नवी दिल्ली – यंदा यूएईमध्ये होणाऱ्या बहुप्रतीक्षित आयपीएलला नवा प्रायोजक मिळाला असून ‘ड्रीम ११’ आता आयपीएलची मुख्य प्रायोजक कंपनी असणार आहे. त्यासाठी ‘ड्रीम ११’ पाच वर्ष २२२ कोटी रुपये मोजणार असल्याचे आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी सांगितले. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल यूएईमध्ये खेळली जाणार आहे.
मुख्य प्रायोजकाच्या शर्यतीत अनअॅकॅडमी, टाटा आणि बायजूस हेदेखील होते. अनअॅकॅडमीने २१० कोटी, टाटाने १८० कोटी आणि बायजूसने १२५ कोटींची बोली लावली. जूनमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर देशात चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याबाबत जोरदार चर्चा सुरु झाल्या. त्यानंतरही आयपीएलने प्रायोजक म्हणून विवोला कायम ठेवल्याने सर्व स्तरातून निषेध केला जात होता. अखेर आयपीएलकडून विवोचे प्रायोजकत्व काढण्यात आले. विवोने २०१८ मध्ये २१९९ कोटींसह 5 वर्षांसाठी करार केला होता. हा करार २०२२ मध्ये संपुष्टात येणार होता.