इतका देशद्रोह करणारं, इतकं घाणेरडं सरकार बघितलं नाही-राज ठाकरे भडकले – eNavakal
News निवडणूक मुंबई

इतका देशद्रोह करणारं, इतकं घाणेरडं सरकार बघितलं नाही-राज ठाकरे भडकले

मुंबई – आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तुडूंब भरलेल्या शिवतीर्थावर भाषण करताना अत्यंत भडकून आवाहन केले की, मोदी आणि शहा ही जोडी देशासाठी अत्यंत घातक आहेत. त्यांना या देशातून हाकलून द्या. या दोन व्यक्ती या देशात दिसता कामा नयेत. इतकं देशद्रोह करणारं, इतकं घाणेरडं सरकार मी आयुष्यात बघितलं नाही. या सरकारला खाली खेचा.

राज ठाकरे म्हणाले की, हे नवीन वर्ष तुम्हाला सत्तेचे आणि मोदीमुक्त भारताचे जावो. माझ्या राज्यात आठ ते दहा सभा आहेत. 11 एप्रिलला मी दौर्‍यावर निघणार आहे.
राष्ट्रवादीला साथ देण्याबाबत ताशेरे ओढताना ते म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मला वापरून घेतील असे म्हणतात, पण मी काही इतका वेडा नाही. आम्ही कोणत्याही पक्षाला विचारलेले नाही. ही निवडणूक न लढवता या देशावर मोदी आणि अमित शहांचे जे संकट आले आहे ते दूर करण्यासाठी मी प्रचार करणार आहे. त्याचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला व्हायचा तर होईल. देश संकटात येतो तेव्हा वेगळा विचार करावा लागतो. हे संकट दूर करण्यासाठी दुसरीकडे मनात नसताना मतदान करावे लागले तर काही जात नाही. आता जी परिस्थिती आहे त्यात हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय विधानसभा निवडणुकीसाठी नाही.
मोदी आणि शहा गेली 5 वर्षे जसे वागले आहेत त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. भारताच्या पंतप्रधानांची जगात ओळख ‘फेकू’ अशी आहे. अमेरिकेने सांगितले की, पाकिस्तानला आम्ही जितकी विमाने दिली ती सर्व तशीच आहेत. एकही नष्ट झालेले नाही. मोदींनी यावर उत्तर दिले पाहिजे. मोदींना प्रचंड बहुमत मिळाले, पण त्यानंतर हा माणूस फक्त खोटे बोलत राहिला. गेल्या पाच वर्षांत त्यांनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. कारण प्रश्नांना उत्तर द्यायला घाबरतात.
पंतप्रधान मोेदी दुसर्‍यांच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलतात म्हणून बोलतो आहे. ते दरवर्षी आईला भेटायला जातात तेव्हा कॅमेरा घेऊन जातात. नोटबंदी आणली तेव्हा आपल्या आईला रांगेत उभे केले. हे असले भावनिक खेळ खेळतात. त्यांनी सत्तेवर आल्यानंतर जे निर्णय घेतले त्या निर्णयांना त्यांनी आधी विरोध केला होता. ज्या योजना त्यांनी आणल्या त्या आधी काँग्रेसच्या होत्या. त्यांनी केवळ योजनांची नावे बदलली. पंतप्रधानांनी सत्तेवर येण्याच्या आधी आधार कार्डला विरोध करताना म्हटले होते की, आधार कार्ड दिली तर देशाबाहेरचे आतंकवादी त्याचा फायदा घेऊन आत घुसतील. मग सत्तेवर आल्यावर त्यांनी आधार का आणले? गंगा साफ करायला नमामी गंगे योजना आणली.
