आज नारायण राणेंचा अस्त! (संपादकीय – जयश्री खाडिलकर-पांडे) – eNavakal
संपादकीय

आज नारायण राणेंचा अस्त! (संपादकीय – जयश्री खाडिलकर-पांडे)

राणेंना साईड पोस्टींगच मिळणार मग आता कुणाच्या काचा फोडणार ?

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात ‘अधीर’ नेते नारायण राणे हे भाजपातर्फे राज्यसभेचा फॉर्म भरून राज्यसभेचे भाजपाचे खासदार होणार आहेत. महाराष्ट्राचे राजकारण सोडून दिल्लीला जाण्याची इच्छा नव्हती ना? असे एका पत्रकाराने विचारले तेव्हा राणे भडकून म्हणाले की, मी दिल्लीला चाललो आहे, पाकिस्तानला नाही. पण राणेंनी दिल्लीला जाणे म्हणजे पाकिस्तानलाच जाण्यासारखे आहे. महाराष्ट्रात ज्या नेत्याला संयम जमला नाही, तो दिल्लीत तग धरूच शकत नाही. संसदेत सहा अधिवेशनात त्यांना एकदा बोलण्याची परवानगी मिळाली तरी खूप झाले अशी परिस्थिती असते. या परिस्थितीशी आता अत्यंत नाइलाजाने राणेंना जुळवून घ्यावे लागणार आहे. त्यामुळे उद्याचा दिवस हा राणेंचा राजकारणातील अस्ताचा दिवस आहे. अधीरपणाचा शेवट स्वेच्छानिवृत्ती स्वीकारण्यात झाला आहे.

भाजपाचे जवळजवळ सर्व नेते आपल्यालाच सर्व काही समजते, अशा भावनेत अडकले आहेत. त्यांच्यात एकही विद्यार्थी नाही. सर्वच्या सर्व अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले शिक्षक आहेत. भाजपाच्या कोणत्याही नेत्याकडे गेलात तर तो प्रवचन देतो किंवा हेटाळणी करतो. दुसर्‍याचे ऐकूनच घेत नाही. अशा मनोविचाराच्या पक्षात नारायण राणेंचे कोण ऐकणार आहे? पण दुर्दैवं असे की, यावेळी त्यांना गप्प बसून बुक्के सहन करावे लागणार आहेत. कारण आता ज्या रस्त्यावर राणे आले आहेत, त्या रस्त्यावरून माघारही शक्य नाही आणि नवे वळणही शक्य नाही. याच रस्त्यावर राणेंच्या राजकीय कारकिर्दीचा अस्त आहे आणि हा अस्तही अतिशय वाईट पद्धतीने होईल, हे स्पष्ट दिसत आहे.

नारायण राणेंचा उदय चेंबूरमध्ये झाला. पण त्यांची राजकीय वाटचाल शिवसेनेमुळे झाली. बेस्ट समिती अध्यक्ष यापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इथपर्यंत सर्व काही त्यांना शिवसेनेने दिले. पण राणेंची महत्त्वाकांक्षा संपली नाही. महत्त्वाकांक्षा असणे चांगलेच आहे. मात्र ती पूर्ण करण्यासाठी आपला पायाच तोडण्याची चूक राणेंनी केली. ज्या शिवसेनेने त्यांना मोठे केले त्या पक्षाला अडचणीत टाकून त्यांनी पक्षाची साथ तर सोडलीच, पण त्याचबरोबर उद्धवजींबद्दल काय बोलावं, याची मर्यादाही ओलांडली. महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी धीर असावा लागलो. संयम राखावा लागतो आणि किमान कृतज्ञता अंगीकृत असावी लागते. हे गुण असतील तरच साथ मिळते. पण बौद्धिक हुशारी असूनही राणेंकडे या तीन पैकी एकही गुण नाही. शिवसेना सोडली तेव्हा आपला पुढचा प्रवास लाचारीचा आहे, हे राणेंनी ताडायला हवे होते. परंतु तेव्हाही डोळ्यांवरील महत्त्वाकांक्षेच्या पट्टीमुळे त्यांनी या महत्त्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष केलं आणि आजही करीत आहेत. मागच्याला सन्मान देत पुढे जाणारा गतिमान राहतो. मागच्याला लाथ मारून पुढे धावणारा ठेच लागून पडतो, हे सत्य प्रत्यक्षात घडले.

