इतिहास व्यापणारा ‘महात्मा’ – eNavakal
आघाडीच्या बातम्या संपादकीय

इतिहास व्यापणारा ‘महात्मा’

कोणतेही सत्य संकल्पाच्या सिध्दतेवरच टिकून राहू शकते. मग तो वकिली व्यवसाय का असेना, त्या व्यवसायात तर अनेक वेळेला धडधडीतपणे खोटे बोलावे लागते. म्हणून वकिलीचा धंदा करता येणे फार कठीण होते, पण ज्याला केवळ सत्याची बाजू लढवायची आहे, तो आपल्या संकल्पाला सिध्द करू शकतो. हे प्रत्यक्ष अनुभवाचे बोल महात्मा गांधींनी स्वत: सांगितलेले आहे. आज त्यांच्या दीडशेव्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात होत आहे. जगाच्या इतिहासामध्ये याच सत्यसंकल्पाच्या सिध्दतेवर अहिंसेचे तत्त्वज्ञान मांडून जगाला नव्या सौजन्यशीलतेचा परिचय करून देण्याचे महान कार्य महात्मा गांधींनी केले. एखादी व्यक्ती एखाद्या देशाच्या इतिहासाचा जेव्हा अनिवार्य भाग ठरते, तेव्हा त्या व्यक्तीचे कर्तृत्व हेच एक तत्त्वज्ञानाच्या रूपात साकार होत जाते. भारताच्या स्वातंत्र्यतलढ्याचा इतिहास हा असाच महात्माजींच्या कर्तृत्वाने पानोपानी व्यापलेला दिसून येतो. प्रत्यक्ष स्वातंत्र्य लढ्यातले त्यांचे योगदान हे एखाद्या केंद्रबिंदूप्रमाणे होते. महात्माजींशिवाय कोणतेही आंदोलन, कोणतीही चळवळ जवळपास विचारातच घेतली जात नव्हती. किंबहुना स्वातंत्र्यलढ्यासंबंधी कोणताही निर्णय घेताना, कोणतीही चर्चा करताना किंवा धोरणे आखताना गांधीजींचा केवळ सल्ला नव्हे, तर सहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरत असे. ब्रिटिशांना प्रत्यक्ष आंदोलनाच्या स्वरूपापेक्षाही गांधींचा त्यात सहभाग आहे की नाही, ही गोष्ट अधिक महत्त्वाची वाटत असे. अशा प्रकारचा प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून निर्माण झाला होता. जगाच्या इतिहासामध्ये जी काही बोटावर मोजण्याइतकी उदाहरणे आहेत, त्यात महात्मा गांधींचा क्रमांक वरचा लागतो. कारण त्यांनी आपल्या जीवन व्यवहारातून हे सिध्द केले होते की, सत्याचा आग्रह धरत असताना त्यागाच्या अग्निपरीक्षेची तयारी ठेवावी लागते. आणि म्हणूनच त्यांनी अनेक गोष्टींबाबत वैराग्याचा मार्ग स्वीकारून आपल्या काही विचारांना एकाअर्थी सिध्दांतरूपात परावर्तित केले. दक्षिण आफ्रिकेत असताना जगातील अनेक साहित्यिकांची, तत्त्ववेत्यांची पुस्तके त्यांच्या वाचनात आली आणि नंतरच्या काळात गोपाळकृष्ण गोखलेंबरोबर आलेला त्यांचा संबंध त्यांच्या विचार आणि दृष्टिकोनामध्येही परिणाम करणारा ठरला.

सत्य, अहिंसेचे वास्तविक अर्थ

भारताचे पारतंत्र्य हा विषय त्यांच्यासाठी सातत्याने अस्वस्थतेचे कारण ठरत होता. देशासाठी काम करण्यापूर्वी म्हणजेच पर्यायाने लोकांना काही करायला सांगण्यापूर्वी स्वत:चे विचार स्पष्ट असले पाहिजेत. आपले विचार लोकांनी कृतीत उतरवावे असे वाटत असेल तर स्वत:चे आचार तितकेच स्पष्ट असले पाहिजेत. असा एक स्वत:चा दृष्टिकोन त्यांनी तयार केला आणि मगच त्यांनी प्रत्यक्ष चळवळीला सुरुवात केली. म्हणून महात्मा गांधी हे व्यक्तिमत्त्व समजून घ्यायचे असेल तर त्यांनी देशासाठी समर्पित केलेले स्वामित्व आणि अंगीकारलेले तत्त्व हेदेखील लक्षात घ्यावे लागेल. गांधीजींविषयी अनेक पुस्तके, ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. जगभरातून त्याचा अभ्यास होत आहे. त्यांनी अंगीकारलेल्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाचा विश्वशांतीसाठी उपयोग कसा होऊ शकेल, त्याचेदेखील अनुकरण केले जात आहे. परंतु वैशिष्ट्य असे आहे की या सगळ्या संकल्पांचा आग्रह धरत असताना त्याचे कर्तेपणसुध्दा त्यांनी आपल्याकडे घ्यायला नकार दिला होता. म्हणूनच एका ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे म्हटले होते की, ‘आय हॅव नथिंग न्यू टू टीच द वल्ड ट्रूथ अँड नॉन व्हायलन्स आर अँज ओल्ड अँज द हिल्स.’ याचा अर्थ स्पष्ट आहे, परंतु ही तत्वे जर निसर्गातल्या पर्वतांइतकीच प्राचीन असतील, तर ती चढून जाणे हेदेखील तितकेच कष्टसाध्य काम ठरते. महात्मा गांधींनी या जुन्याच तत्त्वांच्या अनुकरणाचा प्रवास किती कष्टसाध्य आहे हे आपल्या संकल्पांमधून दाखवून दिले. स्वाभाविकपणे यासाठी लागणारी जिद्द आणि जोखीमही त्यांनी पत्करली. त्यांनी केलेले सत्याचे प्रयोग लोकांच्या गळी उतरवणे वाटते तितके सोपे नव्हते. म्हणूनच त्यांच्या या प्रतिपादनाला तत्त्वज्ञानाचा आयाम प्राप्त होणे अपरिहार्यच म्हणावे लागते. नोंद घेण्यासारखा भाग असा आहे की, स्वत:च्या जीवनातून काही मूल्ये सांगू इच्छिणार्‍या या महात्म्याला सामान्य माणसांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. लाखो लोक त्यांचे अनुयायी झाले, परंतु कृतीपेक्षा केवळ विचारांचाच आधार घेणारे विरोधकही निर्माण झाले.

