आंधळे भक्त आणि पैसेखाऊ गुलाम – eNavakal
संपादकीय

आंधळे भक्त आणि पैसेखाऊ गुलाम

सांगली आणि जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपा विजयी झाला. आमच्या चांगल्या कामामुळे आम्ही विजयी झालो हा भाजपाचा दावा आहे आणि मतदारांना पैसे वाटून भाजपा जिंकली हा विरोधकांचा आरोप आहे. विजयी झालेले सत्ताधारी आणि आरोप करणारे विरोधक एकाच माळेचे मणी आहेत. विरोधक सत्तेत होतेे तेव्हा जे करीत होते तेच सत्ताधारी करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या एकमेकांवरील आरोपांवर क्षणभरही विचार करून वेळ घालवता कामा नये.

आजचा प्रश्न असा आहे की, जे मतदान होत आहे ते विचारपूर्वक होत आहे का? विचार करून मतदान करणारा वर्ग जेमतेम एक टक्का असेल. उर्वरित 99 टक्क्यांपैकी बहुसंख्य हे त्या त्या पक्षाचे गुलाम भक्त असल्याने त्यांच्या पक्षाला डोळे मिटून मतदान करतात, आणखी एक मोठा मतदारांचा वर्ग सरळ सरळ पैसे घेऊन मतदान करतो, एक वर्ग जाहिरातींना भुलून मतदान करतो. अशा तर्‍हेने जर आपण मतदान करीत असू तर मग ज्यांना आपण निवडून दिले त्यांनी पुढची 5 वर्षे कामेच केली नाहीत म्हणून ओरडत कशाला बसायचे? समाजासाठी काम केले की नाही या विषयावर मतदानच होणार नसेल तर खासदार, आमदार, नगरसेवक कामे कशाला करीत बसतील? भाजपाने नोटबंदीपासून कामगारांचे हक्क हिरावून घेण्यापर्यंत अनेक गोष्टी केल्या तरी मी भाजपा भक्त म्हणून मिरवत भाजपालाच मत देणार, शिवसेना सत्तेचे लोणी खात घोषणा देत बसलीय तरी मी सैनिक म्हणून सेनेलाच मत देणार, मनसेने पाच वर्षे झोप काढली तरी राज ठाकरे चांगले बोलतात म्हणून त्यांना मत देणार, काँग्रेसमुळे भ्रष्टाचार वाढला तरी आमचं पूर्वीपासून काँग्रेसलाच मत म्हणून हातावर शिक्का मारणार, राष्ट्रवादीने घोटाळ्यावर घोटाळे केले तरी जाणता राजा आहे म्हणून त्यांना मत द्यायचं, हा काय प्रकार आहे? ही गुलामी का? हे पक्ष तुमच्या घरचं रेशन भरतात का? मत कुणाला देऊ समजत नसेल तर उमेदवार कोण आहे, कसा आहे याची माहिती घेऊन मतदान करता येते. पण आपण हे करणार नाही. आपण अरुण भाटियांना हरविले, अविनाश धर्माधिकारींना घरी बसवले, मेधा पाटकरांचे डिपॉझिट जप्त होईल इतकी कमी मते त्यांना दिली. चांगली माणसे राजकारणात येऊ बघत होती त्यांना आपण इतकी वाईट वागणूक दिली की ते कायमचे राजकारण सोडून गेले. ही सर्व माणसं त्या त्या क्षेत्रात काम करीत आहेत. त्यांचे फार नुकसान झाले नाही. आपले नुकसान मात्र फार मोठे झाले आहे.