नारायण राणेंकडे दोनच शक्तिस्थाने होती. एक शिवसेनेच्या विरोधात वाटेल त्या पातळीवर जाऊन बोलणे आणि दुसरे म्हणजे कोकणावर कब्जा होता. पण हा कब्जा कार्यातून नव्हता तर धाकातून होता. त्यामुळे काही काळानंतर मूठ सैल झाली आणि राणेंची पकड गेली. लोकनेता म्हणता येईल असे एकही विरोधी व्यक्तिमत्त्व कोकणात नसतानाही राणेंना कोकणात वर्चस्व कायम ठेवता आले नाही. जनता काही काळ दबते, पण सर्वकाळ दबत नाही, हा राजकारणातील धडा नारायण राणे विसरले. कोकण हातून निसटल्यावरही मुख्यमंत्री बनण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा मात्र कायम राहिली आणि त्याचमुळे काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊन त्यांच्या दिल्ली वार्‍या सुरू झाल्या. काँग्रेसनेही त्यांना खूप दिले. पराभव झाल्यावरही विधानपरिषद दिली. मुलांना उमेदवारी दिली. पण मुख्यमंत्रीपद मिळत नाही म्हटल्यावर राणेंनी काँग्रेसवरही हल्ला चढविला. आता मात्र राणेंचा राजकारणातला अखेरचा टप्पा सुरू आहे. ज्यांनी धनुष्य बाणाची ताकद दिली, ज्यांनी हात देऊन साथ दिली त्यांना तोडून दुखवून राणेंनी भाजपाचे कमळ घेतले. मात्र या तिसर्‍या वाटेवरची सुरुवातच दयनीय झाली. स्वत:चा पक्ष काढला, राज्यव्यापी दौरा घोषित केला, दिल्ली वार्‍या केल्या, मंत्रिपदासाठी मुख्यमंत्र्यांना सतत भेटले, पण भाजपाच्या रणनितीपुढे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजकारणापुढे त्यांचे काहीच चालले नाही. कमळावर पाण्याचा थेंबही टिकत नाही, हे गेल्या सहा महिन्यांतच राणेंच्या लक्षात आले आणि अखेर त्यांना राज्यसभा स्वीकारावी लागली.

अग्रलेखांचे बादशहा नीलकंठ खाडिलकर यांनी 2009 साली नारायण राणेंवर टीका करणारा अग्रलेख दैनिक ‘नवाकाळ’मध्ये लिहिला होता. त्यावेळी राणेंच्या कार्यकर्त्यांनी येऊन दैनिक ‘नवाकाळ’च्या कार्यालयाच्या काचा फोडल्या होत्या. आता नारायण राणेंनी शेवटच्या पक्षात प्रवेश घेतला आहे. तिथे तर त्यांना साईड पोस्टलाच राहावे लागणार आहे. मग आता कुणाच्या काचा फोडणार?

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

#MeToo भूषण कुमारांविरुद्ध लैंगिक शोषणाची तक्रार दाखल

मुंबई – ‘मीटू’ मोहिमेअंतर्गत देशात अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची नावे समोर आली. यात टी-सीरीजचे मालक भूषण कुमार यांचाही समावेश आहे. त्यांच्याविरोधात आता मुंबईच्या ओशिवारा पोलीस...
Read More
post-image
महाराष्ट्र

मीरारोड येथे ३ सफाई कामगारांचा गुदमरून मृत्यू

मीरारोड – मीरा-भाईंदर महापालिकेच्या मलनि:सारण व शुद्धीकरण केंद्रातील सेप्टिक टँकची सफाई करत असताना मीरारोड येथील तीन मजुरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली. मुजफ्फर मोहलिक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जेट एअरवेज बचावाची आशा, मात्र एतिहादच्या कठोर अटी

मुंबई – आर्थिक अडचणींमुळे डबघाईला येऊन बंद पडण्याच्या वाटेवर असलेल्या जेट एअरवेजला एतिहाद एअरलाईनच्या नव्या प्रस्तावामुळे जिवंत राहण्याची आशा निर्माण झाली आहे. एतिहाद एअरलाईन ही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय

राज्यात डान्सबार पुन्हा सुरू होणार

मुंबई – राज्यभरात डान्सबार पुन्हा सुरू करावे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने साडेपाच तास डान्सबार सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. तसेच डान्सबारमध्ये...
Read More
post-image
गुन्हे देश

नवापूरच्या अल्पवयीन मुलीवर गुजरातमध्ये अत्याचार

नंदुरबार – नवापूर येथील अल्पवयीन मुलीवर तिघांकडून अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या तीन आरोपींवर नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित...
Read More