आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे सुरूच – eNavakal
संपादकीय

आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे सुरूच

सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या भारताची आरोग्यव्यवस्था सुदृढ स्वरूपाची नाही, हे अनेक उदाहरणांवरून दिसून येते. मग ती सरकारी आरोग्यव्यवस्था असेल किंवा खाजगी पंचतारांकित मोठी रुग्णालये असतील सगळ्या ठिकाणी उपचार घेण्यासाठी गेलेल्या रुग्णाला मोठी जोखीमच पत्करावी लागत असते. त्यातही मोठ्या आजारांवर उपचार करण्यासाठी मोठी किंवा त्या रोगाशी संबंधित रुग्णालयांमध्ये गेल्यावर त्या रुग्णाला खात्री वाटत नसते. थोडक्यात सांगायचे तर एकूण आरोग्यव्यवस्थेविषयी जो विश्वास जनमानसामध्ये असायला हवा तो आजतरी दिसत नाही. याची अगदी अलीकडची काही उदाहरणे पाहिली तरी या आरोग्यव्यवस्थेचे किती तीनतेरा वाजलेले आहेत हे लक्षात येते.

अगदी काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयांमध्ये असलेल्या औषधांच्या तुटवड्याविषयी याच स्तंभातून लिहिले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील औषध खरेदी आणि पुरवठा याचा आढावा घेऊन एक लाख रुपयांपर्यंतची औषधे खरेदी करण्याचे अधिकार रुग्णालय अधीक्षकांना देण्याचा निर्णय घेतला. आरोग्यमंत्री जळगाव महापालिका निवडणुकीत दंग असल्याने त्यांचे या औषध खरेदीकडे दुर्लक्ष झाले होते. शेवटी मुख्यमंत्र्यांना त्यात लक्ष घालावे लागले. एकीकडे हा औषध तुटवडा जाणवत असताना राज्यात रक्ताचाही तुटवडा असल्याचे समोर आले आहे. अनेक रुग्णालयांमध्ये रक्तसंकलनाची अद्ययावत व्यवस्था नाही. खासगी रक्तपेढ्यांमध्ये शास्रशुध्द पध्दतीने रक्त संकलन होत नसल्याच्या तक्रारी आहेत. शिवाय रक्ताचे दरही स्पष्ट केले जात नाहीत. रुग्णांची निकड कशी आहे त्याप्रमाणे ऐनवेळी रक्ताचे ज्यादा दर लावले जातात. रक्ताच्या गुणवत्तेबाबत पुरेशी काळजी घेतली जात नाही असे सरकारच्याही लक्षात आलेले आहे. म्हणूनच आता रक्तसंकलन आणि त्याचे दर शिवाय त्याची योग्य ती साठवण याकरिता सरकारने काही नवे नियम केले आहेत. त्याचा अर्थ रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित रक्तासारखा घटकही किती निष्काळजीपणे हाताळला जातो, हे सहजपणे लक्षात येते. सरकारी रुग्णालयांमधील दूरवस्था आणि मोठ्या रुग्णालयातील मोठी शुल्क आकारणी या दोन्ही ठिकाणी रुग्णांची एकाअर्थी कसोटीच पाहिली जाते.

डॉक्टरांची संख्याच माहीत नाही
राज्यपातळीवर हा सावळा गोंधळ असताना देशपातळीवरही आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले आहेत. आता अलीकडे संसदेमध्ये समोर आलेली माहिती तर आणखीनच धक्कादायक आहे. संपूर्ण देशामध्ये आजच्या घडीला एकूण किती डॉक्टर्स आहेत याची आकडेवारी सरकारकडे नाही. मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडे दहा लाख 8 हजार डॉक्टरांची नोंद आहे. परंतु या नोंदणीतील डॉक्टर्स आज हयात आहेत याचा अधिकृत आकडा मेडिकल कौन्सिलही देऊ शकत नाही. कारण गेल्या पन्नास वर्षांपासूनची ही नोंद असल्याने त्यातील जवळपास 75 हजार डॉक्टर्स 1950 ते 55 सुमारास नोंदले गेले आहेत. आजही दिल्लीमध्ये तिथल्या राज्यकर्त्याने दिलेल्या माहितीप्रमाणे 16833 डॉक्टर्स असल्याचे सांगितले गेले तर दिल्ली मेडिकल कौन्सिलने राज्यात 64 हजार डॉक्टर्स असल्याचे म्हटले आहे. हीच परिस्थिती अन्य राज्यांबाबतही पाहायला मिळते. दरवर्षी किमान एक लाख डॉक्टर्स तयार होत असतात. आपले वैद्यकीय शिक्षण संपवून ते व्यवसाय करतात हा आकडा गृहित धरला तर डॉक्टारांची संख्या बरीच मोठी होऊ शकते. देशातील आरोग्य व्यवस्थेचा आधार असलेल्या डॉक्टरांची संख्या सरकारला माहीत नसेल किंवा त्याची अधिकृत आकडेवारी सरकारकडे नसावी यावरून आरोग्य व्यवस्थेच्या अंदाधुंदीपणाचीही सहज कल्पना येते. डॉक्टरांची संख्या लोकसंख्येच्या तुलनेत कमी आहे. ग्रामीण भागात तज्ज्ञ डॉक्टर्स उपलब्ध होत नाहीत. आदिवासी भागात तर कोणतेच डॉक्टर जायला तयार नसतात. आज देशातील सत्तर टक्के प्राथमिक आरोग्य केंद्रे अशी आहेत की त्याच्याकडे स्वत: ची रुग्णवाहिका नाही. एखाद्या रुग्णाला मोठ्या रुग्णालयात घेऊन जाण्याकरिता ही सोय असणे अत्यंत आवश्यक असते. या पध्दतीने गैरसोयींचा पाढा कितीतरी मोठा होऊ शकतो.

