भोपाळ – अॅट्रॉसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात आज संपूर्ण देशभरात दलित-आदिवासी संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशात या बंदला हिंसक वळण लागले असून ठिकठिकाणी रास्तारोको, रेल्वेरोको करण्यात आला आहे. काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या असून बंद दरम्यान आतापर्यंत देशभरात ९ जण ठार झाले आहेत. त्यात मध्य प्रदेशातील सहाजणांचा तर यूपीतील दोघांचा आणि राजस्थानमधील एकाचा समावेश आहे. आज सकाळपासूनच देशभरातील अनेक राज्यात बंदचे हिंसक पडसाद उमटले. खासकरून उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब, राजस्थान, झारखंडमध्ये दलित आणि आदिवासी संघटनांनी रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केलं. उत्तर प्रदेशात मेरठमध्ये आंदोलकांवर गोळीबार करण्यात आला, त्यात एकाचा मृत्यू झाला. हापूडमध्येही आंदोलकांनी वाहनांची जाळपोळ केली. तर ग्वाल्हेरमध्ये आंदोलनावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीमारमध्ये १९ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. ग्वाल्हेरमध्ये अधिक हिंसा भडकू नये म्हणून सायंकाळी सहा वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.