गंगा साफ करण्यासाठी 108 दिवस वाराणसीत उपोषण करणारे अग्रवाल यांचे निधन झाले तेव्हा पंतप्रधानांनी श्रद्धांजली ट्विटरवर वाहिली. एकही दिवस त्यांना भेटले नाहीत. गंगा स्वच्छतेसाठी जी समिती नेमली त्याची एकही बैठक घेतली नाही, नोंटबंदीने 4 कोटी लोकांची नोकरी गेली पण हे तुमच्यापर्यंत पोहचू देत नाहीत. पत्रकार, चॅनल्सवाद्यांना धमक्या देतात, हे कसले सरकार आहे.
पुलवामाचा हल्ला झाला त्यात आरडीएक्स आले कुठून? नरेंद्र मोदी हा प्रश्न मनमोहन सिंगना विचारायचे तोच प्रश्न मी मोदींना विचारतोय. आपले जवान कष्टात देशाचे संरक्षण करतात त्याचे आपण राजकारण करतो? या सरकारने काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्तीशी युती केली. मोदी नवाझ शरीफांच्या वाढदिवसाला गेले आणि मग पठाणकोट झाले, उरी झाले, पुलवामा झाले. एअर स्ट्राईक झाल्यावर भाजपावाले आकडे सांगू लागले. तिथे दहा मारले असते तर अभिनंदन परत आला नसता. आम्ही याबाबत विचारले तर आम्ही देशद्रोही ठरवतात. आता मोदी सगळीकडे भाषणे करताहेत, पण नोटबंदीबद्दल बोलत नाहीत, इतके बेरोजगार झाले त्याबद्दल बोलत नाहीत, आता हिंदुकार्ड बद्दल बोलतात. विदर्भातील हरसाल गांव डिजिटल झाले म्हणतात तिथे संगणक नाही, वायफायला रेंज नाही. एटीएम कार्ड नाही, कार्ड स्वाईप करायची मशीन नाही, अशी स्थिती आहे. हरसाल गांव डिजिटल झाल्याची जी जाहिरात भाजपाने दाखवली त्यात जो गावातला तरुण होता त्याच्याकडे पेटीएम नाही, स्पाईप मशीन नाही, काहीच नाही. लोकांना किती फसवायचे याला मर्यादा आहे की नाही?
भाजपाने काही केले नसले तरी दुसरा पर्याय नाही, असे भाजपावाले म्हणतात. पण पंडित नेहरू लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, राजीव गांधी, चंद्रशेखर, नरसिंहराव हे कुणीच आधी ‘पंतप्रधान उमेदवार’ म्हणून ठरलेले नव्हते. आडवाणींऐवजी ऐनवेळी वाजपेयी झाले तेव्हाही आधी ठरले नव्हते. मोदींनी जे खड्ड्यात घातले आहे त्यापेक्षा कुणीही आणखी खड्ड्यात घालू शकणार नाही. राहुल गांधी आले तर येऊन प्रयोग करायला हरकत नाही. पण ही जोडगोळी सत्तेवर आली तर घातक आहे. ते निवडणुकही बंद करतील.