अनावश्यक वेदनाशामक औषधे
अगदी गेल्याच आठवड्यात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका उपसमितीने आपला अहवाल सादर करून देशभरात साडेतीनशे वेदनाशामक औषधांवर बंदी घालण्याची शिफारस केली. या औषधांचा अनेक वर्षे देशात बाजार चालू आहे. पण ती औषधे थांबवावीत याची त्याबद्दल सरकारला अजिबात जाग नव्हती. याचा अर्थ या अनावश्यक वेदनाशामक औषधांनी कितीतरी रुग्णांच्या जीवाशी खेळ केला असू शकतो. ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर भारतात आरोग्य व्यवस्थेचा कशा पध्दतीने खेळ होत असतो, हे लक्षात येते. हे प्रकार थांबवण्याकरिता सरकारने काटेकोरपणे कोणतीही यंत्रणा निर्माण केलेली नाही. स्वाभाविकपणे या गोष्टीमुळे रुग्णांना कोणकोणत्या प्रकारची जोखीम पत्करावी लागते. हे स्पष्ट होते. अलीकडच्या काळात तर मोठमोठ्या रुग्णालयांमध्येसुध्दा उपचार करताना प्रचंड निष्काळजीपणा दाखवल्याने डॉक्टरांवर हल्ले होण्याचे प्रकार घडतात परंतु अशा प्रकारची अनावश्यक किंवा प्रकृतीला योग्य न ठरणारी औषधे वापरली जाणार असतील तर त्याचे परिणाम अशाच प्रकारे दिसू शकतात. म्हणूनच भारतातील आरोग्य व्यवस्थेकडे अतिशय गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे. उत्तम दर्जाच्या वैद्यकीय शिक्षणापासून ते तितक्याच चांगल्या रुग्णालयांपर्यंत आणि गुणवत्ता असलेल्या औषधांपर्यंत ही व्यवस्था सुधारावी लागणार आहे. या सरकारी हलगर्जीप्रमाणेच वैद्यकीय आणि आरोग्यसेवेचे व्यापारीकरण झालेले दिसून येते. अलीकडे तर अवयवदानाच्या निमित्ताने अवयवांच्या विक्रीचा धोकादायक प्रकार समोर येत आहे. किडन्या विक्रीचे रॅकेट, गर्भलिंग चिकित्सेसारखा घातक प्रकार एवढेच नव्हे तर नवजात शिशूंची पळवापळवी-असे गैरकारभार करणार्‍यांची मजल गेली आहे. प्रचंड लोकसंख्या आणि तुटपुंजी आरोग्य व्यवस्था यामुळेच गैरकारभारांना मोकाट वातावरण मिळते, हे लक्षात घेतले पाहिजे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

#MeToo भूषण कुमारांविरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार दाखल

मुंबई – ‘मीटू’ मोहिमेअंतर्गत देशात अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची नावे समोर आली. यात टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांचाही समावेश आहे. त्यांच्याविरोधात आता मुंबईच्या ओशिवारा पोलीस...
Read More
post-image
महाराष्ट्र

मीरारोड येथे ३ सफाई कामगारांचा गुदमरून मृत्यू

मीरारोड – मीरा-भाईंदर महापालिकेच्या मलनि:सारण व शुद्धीकरण केंद्रातील सेप्टिक टँकची सफाई करत असताना मीरारोड येथील तीन मजुरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली. मुजफ्फर मोहलिक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जेट एअरवेज बचावाची आशा, मात्र एतिहादच्या कठोर अटी

मुंबई – आर्थिक अडचणींमुळे डबघाईला येऊन बंद पडण्याच्या वाटेवर असलेल्या जेट एअरवेजला एतिहाद एअरलाईनच्या नव्या प्रस्तावामुळे जिवंत राहण्याची आशा निर्माण झाली आहे. एतिहाद एअरलाईन ही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय

राज्यात डान्सबार पुन्हा सुरू होणार

मुंबई – राज्यभरात डान्सबार पुन्हा सुरू करावे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने साडेपाच तास डान्सबार सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. तसेच डान्सबारमध्ये...
Read More
post-image
गुन्हे देश

नवापूरच्या अल्पवयीन मुलीवर गुजरातमध्ये अत्याचार

नंदुरबार – नवापूर येथील अल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या तीन आरोपींवर नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित...
Read More