कमी कालावधीचा प्रदीर्घ ठसा

महात्मा गांधींनी केलेल्या आंदोलनांची बरीच मोठी यादी होऊ शकेल, परंतु पूर्ण स्वातंत्र्य, छोडो भारत, मिठाचा सत्याग्रह आणि स्वत:च्या निर्लेप निर्मळ जीवनाइतकाच स्वच्छतेचा त्यांनी धरलेला आग्रह अशा काही ठळक टप्प्यांचा त्यांच्या एकूणच जीवनावर प्रभाव दिसून येतो. मुस्लिमांना आपल्या बाजूने वळवण्याकरिता त्यांनी केलेले प्रयत्न, त्यात त्यांना आलेले काहीसे अपयश या सर्व गोष्टी जरी गृहित धरल्या, तरीसुध्दा भारतीय स्वातंत्र्याच्या दीर्घ लढ्यामध्ये छोटासाच काळ व्यापणारे परंतु सर्वांत मोठा ठसा उमटवणारे नेते म्हणून महात्माजींचाच उल्लेख करावा लागतो. 1920 नंतर खर्‍या अर्थाने सुरू झालेले गांधी युग आणि 1948 साली झालेली त्यांची हत्या असा हा केवळ 28 वर्षांचा कालावधी आज दीडशे वर्षांनंतरही अनेक विचारांना प्रेरणा देणारा ठरते आहे. त्यांनी अंगीकारलेल्या स्वच्छतेचा संस्कार हा स्वतंत्र भारतात इतक्या उशिरा लक्षात यावा, ही खेदाची गोष्ट ठरते. आजपासून देशभरात सुरू होत असलेली स्वच्छता मोहीम ही त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आहे, असा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे, परंतु महात्मा गांधींच्या इतर गुणांचा समुच्चय करून त्यांना आदरांजली वाहायची असेल तर राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये प्रचंड प्रमाणात पसरलेली भ्रष्टाचाराची दुर्गंधीदेखील नाहिशी करावी लागेल. अस्पृश्यतेविरुध्द त्यांनी सुरू केलेली मोहीम ही प्रत्येकाच्या मनाला निर्मळ बनवणारी ठरली. त्याचप्रमाणे आता सार्वजनिक जीवनामध्ये अडथळे बनून राहिलेल्या भ्रष्टाचारासारख्या आणि आर्थिक विषमतेच्या समस्याही दूर करण्याचा संकल्प यानिमित्ताने करण्याची गरज आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र वाहतूक

कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई – कोचिवली एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. गोव्याहून मुंबईला जाणारी ही एक्प्रेस इंजिन बिघाडामुळे रत्नागिरीजवळ पाऊण तास करबुडे बोगद्यामध्ये अडकली....
Read More
post-image
आरोग्य देश

बिहारमध्ये मेंदूज्वरामुळे १३२ जणांचा बळी

पाटणा – बिहारमध्ये मेंदूज्वर तापाचा कहर अद्यापही सुरुच असून यामुळे मृतांची संख्या १३२ वर पोहोचली आहे. तसेच इतर रुग्णालयांमध्ये उपचारांविना मृत्यू झालेल्या मुलांची आकडेवारीही अद्याप...
Read More
post-image
महाराष्ट्र

पाणीप्रश्नावरून विधानसभेत गदारोळ! १५ मिनिटे तहकूब

मुंबई – अधिवेशनाचा चौथ्या दिवशी आज विधानसभेत पाणीप्रश्नावरून प्रचंड गदारोळ झाला असून विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे विधानसभेचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई हवामान

दक्षिण कोकणात मान्सूनचे आगमन

मुंबई – राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी जनता मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होती. त्यामुळे जनतेला आता दिलासा मिळाला आहे. कारण मान्सून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : शिव VS पराग आणि नेहा

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरात सुरू असलेल्या एक डाव धोबीपछाड या साप्ताहिक कार्यात बरीच भांडणंं, वाद विवाद, आरोप–प्रत्यारोप सुरू आहेत. या टास्कमध्ये जिंकण्यासाठी बिग बॉस...
Read More