नवी दिल्ली – टीम इंडियाला नवे मुख्य प्रशिक्षक मिळणार की पुन्हा रवी शास्त्रींचीच निवड होणार, याकडे तमाम क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. आज सायंकाळी ७ वाजता बीसीसीआय पत्रकार परिषद घेऊन टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची घोषणा करणार आहेत. दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट सल्लागार समितीने प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्रींसह माइक हेसन, टॉम मुडी, रॉबिन सिंग, लालचंद राजपूत, फिल सिमन्स या सहा जणांची निवड केली असून आज बीसीसीआयच्या मुख्यालयात त्यांची मुलाखत घेण्यात आली. रवी शास्त्री सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर असल्याने त्यांची मुलाखत स्काइपद्वारे घेण्यात आली आहे.
टीम इंडियाच्या सहायक (फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण) प्रशिक्षकपदांसाठी बीसीसीआयकडे तब्बल दोन हजार अर्ज आले होते. या पदांवरील निवडीचा निर्णय एमएसके प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती घेईल. मुख्य प्रशिक्षकपदासाठी काही दिग्गजांनीच अर्ज केले होते. बीसीसीआयने प्रशिक्षकासाठी कमाल वयाची मर्यादा 60 वर्ष ठेवली आहे.