मुंबई – ‘अग्रलेखांचे बादशहा’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचे आज मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. प्रकृती खालावल्याने रविवारी सकाळी त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने एक आदर्श व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात व्यक्त होत आहे. गिरगावातील खाडिलकर रोड येथे दैनिक नवाकाळच्या कार्यालयात दुपारी १२ ते २ दरम्यान खाडीलकरांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास त्यांच्या अंत्ययात्रेस सुरुवात झाली. मरीन लाइन्स येथील चंदनवाडी स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.