मुद्रा योजनेत मोदींच्या कंपनीने 1800 कोटी खाल्ले

मुद्रा योजनेत 1 कोटीचे कर्ज मिळते असे जाहीर केल्यावर ते कर्ज मंजूर करायला 1800 रुपये फी म्हणून अहमदाबादमधील कॅपिटल वर्ल्ड नावाच्या खाजगी कंपनीला भरायचे होते. त्या कंपनीचे संचालक जिनाद विकास शहा, विकास मणिलाल शहा आणि अखिल हंडा हे आहेत. त्या कंपनीचे संचालक अखिल हंडा हा मोदींच्या 2014 च्या प्रचारात प्रशांत किशोरबरोबर होता. त्यांना 2018 साली संचालक केले. म्हणजे सरकारी योजनेत कर्जसाठी अर्ज केला तर त्याची फी या खाजगी कंपनीच्या खात्यात भरायची. या कंपनीने 1 कोटी बेकार तरुणांकडून किमान 1800 कोटी रुपये कमविले.

काँग्रेसच्या विरोधातही
राज ठाकरे बोलले
राज ठाकरे यांनी भाजपाच्या मोदी सरकारने काँग्रेसच्या योजनांना आपली नावे दिली, हे सांगताना राज ठाकरे यांनी मोदींवर टीका करताना काँग्रेसवरही टीका केली. ते म्हणाले, काँग्रेसवाल्यांना नेहरू व गांधी घराण्याशिवाय इतर कर्तृत्ववान माणसे दिसली नाहीत. याच सर्व योजना मोदींनी चोरल्या. बरे काँग्रेसला तरी चांगली माणसे सापडू नये? 1947 साली गांधी म्हणाले म्हणून नेहरू पंतप्रधान झाले. हा काय लोकांचा पर्याय होता का? हा काय देशाचा निर्णय होता का? नेहरूंनंतर लालबहादूूर शास्त्री पंतप्रधान झाले. हा काय देशाचा निर्णय होता का? लोकांची निवड होती काय? लालबहादूर शास्त्री नंतर इंदिरा गांधी व त्यांच्या हत्येनंतर राजीव गाधी हे काय देशाचे निर्णय होते काय? हा काय पर्याय होता का? आतापर्यंत झालेले पंतप्रधान हा देशाचा निर्णय नव्हता का? तुमचा पर्याय होता का? नाहीतर प्रयोगच आहे ना? मग राहुल गांधींना पंतप्रधान होऊ दे, झाले तर झाले चांगले काम.

 

ठळक वैशिष्ट्ये
*  राहुल गांधी पंतप्रधान होणार असतील तर होऊदे, पण ही खतरनाक जोडगोळी पन्हा नको
*  अमेरिका म्हणते पाकिस्तानला दिलेली सर्व एफ -16 विमाने व्यवस्थित आहेत. मग पाकिस्तानची कोणती विमाने पाडली त्याचे उत्त द्या.
*  नोटबंदीनंतर एक महिन्यात शेखर रेड्डी नावाच्या गृहस्थाच्या घरी 33 कोटी रुपयांच्या नव्या नोटा सापडल्या कशा?
*  आधार कार्डमुळे दहशतवादी देशातील घुसतील म्हणणार्‍या मोदींनी सत्तेवर येताच आधार कार्ड का आणले?

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

येडीयुरप्पा अडचणीत! मंत्री, आमदार नाराज

बंगळुरू – काँग्रेस, जनता दल (सेक्युलर) व अपक्ष आमदारांना फोडून, कुमारस्वामी सरकार पाडून कर्नाटकात सत्तेवर आलेल्या भाजपाच्या येडीयुरप्पा सरकारलाच आता आमदारांच्या बंडखोरीचा सामना करावा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र वाहतूक

मंगला एक्स्प्रेसचं इंजिन बिघडलं! मध्य रेल्वेचा आजही खोळंबा

ठाणे – सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वे खोळंबली असून प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. टिटवाळा येथे मंगला एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने कसाऱ्याच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

…तर पुन्हा विमा कंपन्यांविरोधात आंदोलन! उद्धव ठाकरेंचा दोन्ही सरकारना इशारा

मुंबई – महाराष्ट्रातील पूरसमस्या ओसरल्यावर शिवसेनेने महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या पीक विमा प्रश्‍नावर पुन्हा लक्ष केंद्रीत केले आहे. शिवसेनेने जून महिन्यात शेतकर्‍यांच्या पीक विम्याचे पैसे न...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

संभाजी ब्रिगेडकडून विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

औरंगाबाद – राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. यंदा संभाजी ब्रिगेड संघटनाही स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी,...
Read More
post-image
देश

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या घरावर, कार्यालयांवर ईडीचे छापे

नवी दिल्ली – दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात असलेल्या जेट एअरवेजच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने छापेमारी केली आहे. तसेच जेट एअरवेजचे संस्थापक नरेश...
Read More