प्रत्येक निवडणुकीत भक्ताच्या झुंडी डोळ्याला झापडं लावून मतदान करतात तसे पैशाच्या महापुरात भिजूनही मतदान होते. पैसे घेऊन मतदान करणार असाल आणि भक्त म्हणून मतदान करणार असाल तर ज्याला निवडून देता त्याला कोणत्या तोंडाने जाब विचारणार? पूर्वी गरीब पैसे घेऊन मतदान करायचे, आता शिकलेली, दोन्ही वेळेस भरपेट जेवणारी कुटुंबही पैसे घेतात. आम्ही नाही त्यातले म्हणणारे सोसायटीची टाकी आणि टाईल्स फुकट लावून घेण्यासाठी पुढे असतात. हे कमी होते म्हणून अनेक चर्चशी संबंधित लोक पैसे मागतात, काही गणेश मंडळं तर थेट प्रत्येक पक्षाला भेटून बोली लावतात. (आम्ही इथेच स्पष्ट करतो की, काही गणेश मंडळं आणि चर्चचे कार्यकर्ते प्रामाणिक असतात. हे यासाठी स्पष्ट करतोय की बोचणारे वास्तव सांगितले की, त्यातील एक मुद्दा शोधून असा बाऊ करायचा की बाकी मुद्दे डब्यात जावे असा उपद्व्याप करण्याची अनेकांची मानसिकता असते), तरुण मित्र मंडळं गल्लोगल्लीत झाली आहेत त्यापैकीही अनेक मंडळं टी शर्ट मागतात, कॅरम मागतात, जीमचं सामान मागतात, आमच्याकडे 200 मतं आहेत, दोन हजार मतं आहेत अशी बोली लागते. पूर्वी गुलामांना भर बाजारात विकत घेतले जायचे. मोठा लढा उभारून तो प्रकार थांबविण्यात आला. पण आता या नवीन गुलामांचे काय करायचे? आपण पैसे घेऊन मतं देणार तर जिंकलेला त्या पैशाची वसुली करण्यासाठी काहीही करील हे उघडच आहे. म्हणजे आपण आपल्या पायावर दगड मारायचा आणि बोंब मारत सुटायचे हेच घडते आहे.

भारतात लोकशाही मेली नाही. आपण आपल्या संकुचित स्वार्थासाठी लोकशाही मारली. काही महान बुद्धीमंत म्हणतात की, भारतात हुकूमशाही हवी. हा खुळचट युक्तीवाद आहे. आजवर जगात कुठेही हुकूमशाही जनहिताची झाली नाही. एका माणसाच्या हाती अमर्याद सत्ता दिली तर तो बिघडणारच हा मानवी स्वभाव आहे. हिटलर, मुसोलिनी यासारख्यांनी देश बरबाद केले. जनतेचे हित जपणारे चांगले सरकार यावे असे वाटत असेल तर अंध भक्तीचा टिळा लावायचे सोडा आणि स्वत:चे खिसे भरण्याचे बंद करा. हे घडेल त्या निवडणुकीला चांगली माणसं खुर्चीवर असतील आणि ही चांगली माणसं समाज घडवतील. जोपर्यंत आपण हे करीत नाही तोपर्यंत निवडणुकीच्या फक्त गप्पा ऐकत राहायचे. या तमाशाच्या नादी आपण लागलो आहोत, उगाच कलावंतीणीला दोष द्यायचा नाही.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
क्रीडा विदेश

गॅरी स्टेड नवे प्रशिक्षक

वेलिंग्टन – न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी त्यांचे माजी फलंदाज गॅरी स्टेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जून महिन्यात अगोदरचे प्रशिक्षक असलेल्या माइक हेसन यांनी...
Read More
post-image
News मुंबई

म्हाडाच्या मुंबईच्या घरांसाठी ऑक्टोबर महिन्यात लॉटरी निघणार

मुंबई- म्हाडाची मुंबई शहरसाठी अंदाजे एक हजार घरांची ऑक्टोबर महिन्यात लॉटरी निघाणार असल्याची शक्यता मुंबई मंडळाच्या कार्यालयातून वर्तविण्यात आली आहे. म्हाडाच्या गृहनिर्माण कोकण मंडळाने मुंबई...
Read More
post-image
News मुंबई

पालिका एच-पूर्व कार्यालयाची ‘पाणी वाचवा’ मोहीम कागदावर

मुंबई- पिण्याचे पाणी वाचवा चोरी रोखा पाणी वाया घालवू नका, अशी जनजगृती मोहीम पालिका एच – पूर्व कार्यालयचे पाणी खाते हाती घेणार होते. पण ही...
Read More
post-image
क्रीडा विदेश

मुरलीने ब्लादिमीरला नमवले

अबुधाबी – अबुधाबी आंतरराष्ट्रीय मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या मुरली कार्तिकेयनने सातव्या फेरीत रशियाच्या ब्लादिमीरला फेडोसीवला पराभूत करून स्पर्धेत खळबळ माजवली. या पराभवामुळे स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीमधून...
Read More
post-image
News मुंबई

महान क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन

मुंबई – भारताला परदेशात कसोटी मालिका जिंकून देणारे पहिले कर्णधार अजित वाडेकर यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील...
Read More