मुंबई – विक्री होत नसल्याने गेल्या 4 वर्षांपासून एकाच जागी उभ्या असलेल्या आयएनएस विराट या विमानवाहू नौकेचा लिलाव पुन्हा रखडला आहे. या लिलावासाठी संरक्षण मंत्रालयाला अपेक्षित असलेली किंमत मिळत नसल्याने ही विक्री रखडली आहे. संरक्षण मंत्रालयाने नेमलेल्या समितीला विराटची किंमत 750 कोटी रुपये अपेक्षित होती. मात्र अनेक कंपन्यांनी ही किंमत 350 कोटी रुपयांपर्यंतच निश्चित केली आहे. त्यामुळे या विक्रीला मोकळी वाट मिळालेली नाही.
विराटला भंगारात काढण्याचे प्रयत्न गेल्या 4 वर्षांपासून सुरू आहेत. मात्र संरक्षण मंत्रालयात अपेक्षित प्रतिसाद मिळाले नाही. त्यामुळे विराटने जवळपास 3 फ्रिगेटस इतकी जागा व्यापली आहे. त्यामुळे नौदलाकडून विराट चा विक्री व्यवहार तातडीने पूर्ण व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. चार वर्षांपूर्वी नौदलातून निवृत्त झाल्यानंतर कुलाबा येथे विराट नौका उभी आहे. महाराष्ट्र आणि आंध्रसरकारने ही नौका खेरदी करून तिचे संग्रहात रुपांतर करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र काही तांत्रिक मुद्दे उपस्थित करत नौकेची पत सांभाळली जाणार नाही अशी शंका व्यक्त करत खरेदी विक्री व्यवहार नौदलाने थांबवला होता.
दरम्यान, विराटची विक्री थांबल्याने तिच्या देखभालीचा खर्च सध्या मोठा होत आहे. त्यामुळे ही नौका त्या जागेवरून हलवण्यासाठी नौदलाच्या पश्चिम कमांडकडून हालचाली सुरू आहेत. त्याचा भाग म्हणून पुन्हा विराटच्या विक्रीसाठी संरक्षण खात्याने लिलाव सुरू केला आहे. मात्र अपेक्षित किंमत मिळत नसल्याने ही विक्री पुन्हा रखडली आहे. मागच्या महिन्यात ऑनलाईन लिलाव प्रक्रिया काढण्यात आली. त्यात नौकेची तोडणी करताना त्यातील किमान 10 टक्के लोखंड भारतीय लोह उत्पादन क्षेत्रात विक्री करण्याची अट घालण्यात आली. त्यानुसार सहा कंपन्यांनी रस दाखवला होता. मात्र अपेक्षित किंमत कोणीच देत नसल्याने ही विक्री रखडली आहे.
