदस्य असलेले अनेक तरुण इसिसकडे वळले. जुलै २०१७ मध्ये इसिसचा म्होरक्या अबू बगदादी मारला गेला

इसिसचे आर्थिक बळ

पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएस‍आयच्या हवाल्यानुसार सुमारे दोन अब्ज डॉलरची संपत्ती असलेली इसिस ही जगातली सर्वात श्रीमंत दहशतवादी संघटना आहे.इसिस ही जिंकलेल्या प्रदेशांतील बँका, तेल आणि नैसर्गिग वायूचे स्रोत, कर, अपहरण, खंडणी, दळणवळणाचे आधुनिक नेटवर्क आदी मार्गांनी निधी जमवते.इराकमधील मोसूल शहरातील मध्यवर्ती बँकेची ४३ कोटी डॉलर्सची लूट करून, शिवाय सराफी दुकानांवरही दरोडे टाकून इसिसने संपत्ती जमवली आहे.सौदी अरेबियासह अन्य आखाती देशांमधून मानवता कार्याच्या सबबीखाली इसिसने निधी गोळा केला आहे.पूर्व सीरियातल्या तेल प्रकल्पांतील तेल विकून निधीची उभारणी करून शिवाय सीरिया सरकारला वीज विकूनही इसिसने पैसा मिळवला आहे

इसिसकडील शस्त्रसाठा

अमेरिकी शस्त्रे हस्तगत करून त्यांचा वापर इसिसकडून करण्यात येत असल्याची माहिती आहे. आर्मी काँबॅट युनिफॉर्म, रात्रीच्या धाडींसाठी ‘एनपीव्हीएस-७’ हा गॉगल.पीएएसजीटी हेल्मेट, एम-१६ रायफली, एमा-४ कार्बाइन्स, एम-२०३ ग्रेनेड लाँचर्स, एम-६०/एम-२४० मशीनगन्स, स्टिंगर क्षेपणास्त्र वगैरे असल्याची माहिती अमेरिकेने केलेल्या काही कारवायांदरम्यान समोर आली आहे.

इसिसच्या कारवायांमुळे झालेला जागतिक परिणाम

एकमेकांचे वैरी असलेली अमेरिका, इराण इसिसच्या विरोधात एकत्र आले आहेत. इराकमध्ये पुन्हा लष्करी कारवाई करण्यास अमेरिका तयार नाही.आतापर्यंतच्या दहशतवादी संघटनांमध्ये इसिस सर्वात कडवी असल्याने तिच्यावर कारवाई करताना अधिक प्राणहानीची शक्यता आहे. इसिसवर कारवाई केल्यास इराक, तुर्कस्तान, सीरिया, लेबनॉन आणि जॉर्डन आदी देशांशी होणार्‍या व्यापारावर वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. काळ्या बाजारात कच्च्या तेलाची स्वस्त विक्री करून इसिसने अर्थव्यवस्थेला दिलेले आव्हान आहे.

इसिसचा भारतावरील परिणाम

इराक अशांत राहिल्यास तेलाचे दर भडकण्याची कायम टांगती तलवार आहे. सध्या इसिसपासून फारसा धोका नसला तरी भारतातील सामाजिक सलोखा, कायदा, सुव्यवस्था अस्थिर करण्याची इसिसची क्षमता आहे कारण कडव्या विचारसरणीच्या भारतातील मुसलमानांमध्ये इसिसबद्दल वाढते आकर्षण असल्याने या दहशतवादी संघटनेला भारतातील काही तरुणांना ताब्यात घेऊन त्यांचे ब्रेन वॉशिंग करण्यात मिळत चाललले यश पाहिले तर हा भविष्यातला धोका कायम राहणार आहे.
त्यामुळे आता तरी तेच दिसतेय की इसिससारख्या संघटनांचे आव्हान जगापुढे खूपच भयानकपणे उभे ठाकले आहे. भारताला याचा फटका बसला असून ३९ जीव हकनाक गमावले गेले आहेत. अशा संघटनांना तितक्याच क्रूरपणे ठेचले गेले पाहिजे नाहीतर जगभरात अनेक निर्दोष नागरिकांना कायम असेच प्राण गमावत राहावे लागेल.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

देवेंद्र फडणवीसच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार – अमित शहा

मुंबई – भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी जनतेशी संवाद साधताना त्यांनी भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावर शिक्कामोर्तब केला. देवेंद्र...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘तुमच्याकडे काही काम नसेल तर मीम्स बनवा’, सोनाक्षीचे ट्रोलर्सना उत्तर

मुंबई – कौन बनेगा करोडपती -11 मध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या रामायण या पौराणिक कथेतील प्रश्‍नावरील उत्तराने सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल व्हावे लागत आहे. सोनाक्षी...
Read More
post-image
लेख

व्हिएतनाम युद्धाविरोधात उभी राहिलेली अमेरिकेची आघाडीची अभिनेत्री जेन फोंडा

साठ-सत्तरच्या दशकातील अमेरिकेची आघाडीची, सुप्रसिद्ध, नामवंत अभिनेत्री जेन फोंडा एका वेगळ्याच कारणासाठी सगळ्या जगभर ओळखली जाते आणि अमेरिकेतील लाखो लोकांकडून तिच्यावर आजही प्रखर टीका...
Read More
post-image
देश

एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिलेला गुगलची मानवंदना

नवी दिल्ली – जगप्रसिद्ध गिर्यारोहक आणि माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला जुन्को ताबेई यांचा आज 80 वा स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने गुगलने खास डूडल...
Read More